मराठा आरक्षण: संभाजीराजे छत्रपती यांचे भाजपशी नेमके संबंध काय आहेत?

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

संभाजीराजे छत्रपती सध्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसत आहेत.

पण, तुम्ही हे नेतृत्व भाजपचे खासदार म्हणून करताय की छत्रपती म्हणून करता? असा प्रश्न बीबीसी मराठीनं त्यांना विचारला असता ते म्हणाले की, "मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. नरेंद्र मोदींनी माझी शिफारस केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण भाजपची भूमिका मला लागू होत नाही."

संभाजीराजेंच्या या प्रतिक्रियेमुळे आणि त्यांनी अद्याप अधिकृतरीत्या भाजपमध्ये प्रवेश न केल्यामुळे त्यांचे भाजपशी संबंध आहेत तरी काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.

संभाजीराजे आणि भाजप

संभाजीराजे यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड झाल्यानंतर (2016) त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

तसंच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनी (6 मे, 2020) रोजी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटवरून वाद निर्माण झाला होता.

शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक 'कार्यकर्ते' असा केल्यानं फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी अशी मागणी करणारं ट्वीट त्यावेळी संभाजीराजे यांनी केलं होतं.

संभाजीराजे यांच्या ट्वीटला उत्तर देत फडणवीस यांनी या सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली होती.

सप्टेंबर 2019मध्ये पोलंडचे उप-पंतप्रधान अ‍ॅँडरेज ड्युडा कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार होते. त्यावेळी राजशिष्टाचारानुसार त्यांचं यथोचित स्वागत करण्याची मागणी संभाजीराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ती मान्य करत तशा सूचना फडणवीसांनी दिल्या होत्या.

याशिवाय विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीवेळीही (2018) संभाजीराजेंनी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार शिवाजी सहाने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घडवून आणली होती. ही निवडणूक शिवसेनेनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संभाजीराजे हे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये फुट पाडत असल्याचं बोललं जात होतं.

या अशा घटनांमुळे संभाजीराजे आणि भाजप यांच्यातील सलोख्याचे संबंध दिसून आले.

पण, आता मराठा आंदोलनाच्या वेळेस मात्र भाजपची भूमिका मला लागू होत नाही, असं ते म्हणत आहे.

त्यामुळे मग संभाजीराजे आणि भाजप यांचे संबंध नेमके कसे आहेत, असा प्रश्न आम्ही कोल्हापूरमधील ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांना विचारला.

भाजपच्या बाजूनं राजकारण?

देसाई म्हणाले, "संभाजीराजे यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं की, आजपर्यंत आम्हाला वाटायचं छत्रपती पेशवे नेमतात, पण आता तर छत्रपतींना फडणवीस खुर्चीवर बसवायला लागलेत. याचा अर्थ संभाजीराजे हे भाजपच्या ओंजळीतनं पाणी प्यायलेत, असा होतो. ते कितीही म्हणत असले की मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, तरी राष्ट्रपती भवनापर्यंतचा रस्ता त्यांना भाजपनेच तयार करून दिला आहे. ते काही जनतेतून निवडून आलेले नाहीत."

दुसऱ्या एका राजकीय विश्लेषकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की "संभाजीराजे आणि उदयनराजे या दोन्ही राजांचं राजकारण समजून घेतलं पाहिजे. लोकमत भाजपच्या बाजूला म्हणून भाजपमध्ये गेलं पाहिजे असं त्यांना वाटलं आणि ते भाजपमध्ये गेले. दुसरं म्हणजे भाजप आपल्या हितसंबंधांचा संरक्षण करतं, हे दोघांनाही ठाऊक असल्यामुळे ते भाजपमध्ये गेले. त्यामुळे ते काही सर्वसामान्यांसाठी आरक्षणाचा लढा लढत असल्याचं दिसत नाही. या दोघांचं राजकारण हे भाजपच्या बाजूचं राजकारण आहे.

"कारण सर्वसामान्यांसाठीचं राजकारण करायचं असतं तर आरक्षणाच्या प्रश्नातून मार्ग कसा काढायचा, समाजाला एकत्र कसं आणायचं यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते, पण तसं न करता ते फक्त भाषण देताना दिसत आहेत. यामुळे हे काही सर्वसामान्यांच्या हितसंबंधांसाठीचं राजकारण नाहीये."

मराठा आरक्षणाच्या आताच्या आंदोलनात भाजप विरोधी पक्ष म्हणून तरुणांच्या भावनांना हात घालण्याचं काम करू शकतं. पण त्यांच्याकडे या आंदोलनाचं नेतृत्व करणारा नेता नसल्याचं चित्र आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व या मराठा तरुणांना मान्य असेल की नाही, असाही प्रश्न आहे. त्यामुळे मग संभाजीराजे यांच्यामार्फत भाजप आपली भूमिका पुढे नेत आहे का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

'उदयनराजे आंदोलनाचं नेतृत्व करतील'

येणाऱ्या काळात भाजपच्या वतीनं उदयनराजे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करतील, असं मत 'पुण्य नगरी'च्या सातारा आवृत्तीचे वृत्त संपादक विनोद कुलकर्णी व्यक्त करतात.

ते म्हणतात, "संभाजीराजे सगळीकडे माध्यमांना सांगत आहेत की, मी राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहे आणि तो माझा सन्मान आहे. यातून ते एकप्रकारे भाजपचा उल्लेख टाळून आपण समाजाचं नेतृत्व करू पाहत आहेत, असा संदेश द्यायचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे त्यांच्या या भूमिकेमुळे भाजप त्यांना मराठा आरक्षणप्रश्नी जवळ करणार नाही, अशी चिन्हं आहेत. त्यामुळे संभाजीराजे भाजपच्या वतीनं बोलताहेत असं म्हणता येणार नाही.

"दुसरं म्हणजे भाजपच्या वतीनं उदयनराजे भोसले हे मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करतील अशी दाट शक्यता आहे. कारण पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा संघटनांची साताऱ्यात बैठक बोलावण्याचं त्यांचं नियोजन आहे. त्यानंतर तेच या आंदोलनाचा सर्वमान्य चेहरा होतील," कुलकर्णी सांगतात.

सुभाष देसाई यांच्या मते संभाजीराजे सध्या कात्रीत सापडले आहेत.

ते सांगतात, "संभाजीराजे सध्या गोंधळाच्या स्थितीत असल्याचं जाणवतं. उदयनराजेंच्या वक्तव्यावरून मात्र ते भाजपची भाषा बोलत आहे, हे स्पष्ट जाणवतं. पण संभाजीराजेंच्या बाबतीत तसं म्हणता येणार नाही. संभाजीराजेंची स्थिती कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून जनतेची सहानुभूती मिळवायची की खासदारकी जाऊ नये, यासाठी प्रयत्न करायचे, अशा द्विद्धा मनस्थितीत ते आहेत."

दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजाणीला स्थगिती दिल्यानंतर संभाजीराजेंनी म्हटलं होतं की, यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल.

त्यांनी ट्वीट करत म्हटलं होतं, "मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारी पूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)