बॉबी देओल : 'मला माझ्या मुलांनी विचारले पप्पा तुम्ही घरी का बसता कामावर का जात नाही'

बॉबी देओल

फोटो स्रोत, Ani

'बरसात' या 1995 साली आलेल्या चित्रपटापासून आपलं करिअर सुरू करणारा अभिनेता बॉबी देओलच्या चित्रपट कारकिर्दीला 25 वर्षांपेक्षाही जास्त काळ उलटला आहे.

यादरम्यान बॉबीने अनेक चढउतार पाहिले. त्याने आपल्या स्टारडमचा तो काळही पाहिला, ज्यावेळी त्याच्याप्रमाणे लांब केस आणि सनग्लासेसची क्रेज तरूणांमध्ये होती.

तर बॉबीचे चित्रपट येणं जवळपास बंदच झालं होतं, असेही दिवस त्याने पाहिले आहेत. सध्या बॉबी देओल मोठा पडदा आणि OTT या दोन्ही ठिकाणी सक्रिय आहे. बॉबी देओलच्या आश्रम मालिकेचा तिसरा सिजन आला आहे.

बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओलने आपल्या करिअरच्या प्रत्येक टप्प्याबाबत चर्चा केली. बॉबी देओलच्या आयुष्यात एक काळ असा आला होता की बॉबीला स्वतःच्या आयुष्याची किव येऊ लागली होती.

बीबीसीशी बोलताना बॉबी म्हणाला, "माझ्या करिअरची सुरुवातीची सात-आठ वर्षे उत्तमरित्या चालली. आधी मला माझ्या फेस व्हॅल्यूवर काम मिळायचं. पण माझं काम मागच्या दाराने हिसकावलं जाईल, असं मला कधीच वाटलं नाही. पण मी अनेक प्रोजेक्ट गमावले. असं झाल्यानंतर तुम्ही चुकीचे चित्रपट निवडू लागता. लोकांना तुमच्यासोबत काम का करायचं नाही, हे तुम्हाला समजू शकत नाही. मग हा आपला पराभव आहे, असं तुम्ही मानू लागता."

आपला वाईट काळ आठवताना तो सांगतो, "मी स्वतःची कीव करू लागलो होतो. असं कधीच करू नये. पण जेव्हा मी बाहेर जायचो. फॅन्स भेटायचे. आम्ही तुला स्क्रीनवर पाहण्यासाठी आतूर आहोत, असं ते म्हणायचे. त्यावेळी मला वाटायचं, माझ्या फॅन्सना मला पाहायचं आहे, मग मला काम का मिळत नाही?

पप्पा, तुम्ही घरी बसून असता, कामावर का जात नाही?

बॉबी देओलच्या मते, तो कधी मोठा स्टार किंवा सुपरस्टार बनण्याच्या फंद्यात पडला नाही. त्याला लोकांच्या मनात आपलं घर करायचं होतं. पण एकामागून एक फ्लॉप चित्रपटांमुळे लोक त्याच्यासोबत काम करणं टाळत असल्याचं बॉबीच्या लक्षात आलं.

अपने

फोटो स्रोत, PAN INDIA LTD.

तो सांगतो, "मी पराभव पत्करला होता, अशी वेळही आली होती. माझी मुलं खूप लहान होती. ती म्हणायची, पप्पा तुम्ही घरात बसून असता, कामावर का जात नाही? मम्मी कामावर जाते. तेव्हा मला लक्षात आलं की मी नेमकं काय करतोय."

तो पुढे सांगतो, "पराभव स्वीकारून चालणार नाही, याची जाणीव मला झाली. मी घरी बसून असल्याचं मुलं पाहत होती. पत्नी काम करायची. तेव्हा मी ठरवलं माझ्या मुलांसमोर एक चांगलं उदाहरण म्हणून आपण पुढे यायचं. मीच लूजर बनलो तर माझी मुले कशी पुढे जातील? तेव्हा मी स्वतःवर मेहनत घेण्यास सुरुवात केली. आरोग्याचा विचार करू लागलो."

वाईट काळात सलमानने मदत केली

बॉबी देओलने आपल्या वाईट काळाबाबत सांगताना सलमान खानचा आवर्जून उल्लेख केला. तो म्हणतो, "सलमान खान मला जेव्हा-जेव्हा भेटायचा, तेव्हा म्हणायचा दाढी काय वाढवलीय उगीच."

बॉबी देओल

फोटो स्रोत, Ani

मी त्याला प्रेमाने मामू म्हणतो. कुणी काम देत नाही, काय करू. तेव्हा सलमानने म्हटलं, "माझा वाईट काळ होता तेव्हा मी संजय दत्तची साथ घेतली. मी म्हटलं आता मला तुझी साथ दे. मला काम मिळवून दे. तेव्हा मला रेस-3 चित्रपट मिळाला."

शेखर कपूर करणार होते बॉबीचं लाँचिंग

मुलाखतीदरम्यान बॉबीने आपल्या सुरुवातीच्या दिवसांबाबत मोकळेपणाने सांगितलं.

तो म्हणाला, माझे वडील धर्मेंद्र यांच्या धर्मवीर चित्रपटात मी बालकलाकार म्हणून काम केलं होतं. मी 6 वर्षांचा असताना बाबांनी मला येऊन विचारलं, माझ्या लहानपणाचा रोल करशील का. मी म्हणालो का नाही? तेव्हा एका रात्रीतच माझ्यासाठी कपडे शिवण्यात आले होते."

बॉबी पुढे सांगतो, "माझा पहिला चित्रपट शेखर कपूर यांच्यासोबत नियोजित होता. 27 दिवस त्याची शूटिंगही झाली. पण काही दिवसांनी शेखर कपूर यांना हॉलिवूडची ऑफर आली. त्यामुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही."

बॉबीने सांगितलं, "शेखर यांना अचानक हॉलिवूडमधून ऑफर मिळाल्यानंतर त्यांची माझ्या वडिलांशी चर्चा झाली. ते म्हणाले, बघ, हा तर माझ्या मुलाचा पहिला चित्रपट आहे. म्हणून काय करायचं तू विचारपूर्वक ठरव. तेव्हा शेखर कपूर हॉलिवूडला निघून गेले.

त्यावेळी राजकुमार संतोषी यांचा घायल चित्रपट लोकप्रिय झाला होता. भैय्या सनी देओल यांच्याशी त्यांची चांगली मैत्री होती. संतोषीसुद्धा उत्साहित होते. शूटिंग सुरू झाली. चित्रपट पूर्ण व्हायला दोन वर्षे लागली. 1995 मध्ये तो चित्रपट प्रदर्शित झाला. माझे सनग्लासेस आणि लांब केस ही ट्रेंडिंग स्टाईल बनेल, असं तेव्हा मला बिलकुल वाटलं नव्हतं."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)