You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जुगजुग जियो : पाकिस्तानी गायकाने करण जोहरला का धमकी दिली?
चित्रपट निर्माते करण जोहर यांचा 'जुगजुग जियो' चित्रपट वादात अडकला आहे. रविवारी, 22 मे रोजी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या वादाचा संबंध पाकिस्तानशी आहे आणि याच्या केंद्रस्थानी आहे 'नच पंजाबन' हे गाणं.
पाकिस्तानी गायक अबरार उल हक यांचा आरोप आहे की त्यांनी कोणत्याही भारतीय चित्रपट निर्मात्याला 'नच पंजाबन' या गाण्याच्या वापराची परवानगी दिलेली नाही.
करण जोहर यांच्यासारख्या निर्मात्यांनी दुसऱ्या कोणाच्या गाण्याची नक्कल करायला नको, असं त्यांचं म्हणणं आहे.
अर्थात, या गाण्याचे संगीत हक्क असलेली कंपनी टी-सीरिजचं म्हणणं आहे की, त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही.
या वादावर अजूनपर्यंत करण जोहर यांची प्रतिक्रिया आलेली नाही. अबरार गायक आहेत आणि पाकिस्तानच्या राजकारणातही सक्रिय आहेत.
ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक आहेत.
काय आहे संपूर्ण वाद?
भारत आणि पाकिस्तानचे संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावपूर्ण आहेत. याचा परिणाम बॉलिवूडवरही झालेला दिसतो. दोन्ही देशांच्या कलाकारांनी एकमेकांसोबत काम करणं जवळपास बंद केलं आहे.
एकेकाळी बॉलिवूडमध्ये आतिफ असलम आणि राहत फतेह अली खानांच्या आवाजाची जादू राज्य करायची. फवाद खान आणि अली जफर लोकप्रिय होत होते, पण नुकतंच एका पाकिस्तानी गायिकेने भारतीय गायिकेवर आपली नक्कल केल्याचा आरोप केला होता. आता हे नवं प्रकरण समोर आलं आहे.
'जुग-जुग जियो' या चित्रपटात वरूण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर, अनिल कपूर यांच्यासह अन्य कलाकार आहेत. हा चित्रपट 24 जूनला रिलीज होणार आहे.
या चित्रपटाच्या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये एक संगीत वाजतं. या संगीताबद्दल दावा केला जातोय की, हे पाकिस्तानी गायक अबरार उल हक यांच्या अतिशय लोकप्रिय गाण्यातलं संगीत आहे. खुद्द अबरार यांनी हा दावा केला आहे.
अबरार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "मी माझं 'नच पंजाबन' हे गाणं कोणत्याही भारतीय चित्रपटाला विकलं नाहीये. याच्या नुकसान भरपाईसाठी कोर्टात जाण्याचा मला अधिकार आहे. करण जोहरसारख्या निर्मात्याने माझ्या गाण्याची कॉपी करून स्वतःच्या चित्रपटात वापरायला नको होतं. हे माझं सहावं गाणं आहे ज्याची नक्कल केली गेली आहे."
तर टी-सीरीजने ट्वीट करून या गाण्याची चोरी केल्याचा इन्कार केला आहे. त्यांनी म्हटलं, "आम्ही कायदेशीरित्या 'नच पंजाबन' गाणं वापरण्याचे हक्क खरेदी केले आहेत. हे गाणं आयट्यूनवर 2002 साली रिलीज झालं होतं आणि हे मुव्ही बॉक्सच्या मालकीच्या लॉलिवूड क्लासिक्स युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे."
या ट्वीटमध्ये टी-सीरीजने मुव्ही बॉक्सलाही टॅग केलं आहे. मुव्ही बॉक्सने ट्वीट करत म्हटलं, "नच पंजाबनचं लायसन्स 'जुगजुग जियो' या चित्रपटात दाखवण्यासाठी घेतलं आहे. टी-सीरीज, करण जोहर आणि धर्मा मुव्हीजकडे हे गाणं वापरण्याचे पूर्ण अधिकार आहेत. त्यामुळे अबरार उल हक यांचं नुकसान भरपाईचं ट्वीट पूर्णपणे अमान्य आहे."
सोशल मीडियावर युझर्सच्या प्रतिक्रिया
एक युझर वकास एम यांनी लिहिलं आहे की, "बॉलिवूड गेल्या 40 वर्षांपासून पाकिस्तानी गायकांची नक्कल करतंय. भारतीय मनोरंजन क्षेत्रात अस्सल कलेची कमतरता आहे त्यामुळे बॉलिवूड वेगाने मागे पडतंय."
फिफी हारून यांनी लिहिलं आहे की, "अबरार यांनी 'बिल्लो' या गाण्याचे अधिकारही विकले होते आणि ते गाणं कोक स्टुडिओमध्ये गायलं. यामुळे युट्यूबने ते गाणं हटवलं. गायकाने जर कॉपीराईट विकला तर त्यांच्याकडे गाण्याचे राहात नाहीत."
नुकतंच पाकिस्तानी गायिका हदिका कियानीने 'बूहे बारिया' गाण्यासाठी भारतीय गायिका कनिका कपूरवर आपली नक्कल केल्याचा आरोप केला होता.
पण कनिका कपूरने हे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटलं, "हे गाणं ऐकणाऱ्या प्रत्येक माणसाला हे कळेल की हे ओरिजनल गाणं आहे. अंतरा, संपूर्ण गाणं अस्सल आहे. आम्ही फक्त ध्रुवपद उचललं आहे. तेही एका जुन्या लोकगीतातून. मला आणि म्युझिक कंपनीला वाटतं की हे लोकसंगीत आहे."
भारत पाकिस्तानच्या गाण्याच्या कॉपीचा इतिहास
भारत आणि पाकिस्तानातल्या कलाकारांमध्ये गाणी चोरी करण्यावरून होणारे वाद नवे नाहीत. एका देशातल्या गाण्यांचा दुसऱ्या देशात दुसऱ्या गायकाने गाऊन वापर झालेला आहे.
याचं सगळ्यांत ताजं उदाहरण मनोज मुंतशिर यांनी लिहिलेलं, 'दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल' हे गाणं आहे. हे गाणं झुबिन नौटियाल यांनी गायलं आहे.
पण खरंतर ही कव्वाली आहे आणि अनेक वर्षांपुर्वी नुसरत फतेह अली खान यांनी गायलेली आहे. इतरही पाकिस्तानी कलाकारांनी ही कव्वाली गायली आहे.
भारतीय चित्रपटांचीही काही गाण्यांची नक्कल झाली आहे. 2012 साली आलेल्या 'एक था टायगर' या चित्रपटातल्या 'सैंयारा' गाण्याची चाल माईल किटिक सिंगरने रकीजा या गाण्यात कॉपी केली होती.
2011 च्या 'रा वन' चित्रपटातल्या 'छमक्क छल्लो' या गाण्याची चाल 2013 मध्ये डारा बुबामारामध्ये वापरली गेली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)