उत्तर प्रदेशः क्राइम वेबसीरिज आणि सिनेमात उत्तर प्रदेशाला गुन्हेगारीचं केंद्र बनवलं जातंय, कारण...

मिर्झापूर

फोटो स्रोत, AMAZON PRIME

फोटो कॅप्शन, मिर्झापूर
    • Author, मेरिल सेबॅस्टियन
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली

भारतीय चित्रपट निर्मात्यांना आपल्या कथानकांचा विस्तार करण्याची परवानगी स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म्सने मागील काही वर्षांत देऊ केली आहे. यानंतर सर्वांनी आपला मोर्चा भारतातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तरप्रदेशकडे वळवला. आता त्यात ही बरेचसे चित्रपट यूपीतील टोळी युद्ध आणि गुन्हेगारीवर केंद्रित करण्यात आले. यात राज्याचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीकडे मात्र दुर्लक्षचं झालं.

अलिकडच्या वर्षांत उत्तर भारतातील लहान शहरांमधील स्मॉल बजेट चित्रपटांच्या यशाने हिंदी भाषेतील चित्रपट आणि टीव्ही उद्योगाला तिथल्या अधिकाधिक कथांवर काम करायला प्रोत्साहन दिलं.

उत्तरप्रदेश... आपल्या आकारमानामुळे आणि लोकसंख्येमुळे भारताच्या राजकीय क्षेत्रात या राज्याला मोठं स्थान लाभलंय. त्यामुळे जागेची निवड स्पष्ट आहे.

भारतीय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर जे शो आणि चित्रपट येतात त्यांच्यवर रिव्ह्यू करण्यासाठी समर्पित असलेल्या सिनेमा रेअर या ट्विटर अकाऊंटवरून एक जोक करण्यात आला की, चित्रपट बनवण्यासाठी आता यूपीमध्ये क्वचितच एखादं शहर उरलं असेल.

यूपीने हिंदी चित्रपट निर्मात्यांना त्यांचे चित्रपट आणि कार्यक्रम शूट करण्यासाठी प्रोत्साहन देऊन आकर्षित केलयं.

मिर्झापूर ते पाताळलोक पर्यंत ज्यांचं खूप कौतुक झालंय (तर काहींचं नाही) असे शो राज्याची जी काही पार्श्वभूमी असेल त्यावर तयार केले जातात. यात कौटुंबिक कलह आणि हिंसक खुन्यांच्या कथा रचल्या जातात.

बरेली की बर्फी चित्रपटातील एक दृश्य

फोटो स्रोत, JUNGLEE PICTURES

फोटो कॅप्शन, बरेली की बर्फी चित्रपटातील एक दृश्य

भारतातील बजबजपुरी अशा हिंदी भाषेतील चित्रपट उद्योगासाठी अर्थात बॉलिवूडसाठी गुन्हेगारी जगताच्या कथा नव्या नाहीत. 1998 मध्ये मुंबई शहरातील गँगस्टर ड्रामावर आधारित सत्या या चित्रपटाला शहरात सुरू असलेल्या अधःपाताचा शोध घेणाऱ्या चित्रपटांची लाट आणण्याचं श्रेय दिलं जातं.

आणि तेव्हापासूनच मुंबई आणि अंडरवर्ल्ड अशी जी काही कल्पनाशक्ती होती त्यावरची पकड कमकुवत झाली. मात्र आजही क्राईम थ्रिलर्सच्या नव्या लाटेत सत्याचा प्रभाव दिसून येतो.

"सत्याने हिंदी सिनेमासृष्टी खोलवर ढवळून काढली, पण ज्यांनी चित्रपटावर काम केलं त्यांचाही या वारशात समावेश आहे. त्यांनी त्याच्या यशाचा फायदा घेतला आणि हिंदी सिनेमांमध्ये बदल घडवला", असं समीक्षक उदय भाटिया त्यांच्या बुलेट्स ओव्हर बॉम्बे या पुस्तकात लिहितात. आणि या वारशात होते दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विशाल भारद्वाज. नावांजलेले हे दोन्ही दिग्दर्शक यूपीचे उत्तर प्रदेशातील आहेत. भारद्वाज यांनी तर अनेक हिट चित्रपट दिले.

सत्या चित्रपतातील एक दृश्य

फोटो स्रोत, RAM GOPAL VARMA

फोटो कॅप्शन, सत्या चित्रपतातील एक दृश्य

दिल्ली विद्यापीठात शिकवणाऱ्या लेखिका आणि चित्रपट निर्मात्या अनुभा यादव सांगतात की, सत्यापर्यंत येईपर्यंत हिंदी चित्रपटांनी कथानकावर फारसे लक्ष केंद्रित केलं नसल्याचं दिसत.

