दीपिका पादुकोणच्या मते चित्रपटाच्या सेटवर मानसोपचारतज्ज्ञ हवा कारण...

फोटो स्रोत, Getty Images
"मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक दृश्यात स्टार आहे." - 2010 मध्ये आलेल्या ब्रेक के बाद या हिंदी चित्रपटातील दीपिका पादुकोणचा हा डायलॉग. आज 12 वर्षानंतर हा फिल्मी डायलॉग सत्यात उतरताना दिसत आहे.
18 वर्षांची नवोदित मॉडेल जी टीव्ही जाहिरातींमध्ये दिसायची, हिमेश रेशमियाच्या म्युझिक अल्बममध्ये नाचायची, ती आज हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
दीपिकाने हॉलिवूडमध्येही काम केलेलं आहे. तिचं स्वतःचं एक प्रोडक्शन हाऊससुद्धा आहे. टाईम मॅगझिनच्या टाईम इम्पॅक्ट 100 च्या यादीत या वर्षी दीपिकाचं नाव आहे.
सध्या दीपिकाची ओळख फक्त लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री इथपर्यंतच मर्यादित नसून चित्रपटाबाहेरच्या जगतात एक वेगळा विचार बाळगणारी कलाकार म्हणूनही तिला ओळखलं जातं.
2020 मध्ये JNU मध्ये विद्यार्थ्यांवर हल्ल्याची घटना समोर आल्यानंतर दीपिका थेट विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांच्या बाजूने उभी राहिली होती.

फोटो स्रोत, Getty Images
डिप्रेशन आणि मानसिक आरोग्य यांसारख्या गोष्टींवर ती सातत्याने मोकळेपणाने चर्चा करते. अनेकवेळा चित्रपटांच्या सेटवर ती थेरपिस्टना बोलावते. नुकत्याच आलेल्या गहराईयां चित्रपटात ती असं करताना दिसली होती.
चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर ती एक मेहनती आणि व्यावसायिक कलाकार आहे. चित्रपटाच्या सेटवर तिच्या वागणुकीतून या गोष्टी समजू शकतील.
सेटवर जाताना तिच्यासोबत पेन्सिल नेहमी सोबत असतं. महत्त्वाच्या डायलॉग्जना ती अधोरेखित करते. प्रत्येक पात्राला स्वतःचा एक वेगळा रंग देण्यासाठी ती त्यावर मेहनत घेते.
तर, अशी ही दीपिका पादुकोण खरोखरंच सध्या आयुष्यातील प्रत्येक दृश्यात स्टार आहे.
कान्स फेस्टिव्हलच्या ज्युरींमध्ये
दीपिका पादुकोणच्या स्टारडमला आता ग्लोबल स्वरुप प्राप्त झालं आहे. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिला ज्युरी म्हणून स्थान देण्यात आलेलं आहे.

फोटो स्रोत, AFP
भारताकडून आतापर्यंत ऐश्वर्या राय, शेखर कपूर, विद्या बालन, नंदिता दास आणि शर्मिला टागोर या कलाकारांना ज्युरी बनण्याचा मान मिळाला होता. या यादीत दीपिकाही समाविष्ट झाली.
खरं सांगायचं तर दीपिकाचं आयुष्य एखाद्या हिंदी चित्रपटाच्या कहाणीसारखंच आहे.
एक अशी पटकथा, ज्यामध्ये एंट्री धमाकेदार होते. पण कहाणीत नंतर खाचखळगे येतात, क्लायमॅक्स येताना कहाणी वेग पकडते, अखेर एका वेगळ्याच उर्जेने कहाणी पुढे जाते.
ओम शांती ओम ते गहराईंया
18 वर्षांच्या दीपिकाला लोकांनी सर्वप्रथम पाहिलं ते लिरील आणि क्लोज अपच्या जाहिरातींमध्ये.
त्याशिवाय हिमेश रेशमियाच्या गाण्यांच्या अल्बमध्येही तिने काम केलं.

