You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरेंना 'मारण्या'साठी आलेल्या बिहारी तरुणाचं जेव्हा पोलिसांनी एन्काउंटर केलं होतं..
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
वर्ष 2008...राहुल राज हा 25 वर्षीय युवक मुंबईत आला होता.
बिहारमधून मुंबईत आलेल्या या तरुणाचं उद्दिष्ट हे रोजगार किंवा इतर नव्हतं...त्याचा मुंबईत येण्याचा उद्देश होता राज ठाकरे.
रेल्वे परिक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केल्यानंतर राज ठाकरेंना मारण्याच्या उद्देशानं तो मुंबईत आला होता.
त्याने बसमधील प्रवाशांना ओलीस धरलं होतं. मुंबई पोलिसांनी राहुल राजचा एन्काउंटर केला. पण, पोलिसांच्या या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
काय झालं होतं त्या दिवशी?
तारीख - 27 ऑक्टोबर 2008
वेळ- सकाळी 9.30 वाजताची
आठवड्याचा पहिलाच म्हणजे सोमवारचा दिवस. रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू झाली होती. प्रवाशांनी गच्च भरलेल्या बेस्ट बसेस रस्त्यावर धावत होत्या.
यातलीच एक बस होती... बस क्रमांक 332... या डबलडेकर बसचा रूट होता अंधेरी स्टेशन ते कुर्ला.
मुंबईतील सर्वांत जास्त प्रवासी संख्या असलेल्या रूटपैकी एक. सकाळची वेळ असल्याने ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांनी बस भरली होती. काही वेळातच, 9.15 मिनिटांनी बस साकीनाका परिसरातील जरी-मरी स्टॉपवर पोहोचली. विशीतील एक युवक बसमध्ये चढला आणि अपर-डेकवरमध्ये जाऊन बसला.
हा युवक होता 25 वर्षांचा राहुल राज. पाटन्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसचा विद्यार्थी आणि X-Ray टेक्निशिअन. बस क्रमांक 332च्या अपर-डेकवर महेंद्र हुले कंडक्टर होते. त्यांनी तिकीट विचारलं. पण त्याने उत्तर दिलं नाही. कंडक्टरच्या मागच्या सीटवर जाऊन तो चूपचाप बसून राहिला.
घटनेच्या दिवशी प्रसारमाध्यमांशी बोलताना महेंद्र हुले म्हणाले होते, "त्याने हातातील चेनच्या मदतीने माझा गळा आवळला. मला पोलीस आयुक्तांशी बोलायचं आहे, असं तो वारंवार ओरडून सांगत होता. त्याने, प्रवाशांकडून मोबाईल फोनची मागणी केली. पण, कोणीच त्याला फोन दिला नाही. त्याने मला प्रवाशाकडून फोन आणण्यासाठी सांगितलं. पण, मी जीव वाचवून बसमधून बाहेर पडलो."
बसच्या लोअर-डेकवर शिवाजी बोराडे कंडक्टर होते. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. "मी आवाज ऐकून वर गेलो. पण वर येऊ नका, अशी या युवकाने धमकी दिली. मी धावत खाली आलो. ड्रायव्हरला बस थांबवण्यासाठी सांगितलं. प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं आणि धावत जाऊन जवळच्या पोलीस चौकीत माहिती दिली."
हा थरार सुरू असतानाच बस कुर्ला बैल बाजार परिसरात पोहोचली. हा परिसर दाटीवाटीचा आणि कायम वर्दळीचा. त्यामुळे, एकच गोंधळ उडाला. रस्त्याच्या मधोमध बस उभी होती आणि आजूबाजूच्या इमारतीतील लोक घटना पहात होते. काहींनी ही घटना त्यांच्याकडील कॅमेऱ्यात कैद केली.
राहुल राजचा एन्काउंटर
एका माथेफिरूने बसमध्ये प्रवाशांना ओलीस धरलं आहे. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचली. ही घटना कव्हर करणाऱ्या पत्रकारांमध्ये मी देखील एक होतो.
पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, एका युवकाने बसमधील प्रवाशांना ओलीस धरलं आहे. त्याच्याकडे पिस्तूलही आहे. तो कोण आहे, कशासाठी त्याने प्रवासी ओलीस धरलेत. काहीच माहिती नाही.
राहुल राजने प्रवाशांना ओलीस धरून जवळपास 20 मिनिटं झाली असतील. मुंबई पोलिसांची टीम 9.35 च्या आसपास सहाय्यक पोलीस आयुक्त मोहम्मद जाधव यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी पोहोचली.