"हिंदी सिनेमासाठी कथानक महत्त्वाचं बनल्यामुळे एक वेगळा कलाविष्कार उदयाला येऊ लागला. मला वाटतं की वेब सीरिज आता त्यांना एका नव्या उंचीवर घेऊन जात आहेत," असं त्या म्हणतात.

पण काही समीक्षक इतर समस्यांकडे लक्ष वेधतात.

"सत्या चित्रपट हा ओरिजिनल होता. त्यानंतर जे काही चित्रपट आले ते या चित्रपटाची कॉपी केल्यासारखे वाटले. पण यात ही नवीन रूपक, नवीन वाक्प्रचार अशी नवी धाटणी होती." असं यूपीमधील शाहाबादचे समाजशास्त्रज्ञ मोहम्मद सईद म्हणतात.

सत्याच्या यशामुळे आकाराला आलेली शैली विशिष्ट प्रकारच्या पुरुषत्वावर आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी हिंसाचाराच्या वापरावर अवलंबून असते, असं यादव म्हणतात.

लोकसंख्याशास्त्रीय आणि भौगोलिक फायद्यांव्यतिरिक्त यूपीकडे बरंच काही आहे. हे राज्य "गंगा-जमुनी तेहजीब" साठी प्रसिध्द आहे. तेहजीब ही हिंदू आणि मुस्लिम संस्कृतींच्या समक्रमित संमिश्रणाचं वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा वाक्यांश आहे. हे राज्य हिंदी साहित्य, भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य आणि ललित कलांच्या नायकांचं जन्मस्थान देखील आहे.

या शोमध्ये ही गुंतागुंत असली तर ती क्षणभंगुर आहे.

मसान चित्रपटातील एक दृश्य

फोटो स्रोत, DRISHYAM FILMS

फोटो कॅप्शन, मसान चित्रपटातील एक दृश्य

"ही कवींची भूमी आहे. ही गालिबची भूमी आहे. इथं ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीय सैनिकांनी पुकारलेल्या 1857 च्या विद्रोहासारख्या सर्वात मोठ्या ऐतिहासिक कथा आहेत." असं यादव म्हणतात.

इथं गुन्हे घडतंच नाहीत असा दावा नाही. इथं पोलिसांच्या चकमकी, द्वेषपूर्ण गुन्हे आणि महिला आणि अल्पसंख्यांकांवरील हिंसाचाराच्या रोज नव्या बातम्या येत असतात.

इतर मोठ्या राज्यांत दरवर्षी हजारो गुन्ह्यांची नोंद होते. मात्र पॉप्युलर कल्चर हे बहुतकरून यूपीच्या हिंसेकडेचं लक्ष केंद्रित करतं.

"या राज्याला मोठा इतिहास आहे, कला, हस्तकला, नृत्य या गोष्टी आहेत. बंदुका सोडूनही बरंच काही आहे" पटकथा लेखक जुही चतुर्वेदी यांनी 2020 च्या मुलाखतीत म्हटल्या होत्या.

त्याचवर्षी चतुर्वेदी यांनी गुलाबो सीताबो नावाचं एक विनोदी नाटक लिहिलं. एका जीर्ण वाड्यावर हक्क सांगण्याचा प्रयत्नात घरमालक आणि भाडेकरू यांच्यात झालेली रस्सीखेच या नाटकाचं कथानक होतं. लेखिका जिथं मोठी झाली त्या यूपीची राजधानी लखनौ शहाराभोवती कथा रचली. आणि कथा पुढं नेण्यासाठी स्थानिक कठपुतळीच्या कलेचा वापर केला.

इतर लहान बजेट चित्रपटांनी यूपीमधली कोणतीही हिंसा न दाखवता लहान लहान आणि मजेदार कथा रंगवल्या आहेत. यात शुभ मंगल ‍ज्यादा सावधान, बरेली की बर्फी सारखे रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहेत.

"एखादं शहर आणि त्याच्या आसपासचं वातावरण हे बहुआयामी असतं. गुन्हेगारी हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे यूपी किंवा बिहारमध्ये आणखी ही बरंच काही आहे" असं चतुर्वेदी म्हणाल्या.

