RRR : 'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार

आरआरआर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आरआरआर चित्रपटातील गाण्याला ग्लोडन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे.

एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात 'बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर' हा किताब मिळाला.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित झालेल्या RRR मध्ये राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्या खेरीज चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण आणि श्रिया सरन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

या चित्रपटाने जगभरात 1200 कोटींहून अधिक कमाई केली होती. हा सिनेमा तमीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बीबीसीच्या प्रतिनिधी सुप्रिया सोगले यांनी दिग्दर्शक राजामौली तसंच अभिनेते राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्याशी संवाद साधला होता. त्या मुलाखतीचा संपादित अंश पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

Presentational grey line

बाहुबली हा खूप भव्य असा चित्रपट होता. त्यातून बाहेर पडून, मग अशा धाटणीच्या चित्रपटाची निर्मिती करणं तुमच्यासाठी आव्हानात्मक होतं का?

राजामौली - एकदा का चित्रपट तयार होऊन प्रदर्शित झाला की, जेवढे पैसे कमवायचे आहेत तेवढे तो चित्रपट कमावतो. मी मात्र त्यातून बाहेर पडतो. माझ्यासाठी तेव्हाच चित्रपट पूर्ण झालेला असतो. चित्रपटाच्या आठवणी फक्त माझ्यासोबत असतात आणि हो, प्रेम नेहमीच असतं... पण माझ्यासाठी चित्रपट संपलेला असतो.

माझा पुढचा चित्रपट हा माझ्यासाठी पहिल्या चित्रपटासारखा असतो. मी त्या चित्रपटासाठी असं काम करतो जणू तो माझा पहिलाच चित्रपट आहे. माझ्या पुढच्या चित्रपटात मी आणखीन चांगलं काम करावं अशी अपेक्षा लोक माझ्याकडून करत असतील तर त्यामुळे माझी ऊर्जा वाढते.

चित्रपटाची कथा तुम्हाला कशी सुचली?

राजामौली - वस्तुस्थिती अशी आहे की, एकाच काळात वावरलेल्या कोमराम भीम आणि अल्लुरी सीतारमण राजू या दोन स्वातंत्र्य सैनिकांची गोष्ट माझ्यासमोर होती. तो इतिहासात घडलेला अतिशय चांगला योगायोग आहे.

या दोघांच्याही आयुष्यातली तीन-चार वर्षं अशी होती की, त्याबद्दल कोणालाच माहिती नाही. म्हणून मी माझी कथा त्या कालखंडाला धरून लिहिली आहे. मी त्यांच्याभोवती फिरणारी काल्पनिक कथा रचलीये. RRR चित्रपटातील तो भाग माझ्यासाठी खूपच उत्कंठावर्धक असा आहे.

बाहुबलीची निर्मिती झाल्यापासून देशभरातले जवळपास सर्वच अभिनेते तुमच्यासोबत काम करायला इच्छुक आहेत. मग या चित्रपटासाठी NTR आणि रामचरण या दोघांची निवड करण्याचं कारण काय?

राजामौली - आम्ही यात दोन स्वातंत्र्य सैनिकांची गोष्ट दाखवली आहे. राम आणि भीम अशा दोन व्यक्तिरेखा त्यात आहेत. त्यापैकी रामच्या व्यक्तिरेखेमध्ये हृदयात स्वातंत्र्याची मशाल पेटती आहे आणि ती आग, चमक त्याच्या डोळ्यांत दिसते. ही व्यक्तिरेखा उत्तमरित्या पेलू शकणारा अभिनेता म्हणजे चरण. कॅमेऱ्यासमोर असो किंवा नसो त्याच्या डोळ्यांत तुम्हाला नेहमी अशीच चमक दिसते.

एनटीआर, रामचरण, राजामौली

फोटो स्रोत, SS RAJAMOULI/FB

आता दुसरी म्हणजे भीम... हा खूप ताकदवान-रांगडा आहे, पण त्याच्यात मुलासारखा निरागसपणा आहे. हा गुण मला NTR मध्ये दिसतो. पुन्हा एकदा असं म्हणायला हरकत नाही की, कॅमेऱ्यासमोर असो वा कॅमेऱ्यामागे हा गुण NTR मध्ये दिसेलच.

कथेतल्या या व्यक्तिरेखांच्या गरजेमुळे या दोन पात्रांसाठी मी या दोघांची निवड केली.

