'शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संभाजीराजांच्या विषयाचं घाणेरडं राजकारण' - #5मोठ्याबातम्या

आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे -

1. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संभाजीराजांच्या विषयाचं घाणेरडं राजकारण

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.

"तुम्ही शब्द पाळला नाही म्हणून महाराष्ट्रातील जनतेला उत्तम सरकार मिळालं. त्यामुळे तुमचे आभार. यापुढे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता कधीच येणार नाही,"असं वक्तव्य त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्ये केलं. ही बातमी सकाळने दिली आहे.

"आम्ही म्हणे संभाजीराजेंना फसवले. हे कोण म्हणतंय. तर भाजप. फसवाफसवीची भाषा करणारे आम्हाला म्हणत आहेत की आम्ही फसवलं," असे ते म्हणाले.

सामनाच्या अग्रलेखातही याचा विषयाचा उल्लेख आहे. त्यात लिहिलं आहे की शिवसेनेना बदनाम करण्यासाठी संभाजीराजांच्या विषयाला फोडणी देण्याचा घाणेरडं राजकारण सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला असं वाटत नाही, हे सर्व भाजपचेच राजकारण असंही अग्रलेखात लिहिलं आहे.

2. चंद्रकांत पाटील यांची सुप्रिया सुळे यांच्याबाबतच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी

'सुप्रियाताई व महिलांबद्दल माझ्या मनात आदर आहे. असे असताना केवळ ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दु:ख नाही,' अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य महिला आयोगाकडे आपला खुलासा पाठवत दिलगिरी व्यक्त केली आहे.

ही बातमी लोकमतने दिली आहे.

"माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्राग्याने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो," असेही ते पुढे म्हणाले.

3. ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या या आठवड्यात अचानक वाढली असून ओमिक्रॉनचे नवे व्हेरिएंट BA-4 आणि BA-5 राज्यात सापडले आहेत. पुणे शहरात 7 रुग्ण सापडल्याने आता पुन्हा लॉकडाऊन लावणार का याबद्दल अजित पवार यांनी माहिती दिली.

ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

पवार म्हणाले, " "नवा विषाणू राज्याची काळजी वाढविणारा आहे का याबाबत आरोग्य विभागाकडून सखोल चौकशी केली जात असून आरोग्यमंत्री राजेश टोपे आवश्यक माहिती घेत आहेत. नव्या विषाणूचे रुग्ण पुण्यात आढळून आल्यामुळे याबाबत काय उपाययोजना करणे आवश्यक आहे याविषयीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल."

4. नवनीत राणांना दुग्धाभिषेक

तब्बल 36 दिवसांनंतर राणा दाम्पत्य शनिवारी अमरावतीमध्ये दाखल झालं. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ठिकठिकाणी स्वागत झाल्यानंतर राणा दाम्पत्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला. नवनीत राणा यांनी त्याचा एक व्हिडिओ आपल्या ट्टिटर अकाऊंटवर शेअर केलाय.

ही बातमी झी24 तासने दिली आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या देशात चर्चेत आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मुंबईत शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना काही दिवस तुरुंगात ही राहावं लागलं होतं.

आता अमरावीत त्यांचं स्वागत करताना राणा दांपत्यावर चक्क दुधाने अभिषेक करण्यात आला.

5. राज ठाकरेंसाठी पुढे आले मुंबईतले उत्तर भारतीय, बृजभूषण सिंह मुंबईत आल्यास चप्पलचा हार घालणार

मुंबईतले उत्तर भारतीय राज ठाकरेंसाठी चांगलेच आक्रमक झाले आहेत. ब्रृजभूषण यांचा निषेध करण्यासाठी आणि राज ठाकरे यांना समर्थन करण्यासाठी उत्तर भारतीयांनी मुंबईमधील साकीनाका मेट्रो स्टेशन खाली आंदोलन केले.

ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केलेल्या दिवसापासून वादाची मालिका सुरू झाली. उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर ते दररोज वेगवेगळ्या पद्धतीने राज ठाकरेंना इशारा देत राहिले. दरम्यान, राज ठाकरेंनी दौरा स्थगित केल्याची घोषणा केली.

जर अयोध्येला राज ठाकरे गेले, तर आम्ही देखील त्यांच्या सोबत जाणार आहोत आणि बृजभूषण मुंबईत आल्यास आम्ही चपलांचा हार घालणार अशी धमकीच या आंदोलनात देण्यात आली. आज आंदोलक बृजभूषण सिंह यांच्या फोटोला चपलांचा हार घालणार होते. मात्र, आधीच पोलिसांनी फोटो काढून घेतला आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)