दीपिका,अनुष्का, अक्षय, रणवीरसारखे स्टार्स त्यांचा पैसा कुठे गुंतवत आहेत?

दीपिका पदुकोण

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, पराग छापेकर
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

बॉलीवूडच्या कोट्यधीश सिनेस्टार्सनी व्यवसायांमध्ये पैसे गुंतवणं ही काही आता नवी गोष्ट राहिलेली नाहीये.

अनेक दशकांपासून हे स्टार्स रिअल इस्टेटचाही व्यवसाय करत. त्यातल्या अनेकांनी वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये पैसे गुंतवले. पण गेल्या काही वर्षांपासून या कलाकारांचं स्टार्टअप प्रेम प्रचंड वाढलंय.

बहुतेक कलाकार तरी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करतायत आणि त्यांना त्याचा फायदाही झालाय.

कलाकार स्टार्टअपमध्ये शक्यतो एक ते पाच कोटी किंवा जास्तीत जास्त 10 कोटींची गुंतवणूक करतात. कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे ही त्यांच्यासाठी नवीन गोष्ट नाही. पण पूर्वी याबद्दल फारसं उघडपणे बोललं जात नव्हतं.

मात्र 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत बऱ्याच स्टार्टअप्सना प्रोत्साहन मिळालं. कलाकारांनी स्टार्टअप्समध्ये केवळ रसच दाखवलाय, केवळ हेच नाही तर त्यांनी त्याबद्दल खुलेपणाने बोलायला देखील सुरुवात केल्याचं दिसत.

स्टार्टअप्स मध्ये गुंतवणूक

स्टार्ससाठी हा एक गुंतवणुकीचा मार्ग असण्यासोबतच त्यांची इमेज पण या ब्रँडिंगशी जोडलेली असते. बरेचसे स्टार्स अशा उत्पादनांमध्ये रस दाखवतात ज्यामुळे त्यांची चाहत्यांमध्ये इमेज बिल्डिंग होईल.

कलाकारांना एंटरटेनमेंटच्या व्यवसायात गुंतवणूक करायला सुरक्षित वाटत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करून खात्रीशीर रिटर्न्स मिळतील असं ते बघतात.

अक्षयनं सोडलं मौन

फोटो स्रोत, Getty Images

दरवर्षी चार ते पाच चित्रपटांमध्ये काम करून कमाईच्या बाबतीत नंबर वन असलेला अक्षय कुमार डझनभर कंपन्यांना प्रमोट करतो. मात्र त्याने स्टार्टअप गुंतवणुकीसाठी फिटनेस कंपनीची निवड केलीय.

अक्षय कुमारने 2014 मध्ये स्थापन झालेल्या मुंबईतील हेल्थ-टेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली होती. ही कंपनी लोकांच ब्लड प्रेशर, रियल टाईम हार्ट रेट मॉनिटर करणारे फिटनेस डिव्हाईस बनवते.

टिकटॉकवर बंदी आल्यानंतर भारतातील एका देसी अॅपला खूप चालना मिळाली. त्यामुळेच सलमान खानने या कंपनीत भली मोठी गुंतवणूक केली.

पण हा बदल कसा झाला ?

आपला पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्याला जवळपास प्रत्येक बॉलीवूड स्टारची पहिली पसंती होती. जुन्यापासून नवीन कलाकारांपर्यंत सर्वचजण पॉश इमारती, व्हिला, फार्म हाऊस आणि जमिनींमध्ये गुंतवणूक करताना दिसून आलेत. आताचे कलाकार देखील या ओल्ड स्कूल बिजनेसला मोठ्या प्रमाणात सुरक्षित मानतात.

पण ऐंशी आणि नव्वदच्या दशकातल्या कलाकारांप्रमाणे एकाच प्रकारच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची आजच्या कलाकारांची इच्छा नाही. त्यांना फक्त स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उघडून चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये गुंतवणूक करायची नाही तर त्यांची बऱ्याच क्षेत्रात गुंतवणूक व्हायला लागली आहे.

किड्स अॅम्युझमेंट पार्क्सपासून ते रेस्टॉरंट, विविध खेळांचे प्रीमियर लीग संघ खरेदी करण्यापर्यंत, ते पैसे गुंतवत आहेत, म्हणूनच बॉलीवूडचे कलाकार स्टार्टअप्समध्ये वाढत्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

मिथुन चक्रवर्ती

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, मिथुन चक्रवर्ती

एक काळ असा होता जेव्हा ओरिजनल डिस्को किंग मिथुन चक्रवर्ती यांनी उटी येथील हॉटेल व्यवसायात गुंतवणूक केली होती. तोच आज त्यांच्या उत्पन्नाचा सर्वांत मोठा स्रोत आहे.