यादव यांना वाटतं की अडचण कुठं येते, तर जेव्हा राज्याची थोडीफार समज असलेला एखादा व्यक्ती त्याला माहित नसताना ही राज्याची ओळख सांगतो तेव्हा ती ओळख "सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर, एक अतिशय सांप्रदायिक ठिकाण, जातीने ग्रस्त ठिकाण" अशी असते.

यादव आणि सईद या दोघांचं ही म्हणणं आहे की, राज्यातील गुन्ह्यांच्या बातम्या नॅशनल हेडलाईन्स बनल्यामुळे इथले लोक इतरांच्या तुलनेत "वेगळे" पडतात.

सईद यांनी एका शोच्या रिसर्चसाठी थोडक्यात मदत केली होती. ते म्हणतात की, राष्ट्रीय पातळीवर राज्याविषयी काय चर्चा असते, दृष्टिकोन काय आहे याचे दूरगामी परिणाम घडतात.

दिग्दर्शकांनी याआधी यूपीमधील हिंसाचारापासून दूर न जाता बहुआयामी कथा सांगितल्या आहेत.

"भारद्वाजचा ओंकारा ऑथेलोचं रूपांतर आहे. ओंकारामध्ये हिंसा आहे म्हणून तो ऑथेलोची जागा घेऊन मोठा कलाविष्कार बनत नाही" असं यादव म्हणतात. मसान सारख्या चित्रपटाने नित्य, दैनंदिन जीवनातील हिंसाचार टिपला आहे.

गँग्ज ऑफ वासेपूर

फोटो स्रोत, VIACOM 18 PICTURES

फोटो कॅप्शन, गँग्ज ऑफ वासेपूर

2012 मध्ये, अनुराग कश्यपने गँग्स ऑफ वासेपूर रिलीज केला. चित्रपट हा तत्कालीन अविभाजित बिहारमधील वासेपूर शहरातील कोळसा माफियांबद्दल होता. हा चित्रपट दोन भागांत आला. चित्रपट रिलीज झाल्यावर त्या शहरातील रहिवाशांनी आंदोलन केलं. चुकीचं वर्णन केल्याबद्दल चित्रपटावर टीका केली. काहींनी चित्रण "धोकादायक" म्हटलं तर चित्रपटाच्या लेखकाने ही कथा वास्तवाला धरून असल्याचं म्हटलं.

"बिहार आणि झारखंड हा पट्टा अनुराग कश्यपच्या चित्रपटामुळे त्रस्त झाला होता. चटनी हे संगीत भारतीय लोकसंगीताचा एक फ्यूजन प्रकार आहे. हे एक प्रादेशिक लोकसंगीत आहे मात्र या संगीताला चुकीचे शब्द वापरून हिंसकरित्या प्रदर्शित करण्यात आलं" याची सईद आठवण करून देतात.

यादव म्हणतात, या नवीन शो मध्ये स्थान भाषा आणि सीमा सोडल्या तरी ही कथेचं मूळ अर्थात हिंसा काही बदलत नाही ती सूत्रबद्ध आहे. आणि संदर्भ ही कमी जास्त महत्त्वाचे असतात त्यामुळे भाषा आणि एखाद्या स्थळाच्या पलीकडे या चित्रपटांच्या कथा असतात.

सेक्रेड गेम्स आणि आर्या सारख्या शहरी थ्रिलर्सची ही परिस्थिती फार काही वेगळी नाही.

"यूपीमधल्या सेक्रेड गेम्सची कल्पना केली तर त्यात किती बदल होईल? मला वाटत नाही की त्यात फारसा काही बदल होईल. कारण जो हिंसाचार रंगवला जातो तो आहे तसाच चं राहील," असं यादव म्हणतात. "जर मिर्झापूर गुजरात राज्यावर आधारित असेल तर कदाचित भाषेतच बदल होईल. बाकी कमी बदलांचीच शक्यता आहे."

मसान किंवा मुक्ती भवन हे या चित्रपटांपेक्षा वेगळे आहेत, असं त्या म्हणतात. कारण यात यूपीमधील बनारस शहराचा एक महत्वाचा भाग घेतलाय आणि तो इतर ठिकाणी चित्रित होण्यासारखा नाहीच.

सध्या, यापैकी बरेच शो हे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मद्वारे तयार केले जातात. आणि यात प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी जाहिराती आणि मार्केटिंगचं मोठं बजेट असतं.

"जर या गोष्टी बदलल्या तर मला वाटतं इतर बर्‍याच गोष्टी देखील बदलतील." असं त्या सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)