पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर उभं रहावं ही तर पुलंची इच्छा

- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून
पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराचं नाव हे मराठी नाट्यसृष्टीच्या प्रत्येक रसिकाला परिचयाचं आहे. संगीत रंगभूमीवरचे नटसम्राट नारायणराव राजहंस ज्यांना बालगंधर्व म्हणून ओळखलं जातं, यांच्या नावाने हे रंगमंदिर उभं राहिलं.
पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या इमारतीचे काम पूर्ण झालं. यामुळे रसिकांच्या भावना या रंगमंदिराशी सहजपणे जोडल्या गेल्या.
रसिक आणि कलाकारांच्या मनावर कोरल्या गेलेल्या या वास्तूचे अजून किती दिवस शिल्लक आहेत हा प्रश्न आहे कारण, बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा आराखडा आता तयार झाल्याचं पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नवीन बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीसाठी सकारात्मकता दाखवल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
बालगंधर्व नाट्यगृहाच्या निर्मितीचा इतिहास रंजक आहे. तेव्हाचं पुणे हे 1961 साली पानशेत धरण फुटल्यामुळे आलेल्या आपत्तीमधून सावरत होतं. अशातच मुठा नदीच्या काठावर विस्तीर्ण जागेत अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असं एक नाट्यगृह बांधावे अशी संकल्पना जेव्हा पूढे आली तेव्हा त्याला विरोध झाला. काहींनी शहरापासून दूर असल्याचं कारण सांगितलं. तर काहींनी त्या भागातले झोपडपट्टीवासी कुठे जातील असा प्रश्न उपस्थित केला. अखेर 8 ऑक्टोबर 1962 झाली खुद्द बालगंधर्व यांच्याच उपस्थितीमध्ये या इमारतीचं भूमिपूजन झालं.

"मोठ्या मेकअप रुम, प्रशस्त स्टेज, एवढा मोठा रंगमंच आधी कुठल्याही नाट्यगृहाला नव्हता. भिंती, एक स्टेज आणि भोवताली गर्दी अशी परिस्थिती होती. तेव्हा भरत नाट्यमंदिरच अस्तित्वात होतं. बाकी तात्कालिक, हौशी नाट्यगृहं असायची. छान नदीकाठी प्रशस्त जागेमध्ये एक अत्याधुनिक आणि सर्व प्रकारच्या सोयींनीपुरक रंगमंदिर ऊभारलं जावं अशी संकल्पना होती. ऐसपैस रंगमंच आणि त्याच्याशी निगडीत कलावंतांचे कार्यक्रम बाजूला करता येतील अशा पद्धतीचं ऊभारलं जावं अशी पुलंची इच्छा होती. सुरुवातीला विरोध झाला. कारण नदीकाठची इतकी उत्तम जागा अख्खी फक्त थिएटरलाच द्यायची हे पचनी पडलं नाही ," ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी ही माहिती दिली.
या रंगमंदिराला स्वतःचं नाव देण्याची परवानगी बालगंधर्व यांनी दिली.
"पुलंच्या संकल्पनेमधून बालगंधर्व रंगमंदिराची पायाभरणी झाली. भुजंगराव कुलकर्णी तेव्हा पुण्याचे कमिशनर होते. तेव्हा याला थोडा विरोध झाला. हे पालिकेचे काम नाही असं सूर आला. रस्ते बांधणे, दवाखाने बांधणे, शाळा बांधणे, बगीचे तयार करणे, एवढंच काम पालिकेनं करावं असं काहींनी म्हटलं. पण पुलंनी सांगितलं की, ज्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं त्या बालगंधर्वांचं स्मारक व्हायलाच हवं.