हृतिक रोशननेही फिटनेस स्टार्टअप्समध्ये रस दाखवलाय. तर सलमान खानचा बीइंग ह्युमन हा ब्रँड सर्वांनाच माहीत आहे.

अमिताभ बच्चन यांनी 1995 मध्ये ABCL नावाची कंपनी स्थापन केली होती. पण मिस वर्ल्डच्या आयोजनाच्या कार्यक्रमात त्यांच्या कंपनीच इतकं नुकसान झालं की त्यांच दिवाळं निघालं.

इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे की बॉलीवूड आता पूर्वीपेक्षा जास्त कॉर्पोरेट झालंय. दोन दशकांपूर्वी उत्पन्न आणि टॅक्सचा हिशेब आजच्यासारखा नव्हता, त्यामुळे बॉलीवूडचे श्रीमंत कलाकार हॉटेल्स किंवा बिल्डर्सकडे गुंतवणुक करायचे. पण आता यात खूप काही बदललंय.

एडलवॉयसचे कार्यकारी उपाध्यक्ष रोहित मेहता सांगतात, "बॉलिवुड मधील लोकांकडे खूप पैसा आहे. त्यात त्यांची काही गुंतवणूक बुडाली तरी ती मोठी गोष्ट नाही. त्यामुळे हे लोक चांगल्या रिटर्न्ससाठी काम करतात. त्यांचे वेल्थ मॅनेजरचं ही गुंतवणूक करतात."

रोहित सांगतात की, अर्थातच स्टार्टअप फंडिंगमध्ये बरीच सुधारणा झाली आहे आणि आता प्रत्येकजण हे करतोय. जर एखाद्या स्टारकडे 25-50 कोटी असतील आणि त्याने पाच-दहा स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली तर त्याला पूर्ण रिटर्न्स मिळतात.

फक्त अक्षय कुमारचं गुंतवणूकदार नाही...

दीपिका पदुकोणचं स्टार्टअप प्रेम अक्षयपेक्षा जास्त आहे. तिने बऱ्याच स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. दीपिकाने अलीकडेच किरकोळ ग्राहकोपयोगी वस्तू विकणाऱ्या स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवलेत.

दीपिका पदुकोण, बॉलीवूड, गुंतवणूक

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, दीपिका पदुकोण

याशिवाय तिने फर्निचर ब्रँड, सौंदर्य उत्पादनं इत्यादींमध्ये गुंतवणूक केली आहे. दीपिकाने एनर्जी सेव्हिंग टेक्नालॉजीने पंखे बनवणाऱ्या कंपनीतही पैसे गुंतवले आहेत.

बॉम्बे आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी हा स्टार्टअप सुरू केला आहे. यात 65 टक्के घरातील विजेची बचत करण्यासाठी पंखे बनवले जातात. तिचा पती रणवीर सिंग यानेही एडटेक सेक्टरमध्ये गुंतवणूक केली आहे.

अनुष्का शर्माने अल्टरनेटिव्ह मीट स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केलीय. तिचा पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यानेही या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली असून त्यांनी बंगळुरूस्थित एका टेक्नालॉजी कंपनीतही इन्व्हेस्टमेंट केली आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांना सुरुवातीपासूनच शेतीची आवड आहे. त्यांनी अॅग्रीटेक प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीकडे 30 लाख शेतकऱ्यांचं नेटवर्क आहे. पंकज त्रिपाठींच्या म्हणण्यानुसार, ते अगदी सुरुवातीपासूनच ब्रँडिंग आणि जाहिरातींच्या बाबतीत निवडक आहेत. ते त्यांच्या आवडीला प्राधान्य देतात.

पंकज त्रिपाठी सांगतात, "आयआयटी खरगपूरचे दोन विद्यार्थी मला येऊन भेटले. त्यांनी मला सांगितलं की, शेतकर्‍यांना शेतीसंबंधी अनेक प्रश्‍न असतात, ज्यांची उत्तर त्यांना मिळत नाहीत. ते ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे काम करतायत. मी सुद्धा एक शेतकरी आहे. मलाही शेतकर्‍यांची काळजी आहे. त्यामुळे जेव्हा मला गुंतवणुकीची संधी मिळाली तेव्हा मी शेतीची निवड केली.

पंकज सांगतात, "पूर्वी माझी परिस्थिती अशी नव्हती की मी फंडिंग करीन. पण आता मी माझ्या आवडीनुसार निवड केलीय. जर आणखीन ही कोणतं सेक्टर इंटरेस्टिंग असेल, त्यात सामाजिक कारण असेल आणि ते पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त असेल, तर मी गुंतवणूक करायला तयार आहे. बऱ्याचदा लोक मला ऑनलाइन ऍक्टिंग शिकवायला सांगतात पण मला ते योग्य वाटत नाही.