फोटो स्रोत, Getty Images
2007 साली शाहरुख खानसोबत ओम शांती ओम या चित्रपटात तिची वर्णी लागली.
शांती आणि सँडी या डबल रोलमध्ये ती या चित्रपटात दिसली होती.
च्युईंगगमचा फुगा बनवणाऱ्या सँडीच्या त्या भूमिकेपासून गहराईंयाच्या अलिशापर्यंत दीपिकाने आपल्यातील क्षमता वेळोवेळी सिद्ध केली आहे.
तिच्या भूमिकांनाही नेहमीच वेगवेगळे रंग पाहायला मिळतात. कधी राम लीला (2013) चित्रपटात आक्रमक लीला आहे, जी म्हणते बेशरम, उद्धट आणि स्वार्थी असतं, पण प्रेम हे असंच असतं.
तमाशा (2013) चित्रपटात प्रेमाची व्याख्या ठरवण्यासंदर्भात ताराच्या मनातील घालमेलही तिने तंतोतंत दाखवली. त्यामध्ये ती म्हणते, "एके दिवशी मला कळालं की सँटा क्लॉज नसतो, खूप वाईट वाटलं. पण काय करणार, नसतं. हे लव्ह, सोलमेट्स, असं काही नसतं."
ती कधी प्रेमात आकंठ बुडालेली मस्तानीही आहे. बाजीराव मस्तानी (2015) चित्रपटात बाजीरावची (रणवीर सिंह) पत्नी काशिबाई तिला पतीला हिसकावून घेतल्याबाबत खडे बोल सुनावत असते, तेव्हा ती म्हणते, त्यांनी माझा हात पकडला, पण तुमचा सोडलेलाही नाही.
कधी दीपिका नाजूक पण आतून कणखर अशी 'ये जवानी है दिवानी'ची नैनाही असते, जी वर्तमानात जगते, पण तिच्या मनात भूतकाळातील काही आठवणी दबलेल्या आहेत. आठवणी म्हणजे मिठाईच्या डब्याप्रमाणे असतात, असं तिला वाटतं. डबा उघडला की फक्त एक तुकडा खावा, इतकं ते सोपं नाही.
बॅडमिंटन चँपियन दीपिका
पीकू, छपाक, गहराईंया, पद्मावत, हॅपी न्यू ईयर आणि चेन्नई एक्सप्रेस यांच्यासारख्या चित्रपटांमधून दीपिकाने गेल्या दहा वर्षांत वेगवेगळ्या धाटणीचे अनेक चित्रपट केले आहेत. या चित्रपटांमधील प्रत्येक भूमिकेतून तिने स्वतःला सिद्ध केलं.
दीपिकाचं हे यश म्हणजे मंद आचेवर शिजत असलेली खीर आहे, जिचा गंध आणि चव हळूहळू आपलं रुप घेत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आपण दीपिकाच्या कारकिर्दीतील एक असा काळसुद्धा पाहिला, ज्यामध्ये तिला अपयशाचं तोंड पाहावं लागलं होतं.
तिच्या दाक्षिणात्य लहेजामुळे सुरुवातीला चित्रपटांत काम मिळवण्यासाठी दीपिकाला संघर्ष करावा लागला.
शिवाय, 2008 ते 2012 दरम्यान दीपिकाच्या चित्रपटनिवडीवरूनही तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं.
पण प्रचंड मेहनत, सातत्य आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून तिने पुनरागमन केलं.
अगदी एका अथलीटप्रमाणे. एखादा खेळाडू जसा चांगली सुरुवात करतो, पुढच्या क्षणी मात मिळते. शर्यतीत तो मागे राहतोय, असं वाटत असतं पण तो कधीच पराभव पत्करत नाही. अगदी तसंच.
मुळात दीपिका एक खेळाडूच आहे. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये 5 जानेवारी 1986 रोजी तिचा जन्म झाला. ती भारताची राष्ट्रीय बॅटमिंटन खेळाडूही राहिली आहे.
दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण भारताचे अव्वल पुरुष बॅडमिंटन खेळाडू होते.

फोटो स्रोत, Getty Images
हा वारसा पुढे चालवत दीपिकानेही बॅडमिंटनची वाट धरली. तिने राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळात सहभाग नोंदवला. अनेक वर्षे भल्या पहाटे उठून बॅडमिंटन सरावासाठी जाणं, घरी येऊन पुन्हा शाळेला जाणं, असा तिचा दिनक्रम असायचा.
पण नंतर मॉडेलिंगमध्ये तिचा रस निर्माण झाला. शाळेत असल्यापासूनच तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली होती.
पण तिच्यातील खेळाडूने नेहमीच संघर्ष करण्याची तयारी ठेवली होती.
हार्पर बाजार पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणते, "अॅथलीट असल्यामुळे तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत असता. कोणताही सामना तुम्ही अर्ध्यातून सोडू शकत नाही. शेवटच महत्त्वाचा असतो, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रयत्न करत असतो."
दीपिका जेव्हा तणावात होती..
सध्या यशोशिखरावर असलेल्या दीपिकाला कधी आपण कमी पडतोय किंवा एकटे पडतोय, असं मुळीच वाटलं नाही, असं म्हणता येणार नाही.
मी तणावात होते आणि त्यावर उपचारही घेत होते, असं दीपिकाने 2015 मध्ये सांगितल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

