विशाखा नावाची 'सुभेदारी' महाराष्ट्राची हास्यजत्रातून संपते तेव्हा....

विशाखा सुभेदार, टीव्ही, मालिका, मनोरंजन

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, विशाखा सुभेदार
    • Author, रोहन नामजोशी,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.

विशाखा आणि समीर असं युट्युबच्या सर्च विंडो मध्ये टाकलं की अनेक व्हीडिओ तुमचं स्वागत करतात. त्यातला एखादा व्हीडिओ लावायचा आणि हवा तितका वेळ खोखो हसत सुटायचं. लॉकडाऊन च्या कठीण काळात समीर विशाखा नावाचं जे व्यसन लागलं ते लागलंच.

विशाखा सुभेदार. एक भारदस्त व्यक्तिमत्व, पाणीदार बोलके डोळे, खणखणीत आवाज, ज्या भूमिकेत टाकलं त्या भूमिकेशी एकरुप होणार आणि प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा पटकवणार. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात आता विशाखा नसेल त्यामुळे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचं हसू किंचित मावळलं तरी तिने जे करून ठेवलं आहे ते कालातीत आहे.

'फू बाई फू', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' अशा अनेक कार्यक्रमातून ती आपल्याला भेटते. समोर कोणीही असला तरी तिच्या अभिनयाला बहार येते. तिच्या भूमिका फक्त विनोदाच्या साच्यात अडकलेल्या नाहीत. 'का रे दुरावा' मालिकेत तिने गंभीर भूमिकाही तितकीच भाव खाऊन गेली आहे. 'तुझं काय करू गं रजनी' हा तिचा डायलॉग सदोदित आठवत असतो.

समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांची जोडी केवळ अफलातून आहे. 'जाऊया गप्पांच्या गावा' या त्यांच्या सेगमेंट मधून या दोघांनी धमाल उडवून दिली आहे. विशाखा एखादी पाहुणी असणार, समीर मुलाखतकार असणार आणि मग तो तिची रेवडी उडवणार आणि विनोदाची कारंजी फुलणार आणि फुलतच राहणार. वालिद हे स्किट अतिशय विशेष. त्यात विशाखा एक प्रथितयश गायिका असते.

समीर तिची मोडक्या तोडक्या मराठी हिंदीत मुलाखत घेतो. हे स्किट क्षणोक्षणी म्यूट करून पाहिल्याशिवाय पुढे जाणं केवळ अशक्य. समीर कायम पडकी भूमिका घेतो, मात्र करत नाही. साडे पंधरा तास चर्चा, उगाचच चुकीची नावं घेणं एक ना अनेक.

जाऊया गप्पांच्या गावा बरोबरच, ऑफिसमधली खडूस बॉस, पत्नी, बाबू बाबू करून मुलाला मुठीत ठेवणारी सासू, कधीही शेजारच्या घरचा पिझ्झा खाणारी, कधी कॅटरिंग वाली बाई, किती स्किटची नावं घ्यावी. एखादा दिवस प्रचंड वैतागवाडा गेला की यापैकी कोणतंही स्किट लावलं की सगळा शीण निघून जातो.

विशाखा सुभेदार, टीव्ही, मालिका, मनोरंजन

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले

मंचावरचा सहज वावर हे विशाखाचं आणखी एक बलस्थान. कोणतीही भूमिका असली तरी अभिनयात कणभरही तडजोड दिसत नाही. कधी ती ढसाढसा रडून इतरांना बेजार करते, कधी खाष्ट बायकोच्या रुपात नवऱ्याला नामोहरम करते. ऑफिसमधली बॉस तर अफलातून. विशाखा अशी वेगवेगळ्या रुपात भेटत असते. तिच्या वजनावरून अनेक विनोद होत असतात. जवळपास प्रत्येक स्किटमध्ये ते असतातच.