या युवकाकडे पिस्तूल होतं. बूलेटप्रूफ जॅकेट घातलेल्या जवळपास 100 पोलिसांनी बसला वेढा दिला. संपूर्ण रस्ता कॉर्डनऑफ करण्यात आला. बसमधून बाहेर पडलेले प्रवासी आणि कंडक्टर यांच्याकडून पोलीस नक्की काय झालंय याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होते.
घटनास्थळी पोहोचेपर्यंत पोलिसांकडून माहिती मिळाली की, या युवकाने प्रवाशाला ओलीस धरलंय. हवेत गोळीबार केलाय, एक गोळी प्रवाशाच्या पायात घुसली आहे. त्याने एका प्रवाशाला 10 रुपयाच्या नोटेवर काहीतरी लिहायला सांगितलं. आणि 10 रूपयाची नोट खाली फेकली. नंतर या प्रवाशाचं नाव मनोज भगत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांच्या माहितीनुसार, 10 रुपयाच्या या नोटेवर लिहिण्यात आलं होतं, "मी पाटण्याहून राज ठाकरे यांचा बदला घेण्यासाठी आलोय. मला त्यांना मारायचंय. मला इतर कोणालाही मारायचं नाही." त्यावेळी, विशीतला हा युवक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मारण्यासाठी आला होता याची पोलिसांना माहिती मिळाली.
कुर्ल्याला पोहोचण्याआधी रस्त्यात असतानाच बातमी आली, पोलिसांनी राहुलला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. पण, त्याने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत राहुल राज जखमी झालाय. नंतर पोलीस राहुल राज आणि जखमी प्रवासी दोघांनाही उपचारासाठी घेऊन गेले आहेत.
कॅमेऱ्यात कैद झाला होता तो घटनाक्रम
घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रत्यक्षदर्शी, पोलीस, बसमधील प्रवासी, कंडक्टर यांची मुलाखत घेण्यास सुरूवात झाली. इतरही मीडियाचे रिपोर्टर्स, फोटोग्राफर्स त्याठिकाणी पोहोचू लागले.
राहुलने ओलीस धरलेल्या या बससमोर एक इमारत होती. यातील एका रहिवाशाने हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद केल्याचं सांगितलं. मी तातडीने धावत त्याच्याकडे गेलो आणि शूट केलेल्या घटनाक्रमाची टेप मिळवली.
व्हीडिओत हातात बंदूक घेतलेल्या राहुल राजचा चेहरा स्पष्ट दिसत होता. काळा शर्ट घातलेल्या राहुलने खिडकीतून हात बाहेर काढून बंदूक कोणाच्यातरी दिशेने रोखून धरली होती. बहुदा पोलिसांच्या दिशने असावी. तो एक सीटवरून दुसऱ्या सीटवर जात होता. तर, पांढरा शर्ट घातलेला एक प्रवासी खिडकीला पाठ टेकवून बसलेला दिसून आला. एका खिडकीची काच फुटली होती.
फुटेजमध्ये आवाज ऐकू येत नव्हता. पण, राहुल ओरडून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसून येत होता. राहुल एका हातात बंदूक धरून दुसऱ्या हातेने इशारा करून "मला फोन हवाय" असा वारंवार सांगत होता.
या व्हीडिओमध्ये पोलिसांनी बसला गराडा घातल्याचंही दिसून आलं. राहुल हातवारे करून बसजवळ येऊ नका असं पोलिसांना बजावत होता. राहुलने हवेत गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईने घाबरून त्याने बसच्या खिडक्या बंद करण्यास सुरूवात केली.
राहुलने प्रवाशांना ओलीस धरल्यापासून त्याच्या एन्काउंटर प्रर्यंतचा हा थरार 20 मिनिटं सुरू होता.
'राहुलला आत्मसमर्पण करण्यासाठी सांगितलं'
दरम्यान, पोलीस अधिकारी बसच्या मागून हळूहळू बसपर्यंत पोहोचले. त्यांनी राहुलला सरेंडर होण्यास सांगितलं. पण, त्याने ऐकलं नाही. पोलिसांनी गोळ्या झाडल्या. राहुल जबर जखमी झाला. त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. पण, त्याचा मृत्यू झाला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना घटनास्थळी कारवाईत उपस्थित सहाय्यक पोलीस आयुक्त मोहम्मद जावेद म्हणाले होते, "पोलिसांनी त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी सांगितलं होतं. पण, त्याने सरेंडर केलं नाही. त्याने फायरिंग सुरू केलं. त्यामुळे पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या."