फोटो स्रोत, Getty Images
याविषयी 2019 मध्ये बीबीसीशी बोलताना दीपिकाने सांगितलं, "2013 मध्ये माझे चित्रपट हिट होत होते, त्यामुळे माझ्यासाठी खूप बिझी वर्ष होतं. पण 15 फेब्रुवारी 2014 रोजी सकाळी मी उठले, तेव्हा मला माझ्यासोबत काय घडतंय काहीच कळत नव्हतं. मी विनाकारण रडू लागायचे. मला अतिशय उदास वाटायचं. मला माझ्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह पडू लागला होता. पण हे डिप्रेशन आहे, हे मला माहीत नव्हतं. मी गोळ्या घेतल्या नाहीत, कारण त्याची सवय लागेल, असं मला वाटायचं. मी तेव्हा जागरूक नव्हते. डिप्रेशनबाबत एक लज्जेची भावना होती. मी कुणालाही हे सांगू शकत नव्हते. पण मी विचार केला की याविषयी मोकळेपणाने बोलायला हवं."
तेव्हापासून दीपिकाने डिप्रेशनविषयी बोलायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर 2015 मध्ये तिने लिव्ह, लव्ह, लाफ नावाची एक संस्थाही सुरू केली. मानसिक आरोग्याबाबत जागरुकता वाढवण्यासाठी लोकांची मदत करणं हा त्यामागचा हेतू होता.
'फिल्म क्रूसाठी मेंटर हेल्थ एक्सपर्ट असावा'
फिल्म सेटवर सर्वांसाठी एक मानसिक आरोग्य तज्ज्ञ असावा, असा विचार तिने अनेक मुलाखतींमध्ये बोलून दाखवला आहे.
हा तज्ज्ञ व्यक्ती सर्वांची मदत करू शकेल, त्यांना वर्क लाईफ बॅलेन्सबाबत सांगू शकेल, असं मत दीपिकाने मांडलं.

फोटो स्रोत, Getty Images
दीपिका स्वतः एक चित्रपट निर्माती आहे. प्रोडक्शन हाऊस असलेल्या मोजक्या अभिनेत्रींपैकी ती आहे. तिच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे 'का'(Ka). इजिप्तमध्ये या शब्दाचा अर्थ होतो आत्मा. विशेषतः तुम्ही जगातून निघून गेल्यानंतर मागे राहणारा भाग.
दीपिकाने आपल्या प्रोडक्शन हाऊसमार्फत असिड हल्लायवर आधारित छपाक तसंच 83 हे दोन चित्रपट बनवले आहेत.
दीपिका, राजकारण आणि वाद
चित्रपटांच्या बाहेरच्या जगात दीपिकाने राजकारणात थेट असा सहभाग कधी नोंदवला नाही. पण 2020 मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी ती गेली, तेव्हा अनेकांना ते एक राजकीय पाऊल वाटलं.
दीपिकाने तेव्हा म्हटलं होतं, "विद्यार्थिनींसोबत जे काही झालं, ते पाहून मला दुःख झालं. असं यापुढे कधी होऊ नये, हे भीतीदायक आहे. आपल्या देशाचा पाया असा नाही."
दीपिकाने दाखवलेल्या धाडसाचं त्यावेळी अनेकांनी कौतुक केलं होतं. पण अनेकांनी त्याचा विरोधही केला.