ते पुण्यातच व्हायला हवं कारण त्यांचा जन्म पुण्याचा. त्यांना लोकमान्य टिळकांनी बालगंधर्व ही उपाधी ही पुण्यातच दिली. गंधर्व नाटक मंडळीची स्थापना पुण्यातच झाली. ते अखेर अनंतात विलीन झाले ते पुण्यातच. त्यामुळे पुणे शहरात त्यांचं स्मारक व्हावं अशी फार इच्छा होती," ज्येष्ठ निवेदिका, अभिनेत्री आणि बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस यांनी सांगितलं.
रंगमंदिराचं काम पूर्ण होऊन त्याचं उद्घाटन होईपर्यंत बालगंधर्व हयात नव्हते. 26 जून 1968 रोजी बालगंधर्व यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याहस्ते बालगंधर्व रंगमंदिराचं उद्घाटन झालं.
सुधीर गाडगीळ बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "बालगंधर्वाचा उद्घाटन सोहळा फार देखणा झाला. स्वतः पुलंनी त्याचं सुत्रसंचलन केलं. त्यांनी सुरुवात फार छान केली. ते म्हणाले की बाहेरच्या वेशात पुरुषांच्या वेशातील स्त्री आहे झाशीची राणी आणि आतल्या बाजूला स्त्रीच्या वेशातला पुरुष आहे बालगंधर्व.. अशी दोन रुपं जिथे एकवटली आहेत अशा ठिकाणी नटरंगांचं मंदिर उभारलं जातंय ही फार आनंदाची बाब आहे.
अलिकडे नटेश्वर आहे, पलिकडे ओंकारेश्वर आहे मधून जीवनाची सरिता वाहतेय.. आमचे महापौर त्यावर पूल टाकणार आहेत. माझी त्यांना विनंती आहे की हा पूल एकतर्फी असू द्या ओंकारेश्वर स्मशानाकडून नटेश्वराकडे येणार असू द्या. त्यानंतर गाण्याचे कार्यक्रम झाले."
ज्येष्ठ चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांनी रेखाटलेली बालगंधर्वांची दोन तैलचित्र रंगमंदिराच्या समोरच्या भागात ठेवण्यात आली. स्वयंवर नाटकातील रुक्मिणीच्या वेषातील बालगंधर्व आणि पुरुषाच्या वेषातील बालगंधर्व अशी ही दोन चित्र आहेत. हळूहळू बालगंधर्वाचा प्रतिसाद वाढू लागला. मागच्या 50 वर्षांत तर ही वास्तू नाट्यप्रेमी आणि कलाकारांच्या आयुष्यातील अविभाज्य अंग बनली. शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या एका विस्तिर्ण परिसरातील ही इमारत फक्त कला आणि नाट्याचे सादरिकरणच नव्हे तर विसाव्याचे काही क्षण घेण्याचीही जागा बनली.

"अनेक कलाकारांचं करिअर त्या रंगमंदिरात घडलंय. कलाकारांच्या दृष्टीने बालगंधर्व हे देवच आहेत. त्यामुळे अनेक नट, गायक यांच्यासाठी ते नाट्यगृह म्हणजे मंदिरच आहे. तो सांस्कृतिक ठेवा आहे. पुर्ण महाराष्ट्रात अत्यंत सुबक आणि देखणं म्हणून त्याची गणना होते. बालगंधर्व स्वतः भूमिपुजनाला हजर होते. त्यामुळे भावनिक वेगळा टच आहे," असं बालगंधर्वांचे नातू किशोर वसंत राजहंस म्हणाले.
पण आता मात्र हे बालगंधर्व रंगमंदिर पाडून तिथे नवीन इमारत उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हे व्हायला हवं की नको यावर नाट्यप्रेमींची वेगवेगळी मतं आहेत.
"आता तो पाडण्याचा विचार सुरु आहे. मला वाटतं की हा नगरसेवकांचा पैश्यांसाठीचा ऊद्योग आहे. रिनोव्हेट करा. पाडायची काय गरज आहे? मला भीती वाटते की, मॉलसारखी रचना इथे होईल आणि तिथे नाटक काही होईल की नाही अशी भीती आहे. थोडी ऐसपैस जागा राहू द्या तेवढ्या जागेमुळे अख्या पुण्याचं काही अडत नाही," असं मत सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केलं.
"कलाकारांचा पुनर्विकासासाठी विरोध यासाठी आहे की, जर रंगमंदिर पाडलं आणि परत लवकर ऊभारणी झाली नाही तर काय करायचं? या कोरोनामुळे दोन वर्ष सगळंच बंद होतं. बालगंधर्व पाडलं, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचं काम अजूनही सुरुच आहे. मग प्रयोग करायचे कुठे. त्यामुळे तशी आधी पर्यायी व्यवस्था करा अशी मागणी आहे. नवीन व्हायला पाहीजे याचा मला पाठींबा आहे. नवीन झालं तर बरेच प्रश्न सुटतील. माॅल करुन कुठेतरी छोटंसं थिएटर करावं असं व्हायला नको. दुकानं, खाण्याची ठिकाणं फक्त होतील असं नको. हे एक बालगंधर्वांचंच स्मृतीस्थळ राहायला हवं," असं अनुराधा राजहंस म्हणाल्या.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