बसमधील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्याच्याकडे कोणती बंदूक होती याची माहिती नव्हती. प्रवाशांना वाचवण्यासाठी फायरिंग करावी लागली, असा दावा मुंबई पोलिसांनी केला.
राहुलचा एन्काउंटर केल्यानंतर त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला होता.
पोलीस उपायुक्त मिलिंद भारंबे त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते, "राहुलने मनोज भगत यांना नोटेवर हिंदीत लिहायला सांगितलं. मला पोलीस आयुक्तांशी चर्चा करायची आहे. त्यानंतर त्याने एक नोट खाली टाकली. त्यात लिहिलं होतं. मला राज ठाकरे यांच्याशी बदला घ्यायचा आहे. इतर कोणालाही मारायचं नाही."
मुंबई पोलिसांनी राहुल राजवर 13 बुलेट्स फायर केल्या. तर, राहुलने चार गोळ्या फायर केल्या होत्या.
राहुलच्या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह
मुंबई पोलिसांनी राहुल राजचा एन्काउंटर केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. राज्य मानवाधिकार आयोगाकडे याबाबत तक्रार करण्यात आली. राहुल राजला पोलिसांनी आत्मसमर्पण करण्याची योग्य संधी दिली नाही, असा आरोप करण्यात आला.
मुंबई पोलिसांकडे अशा प्रकारे लोकांना ओलीस ठेवलं असेल तर त्या व्यक्तीसोबत वाटाघाटी करण्यासाठी एक टीम आहे. या टीमचा निगोसिएशनसाठी वापर का केला गेला नाही? राहुल राज पोलीस आयुक्तांशी बोलायचं आहे. राज ठाकरे यांच्याशिवाय कोणालाही इजा करायची नाही, असं वारंवार सांगत असतानाही एन्काउंटर हा एकच पर्याय पोलिसांसमोर होता? असे अनेक सवाल उपस्थित झाले.
पोलिसांवर प्रश्न उपस्थित झाल्यनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी मीडियासमोर आले. त्यांनी दावा केला, "राहुलच्या हातात बंदूक होती आणि तो गोळीबार करत होता. त्याने बसमधील शिड्यांवर प्रवाशाला ओलीस धरलं होतं. त्याने सरेंडर करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर फायरिंग करावी लागली."
राहुल राजने पोलिसांवर थेट गोळ्या झाडल्या नाहीत. ही गोष्ट पोलिसांनी मान्य केली होती. पण, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं असंही होतं, "पोलिसांनी फायरिंग केली नसती आणि राहुलने प्रवाशाला ठार केलं असतं तर? सर्वांनी पोलिसांवर हजारो प्रश्न उपस्थित केले असते."
घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी त्याच्याशी चर्चा करणं गरजेचं होतं. तो दहशतवादी नक्कीच नव्हता. पण, त्यावेळी परिस्थिती काय होती हे फक्त त्यांनाच माहीत. त्यामुळे, हा एका क्षणात घेतलेला निर्णय होता.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उपस्थित केले प्रश्न
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राहुल राजच्या एन्काउंटरच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित केले होते. राहुल राजच्या वडिलांना केलेल्या तक्रारीनंतर याबाबत चौकशी करण्यात आली.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मुंबई पोलिसांच्या थिअरीवर सवाल विचारत महाराष्ट्र सरकारला उत्तर देण्याचे आदेश दिले होते. राहुल उंचीवर होता, तर पोलीस अधिकारी खाली उपस्थित होते. राहुलच्या शरीरात शिकलेल्या बुलेट्स उंचावरून फायर करण्यात आल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं.
या घटनेचे पडसाद दिल्लीतही उमटले. लालू प्रसाद यादवांसारख्या नेत्यांनी राहलच्या एन्काउंटरच्या चौकशीची तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडे मागणी लावून धरली होती. तर, राज्य सरकारने निवृत्त मुख्य सविच जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली होती.
या घटनेची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचने केली होती. या प्रकरणी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना क्लिनचीट देण्यात आली होती.
राहुल राजचे वडील कुंदन प्रसाद सिंह यांनी पटना हायकोर्टात या एन्काउंटरच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)