फोटो स्रोत, Spice pr
कोणत्याही बड्या व्यक्तीसोबत होतं, तशा प्रकारे दोन्ही बाजूंच्या वादाला तिला तोंड द्यावं लागलं होतं.
2015 मध्ये दीपिकाने वोग मॅगझिनसाठी #mychoice नामक एक व्हीडिओ शूट केला होता.
यामध्ये ती महिलांचे हक्क आणि आपल्या अटींवर आयुष्य जगण्याबाबत सांगताना दिसते.
या व्हीडिओत दीपिका हेसुद्धा म्हणते, "विवाहबाह्य लैंगिक संबंध बनवणं, विवाहाशिवाय लैंगिक संबंध बनवणं किंवा विवाहच न करणं ही तिची इच्छा आहे."
त्यावेळीही लोकांनी दीपिकावर टीका केली होती. महिलांच्या हक्काविषयी बोलणं ही वेगळी गोष्ट आहे पण स्त्री असो किंवा पुरुष, त्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवणं योग्य ठरवणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न लोकांनी विचारला
कॉकटेल चित्रपटाच्या निवडीवरूनही तिच्यावर टीका झाली. हा चित्रपट हिट झाला, तिच्या करिअरमध्ये तो टर्निंग पॉईंटही ठरला. पण अनेक चित्रपट समीक्षकांनी हा चित्रपट रिग्रेसिव्ह असल्याची टीका केली होती.
दीपिकाने अशा प्रकारचा रोल करणं योग्य आहे का, एका मुलाला मिळवण्यासाठी संस्कारी मुलगी बनणं, त्यासाठी स्वातंत्र्य गमावणं योग्य आहे का, असा प्रश्न लोकांनी त्यावेळी विचारला होता.
'हा माझा पैसा आहे'
प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या लोकांना उत्तर कसं द्यायचं, हेसुद्धा दीपिकाला चांगलंच माहीत आहे.
रणवीर सिंहसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर दीपिकाचा छपाक चित्रपट आला होता. त्यावेळी एका पत्रकाराने तिला विचारलं. तू चित्रपट निर्मिती केली आहेस, म्हणजे रणवीर सिंहसुद्धा निर्माता बनला असं समजावं का?

फोटो स्रोत, RANVEER SINGH TWITTER
दीपिका यावर उत्तरली, "माफ करा साहेब, हा माझा पैसा आहे."
हा माझा पैसा आहे, असं सांगण्याची हिंमत येणं, हेच दीपिकाचं यश आहे.मॉडेलिंग आणि छोट्या जाहिरातींपासून सुरू झालेला हा प्रवास इथपर्यंत पोहोचला आहे.
टाईम इम्पॅक्टच्या यादीत सहभागी
जाहिरातींबद्दलचा एक किस्सा आठवतो. क्लोजअपची एक जाहिरात होती. दीपिकाचा तो सुरुवातीचा काळ होता. या जाहिरातीत ती टुथपेस्ट हातात धरून नाचत असते.
पण जाहिरातीत दिसणारी टुथपेस्ट खरीखुरी नव्हती. तिच्या हातात एक छोटी काठी दिली होती. त्यावर अनिमेशन करून जाहिरातीत त्याला टुथपेस्ट म्हणून दाखवण्यात येणार होती.

फोटो स्रोत, RED CHILLIES ENTERTAINMENT
त्याला पाहून दीपिकाने असं भासवलं की जणू काही तिच्या हातात खरंखुरं पेस्टच आहे. हेच दीपिकाचं कौशल्य होतं.
आज ती जगभरातील विविध मोठ्या ब्रँड्सची जाहिरात करते. लुई वितोंसारख्या ब्रँडसाठी काम करणाती ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे.
2018 मध्ये टाईम मॅगझिनच्या जगातील सर्वात प्रभावी 100 व्यक्तींच्या यादीत दीपिकाचा समावेश करण्यात आला होता. तर 2022 मध्ये टाईम इम्पॅक्ट यादीत तिचा समावेश होता. म्हणजे चार वर्षांत तिने हा प्रवासही पूर्ण केला.
ग्लॅमर ते इम्पॅक्टपर्यंत
प्रभावापासून ते इम्पॅक्टपर्यंतचा हा प्रवास दीपिकाच्या भूमिकांमध्येही दिसू शकतो. पीकू चित्रपटातील सिंगल असलेल्या मुलीमध्ये तो दिसतो, जी वडिलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्यासोबत राहत असते.
छपाकच्या मालतीमध्येही तो दिसतो, जिचा अॅसिड हल्ल्यानंतर धीर खचलेला असतो. एका दृश्यात मालती (दीपिका) आपलं सगळं जुनं साहित्य, आकर्षक कपडे आणि दागिने फेकून देणार असते,
पण आईने हटकल्यानंतर ती म्हणते, "नाकच नाही, तर नाकातला दागिना कसा घालणार?"
पण पुढे जाऊन आयुष्याचा प्रवास ती पुन्हा सुरू करते. मालतीच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ल्याला बळी पडल्याचं दुःख आणि तिची तडफड सहज दिसू शकते. पण ही मुलगी कधीच बिचारी अशी नव्हती.
अशा भूमिकांचा प्रवास करून आलेली दीपिका पादुकोण आज कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत पोहोचली आहे. म्हणूनच तिचा तोच डायलॉग पुन्हा पुन्हा आठवतो, "मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दृश्यात स्टार आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