प्रियांका चोप्रापासून ते आमिर खानपर्यंत

हृतिक रोशनच्या स्टाइलिंगच्या मागे जग वेडं आहे. त्याने कपडे आणि अॅक्सेसरीजच्या एका स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केलीय. त्याची हेल्थ आणि फिटनेस स्टार्टअपमधील गुंतवणूक सुद्धा आजकाल चर्चेत असते.

हृतिक रोशन, मनोरंजन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हृतिक रोशन

निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर आता अमेरिकेत स्थायिक झालेली देसी गर्ल प्रियांका चोप्राने वेगवेगळे स्टार्टअप्स निवडलेत. आधी तिने कॉलेज एज्युकेशन स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली होती. नंतर डेटिंग अॅप्समध्ये मोठी गुंतवणूक केली.

प्रियांका चोप्रा

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, प्रियांका चोप्रा

आमिर खानची ऑनलाइन फर्निचर रेंटल प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक आहे. तसंच तो पेमेंट गेटवे स्टार्टअपचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे.

आलिया भट्टने 2017 मध्ये एका स्टाइलिंग प्लॅटफॉर्म कंपनीत गुंतवणूक केली होती. हे स्टार्टअप भारतातील पहिलं ऑनलाइन स्टाइलिंग प्लॅटफॉर्म मानलं जातं. मागे काही दिवसांपूर्वी तिने आयआयटी कानपूरशी संबंधित एका स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली होती. ही कंपनी सायकलवर फुलांच्या सजावटीचे काम करते.

श्रद्धा कपूरने गेल्या वर्षीच एका ब्युटी ब्रँडमध्ये गुंतवणूक केलीय. 2017 मध्ये सुरू झालेली ही कंपनी थेट ग्राहकांच्या घरी ऑनलाइन सौंदर्य उत्पादने डिलिव्हर करते.

स्वतःचा मेकअप ब्रँड लॉन्च करणाऱ्या करीना कपूर खानने अलीकडेच आयपीओ आणणाऱ्या फॅशन आणि ब्युटी ब्रँडमध्ये गुंतवणूक केलीय.

तिची बहीण करिश्मा कपूरने ऑनलाइन बेबी प्रोडक्ट्स तयार करणाऱ्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. करिनाची मैत्रिण मलायका अरोरा हिने ज्यूस आणि इतर उत्पादनांमध्ये गुंतवणूक केली आहे.

ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या आईसह ज्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे ती बेंगळुरूस्थित स्टार्टअप कंपनी आहे. ही कंपनी हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्र बनवते.

आयुष्मान खुरानाने पुरुषांसाठी कम्पलीट ग्रूमिंग प्रॉडक्ट बनवणाऱ्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. 2015 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी गुरुग्रामची आहे.

फिटनेसकडे कल

फसवणुकीचा आरोप असलेल्या सुकेश चंद्रशेखरसोबतच्या मैत्रीमुळे सध्या चर्चेत असलेल्या जॅकलिन फर्नांडिसने एका ज्यूस बनवणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.

आपला काका अनिल कपूरसोबत नॉनव्हेज प्रेमींसाठी जाहिराती करून लोकांना आकर्षित करणाऱ्या अर्जुन कपूरने होम फूड डिलिव्हरी कंपनीत गुंतवणूक केली आहे.

गुंतवणूक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनिल कपूर आणि आमिर खान

सुनील शेट्टीने ऑनलाइन फिटनेस कम्युनिटी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. सुनीलने कोरोनाच्या काळात लॉकडाऊन दरम्यान आरोग्यपूरक उत्पादने आणि त्याच्या शिक्षणाची जाहिरात केली.

सुनील म्हणतो, "भारतीय जेवण सर्वात आरोग्यदायी आहे यावर जगाने विश्वास ठेवावा अशी माझी इच्छा आहे. आत्मनिर्भर भारताचा अर्थ एवढाच आहे की आपण आपला खजिना जगासमोर ठेवू आणि आपल्या पारंपारिक वस्तूंमध्ये किती ताकद आहे हे जगाला दाखवून देऊ."

नियमित योगाभ्यास करणाऱ्या शिल्पा शेट्टीने चार वर्षांपूर्वी बेबीकेअर स्टार्टअपमध्ये सुमारे 1.5 कोटींची गुंतवणूक केली होती.

कोविड काळात गरजूंचा नायक बनलेल्या सोनू सूदने रुरल फिनटेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.

ही कंपनी देशातील सुमारे एक कोटी ग्रामीण उद्योजकांना आर्थिक आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी काम करते आहे.

स्टार्टअप हा कलाकारांना गुंतवणुक करण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून उपलब्ध झाला आहे. पण यात विशेष काय असेल तर या गुंतवणुकीविषयी कलाकार अगदी मोकळेपणाने बोलतायत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)