You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संभाजीराजे नाही तर संजय पवारांना शिवसेनेची राज्यसभेसाठी उमेदवारी
शिवसेनेने संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याचं निश्चित केलं आहे, संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना याची माहिती दिली आहे. संजय पवार यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील असंसुद्धा संजय राऊत यांनी म्हंटलंय.
तर राज्यसभेच्या निवडणुकीत आपल्या वाट्याच्या पहिल्या जागेसाठी संजय राऊत यांना चौथ्यांदा संधी दिली आहे.
संजय पवार हे कोल्हापूर महानगरपालिकेत तीनवेळा नगरसेवक होते. सध्या ते कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहे.
कोण आहेत संजय पवार?
कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार हे कट्टर शिवसैनिक ओळखले जातात. 1989 पासून ते कोल्हापूरमध्ये शिवसेना पक्षात कार्यरत आहेत. कोल्हापूरमधला शिवसेनेचा आक्रमक चेहरा अशी त्यांची ओळख आहे. बेळगाव सीमाभागात मराठी बांधवावर होणाऱ्या कानडी अत्याचाराविरोधात रस्त्यावरच्या आंदोलनात संजय पवार हे कायम अग्रस्थानी असतात.
1990, 1996, आणि 2005 असे तीन वेळा ते कोल्हापूर महापालिकेत शिवसेना नगरसेवक राहिले आहेत. 2005साली त्यांनी कोल्हापूर महापालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणून काम पाहिलं आहे.
तालुका प्रमुख, शहर प्रमुख ते जिल्हा प्रमुख असं पद भूषवणारे संजय पवार हे शिवसेनेतील जुने आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत. 2008पासून ते शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख आहेत. 2018 ते २2020 या काळात त अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष राहिले आहेत. या पदाला राज्यमंत्री दर्जा असतो.
संभाजीराजे सकाळी काय म्हणाले?
संभाजीराजे छत्रपती हे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. संभाजीराजे हे शिवबंधन स्वीकारणार की स्वतंत्र राहणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की उद्धव ठाकरे हे छत्रपती घराण्याचा सन्मान करतील.
"माझी मुख्यमंत्री उद्धवजींशी सविस्तर चर्चा झाली आहे. सविस्तर बोलणं झालं आहे. पुढे काय करायचं आहे ते सविस्तर ठरलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्या प्रमाणे करतील. मला हा देखील विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील," असं संभाजीराजे म्हणाले.
राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या संदर्भातील चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजेंना 'वर्षा'वर येण्याचं निमंत्रण दिलं होतं. आज (23 मे) ही भेट होणार होती. मात्र, संभारीराजे त्यांना भेटले नव्हते. राज्यसभेबाबत त्यांची
राज्यसभेसाठी संभाजीराजेंनी शिवसेनेत यावे अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे तर संभाजीराजेंना असं वाटतं की महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा द्यावा.
तेव्हा संभाजीराजे हे शिवबंधन बांधणार की स्वतंत्र राहणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 24 मे रोजी या राज्यसभा निवडणूकीची अधिसूचना जारी होऊन 13 जूनला ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यात संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढविणार आहेत.
पण त्यासाठी संभाजी राजे छत्रपती यांना सर्वपक्षीय आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यांनी राज्यातील सर्व अपक्ष आमदारांना पत्र लिहून त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.
आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपला 2, शिवसेनेला 1, कॉंग्रेसला 1, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 अशा जागा मिळू शकतात. राज्यसभेसाठी निवडून येण्यासाठी 41 आमदारांच्या मतांची गरज आहे.
महाविकास आघाडीकडे 27 मतं अतिरिक्त आहेत तर भाजपकडे 22 मतं बाकी राहतात. त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांच्या उरलेल्या संख्याबळाने जर संभाजी राजेंना पाठिंबा दिला तर संभाजी राजे निवडून येऊ शकतात.
तसं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी यापूर्वी केलं आहे. 12 मे रोजी संभाजीराजेंनी 'स्वराज्य' नावाच्या संघटनेची घोषणा केली. त्याचबरोबर राज्यसभेची निवडणूक ही अपक्ष लढणार असून सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा देण्याचं आवाहन केलं.
राज्यसभा निवडणुकीचं स्वरुप
राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणजेच वरीष्ठ सभागृह किंवा काऊन्सिल ऑफ स्टेट्स असंही संबोधलं जातं. पण वरीष्ठ सभागृह असं संबोधण्यात येत असलं तरी राज्यसभेच्या तुलनेत लोकसभेचे अधिकार थोडे जास्त आहेत.
राज्यसभेत जास्तीत जास्त 250 जागा असू शकतात. यापैकी 12 सदस्य राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जातात. तर 236 सदस्य देशातील सर्व राज्यांतून आणि 2 सदस्य केंद्रशासित प्रदेशांतून निवडले जातात.
सध्या राज्यसभेची सदस्य संख्या 245 इतकी आहे. यापैकी 233 सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. तर 12 सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात.
राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले उमेदवार प्रामुख्याने कला, विज्ञान, सामाजिक कार्य अशा क्षेत्रांशी निगडीत असतात. अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना राष्ट्रपतींनीच राज्यसभेकरिता नामनिर्देशित केलं होतं, हे आपल्याला आठवत असेल.
राज्यसभा स्थायी सभागृह आहे. हे कधीच भंग होत नाही. भारताचे उपराष्ट्रपती या सदनाचे सभापती असतात. इथल्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतो. त्यांच्या जागी नवे उमेदवार राज्यसभेवर निवडून जातात.
भारतीय संविधानातील कलम 84 नुसार राज्यसभा सदस्यत्वासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
संबंधित उमेदवार देशाचा नागरिक असावा ही पहिली अट आहे. त्याने वयाची 30 वर्षं पूर्ण केलेली असावीत. तसंच संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्याने पूर्ण केल्या पाहिजेत.
राज्यसभेत कोणत्या राज्यातून किती जागा निवडून जातील हे त्या राज्याच्या लोकसंख्येवरून ठरवलं जातं.
राज्यसभेच्या सदस्यांची निवड विधानसभेत निवडून गेलेल्या आमदारांकडून केली जाते. प्रत्येक राज्यातील विधानसभा आमदारांची संख्या तिथल्या लोकसंख्येवर आधारित असते.
उदाहरणार्थ, महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा आहेत. उत्तर प्रदेशात त्या 31 आहेत. अरूणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मेघालय, गोवा, मिझोरम, सिक्कीम, त्रिपुरा यांसारख्या लहान राज्यांमध्ये प्रत्येकी एक जागा आहे.
पण राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असते.
राज्यसभा निवडणूक विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला ठराविक मतं आवश्यक असतात. या मतांची संख्या जागेच्या संख्येवर अवलंबून असते. ही निवड प्रक्रिया आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊ.
महाराष्ट्रात 288 विधानसभा आमदार आहेत तर राज्यसभेच्या एकूण 19 जागा आपल्या राज्यात आहेत.
पण एकाच वेळी सर्वच्या सर्व जागांवर राज्यसभेच्या निवडणुका होत नसतात. ठराविक कालावधीनंतर ठराविक जागांसाठी निवडणूक होते.
राज्यसभा निवडणुकीसाठीच्या जागांच्या संख्येत 1 ही संख्या मिसळून विधानसभेच्या जागांच्या संख्येला या संख्येने विभाजित केल्यानंतर विजयासाठी आवश्यक ती मतसंख्या आपल्याला मिळते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)