'जाऊया गप्पाच्या गावा' मध्ये ती सोफ्यावर बसली रे बसली की समीर आपल्या शा‍ब्दिक भात्यातून तिच्या वजनावर एक तरी पंच घेतोच. कधी कधी तो खरंच खटकतो. पण शेवटी आपल्या कामाच्या ठिकाणी अशा अप्रिय गोष्टी होत राहतात. असं समजून हसून मोकळे होतो. तरीही विशाखा म्हणते त्याप्रमाणे दोन शरीरं एक मन होऊन जातात आणि प्रेक्षकांची मनं जिंकतात.

मात्र ही केमिस्ट्री फक्त समीर चौगुले बरोबरच नाही. तर वैभव मांगले, अंशुमन विचारे, मंगेश देसाई, भाऊ कदम, या कलाकारांबरोबर विशाखाने अनेक स्किट गाजवले आहेत. याबद्दल बोलताना विशाखाने बीबीसी मराठीच्या मुलाखतीत सांगितलं होतं की लेखकाच्या मनात जे असतं ते फुलवण्याचं काम आम्ही करतो. मी काही ग्रेट विनोदी अभिनेत्री आहे. पण या कलाकारांबरोबर काम करताना माझ्यात जसे बदल झाले तसेच त्यांच्यामध्येही झाले.

स्किट या कलाप्रकाराचा विचार केला असता तो एखाद्या ट्वेन्टी20 मॅच सारखा असतो. मोजक्या वेळेत एक वेगळं विश्व फुलवायचं असतं. ते एक प्रकारचं टीमवर्क असते. ती लय कुठेही बिघडली तरी स्किट पडण्याची शक्यता असते. त्यामुळे सहकलाकारांची केमिस्ट्री चांगली असणं अत्याधिक महत्त्वाचं असतं. विशाखा त्यात कुठेही कमी पडताना दिसत नाही. अनेकदा स्किट पाहताना आपसूकच निघतं की हे स्किट विशाखाने खाऊन टाकलं आहे.

समीर आणि विशाखाचं एक स्किट आहे. त्यात विशाखा एक कॅटरिंग वाली बाई आहे. लग्नाची पंगत बसली आहे. विशाखा पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था पाहते आहे. समीरला पंक्तीत ताट मिळत नाही आणि पुढे अनेक गमतीजमती होतात. या स्किटमध्ये अनेक कलाकार आहेत. ते फक्त जेवायचं काम करतात. मात्र समीर आणि विशाखाचा संवाद यात विशेष आहे. तिने या संपूर्ण वातावरणावर गारूड केलं आहे. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.

गेल्या दोन वर्षांत लॉकडाऊनमध्ये जग घरी बसून ख्या ख्या हसत असताना हास्यजत्रेची संपूर्ण टीम बायोबबल मध्ये काम करत होती. त्यावेळी येणाऱ्या अडचणींविषयी विशाखाने बीबीसी मराठीला सविस्तर सांगितलं होतं.

गेल्या काही महिन्यात विशाखा नावाचं हे वादळ कुठेतरी ओसरल्यासारखं वाटत होतं. इतर कलाकारांचे स्किट पाहताना तिचं हसू जरा कमीच झालं होतं. एक प्रेक्षक म्हणून हा बदल लक्षात येत होता. तरीही ती दिसली, तिच्या एखाद्या स्किटचं सजेशन आलं की लगेच पाहिल्याशिवाय मजाही यायची नाही. तरीही तिचं विशाखापण कुठेतरी हरवल्यासारखं वाटायचं.

शुक्रवारी तिने लिहिलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते कीआपली एक्झिट पण ध्यानात असायलाच हवी. "जा आत्ता "असं म्हणण्यापेक्षा. "अर्रर्रर्रर्र "हे ऐकायला जास्त छान वाटतं. त्याप्रमाणे आज विशाखा नसणार म्हटल्यावर 'अर्रर्रर्र' असं झालंच पण त्याला इलाज नाही.

विशाखा या शब्दाचा अर्थच 'नक्षत्र' असा आहे. विशाखाने आपल्याला विनोदी नक्षत्रांचा मनमुराद आनंद दिला त्याकरता तिचे आभार मानावे तितके कमीच आहे खरंतर. तिची इथली सुभेदारी संपली असली तरी उत्तम अभिनयाची मक्तेदारी कधीच संपणार नाही याची खात्री वाटते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)