चित्रपटाची कथा सांगताना कोणत्या पध्दतीने ब्रिफिंग करण्यात आलं? कोणत्या प्रकारची मेहनत करावी लागली? राजमौली खूप मेहनत करवून घेतात असं ऐकलयं.

ज्युनियर एनटीआर- हे कॅरेक्टर्स आधीपासूनच आमच्या आयुष्याचा एक भाग आहेत. त्यांच्याबद्दल खूप माहिती आहे. पण आमच्यासाठी सर्वांत चांगली गोष्ट अशी होती की, आम्हाला ज्या गोष्टी केल्या नव्हत्या त्या कराव्या लागणार होत्या. कारण आम्हाला या पात्रांबद्दल जे माहितीये त्याबद्दल राजामौली बोलत नाहीयेत, तर आम्हाला जे माहीत नाही त्याबद्दल ते बोलतायत. कारण त्यांनी हे काल्पनिक जग निर्माण केलंय.

त्याच पद्धतीने आम्ही भीम आणि रामराजू या पात्रांची तयारी केली. तो आपल्या जगण्याचा एक भाग आहे. पात्र साकारण्यासाठी विशेष असे प्रयत्न करावे लागले नाहीत, कारण जेव्हा तुमच्याकडे असा दिग्दर्शक असतो तेव्हा प्रवास अगदी सोपा होऊन जातो.

तो आधीच तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे. तुम्हाला त्यांच्याबद्दल खूप माहिती आहे, पण आमच्यासाठी सर्वांत चांगली गोष्ट अशी होती की आम्हाला यासाठी बरीच मेहनत करावी लागली. ज्या गोष्टी केल्या नव्हत्या त्या कराव्या लागणार होत्या. कारण आम्हाला जे माहीत आहे त्याबद्दल ते बोलत नाहीत, तर आम्हाला जे माहिती नाही त्याबद्दल ते बोलतायत.

आरआरआर

फोटो स्रोत, TWITTER/RRR MOVIE

कारण त्यांनी हे काल्पनिक जग निर्माण केलंय. त्यादृष्टिने आम्ही भीम आणि रामराजू या पात्रांची तयारी केली. शिवाय पात्र साकारण्यासाठी विशेष असे प्रयत्न करावे लागले नाहीत, कारण जेव्हा तुमच्याकडे असा दिग्दर्शक असतो तेव्हा प्रवास अगदी सोपा होऊन जातो.

रामचरण - आम्हाला भीमच्या, अल्लुरी सीताराम राजू यांच्याशी एकरुप व्हायचं नव्हतं. ते दोघं थोर होते आणि आपण यांची व्यक्तिरेखा साकारतोय ही एक जबाबदारीची भावना असते आणि ती जबाबदारी बाळगणं महत्त्वाचं आहे. ही कथा त्यांची (एसएस राजामौली) असल्याने आणि सोबतच ती पूर्णपणे काल्पनिक असल्याने आमच्यासाठी प्रत्येक सीन हा नवीन होता. ज्याची आम्हाला आधी माहिती नव्हतीच.

राजामौली टास्कमास्टर आहेत का? काय वाटतं?

रामचरण - 100 टक्के. आपल्याला अभिनेता म्हणून ते प्रेरणा देतात. आम्ही अशा व्यक्तिसोबत काम करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. तुम्ही त्यांना टास्कमास्टर म्हणा किंवा हेडमास्टर. खरंतर आम्ही खूप निवांत होतो कारण ते सगळ्यांचंच काम पाहायचे. प्रत्येक दिग्दर्शक त्यांच्यासारखा असता तर...

तुम्ही दोघं (राजमौली आणि ज्युनियर एनटीआर) जवळपास 20 वर्षांपासून एकत्र काम करत आहात. या 20 वर्षांत तुमच्या दोघांमध्ये नेमका काय बदल झालाय?

ज्युनियर एनटीआर - त्यांच्या यशाचा आलेख बदललाय. पण एक फिल्ममेकर म्हणून मानसिकदृष्ट्या ते फारसे बदललेले नाहीत. ते असे दिग्दर्शक आहेत जे फक्त चित्रपटासाठीच जगतात. तुम्ही त्यांचा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला ती गोष्ट कळेल. आणि याचमुळे त्यांना प्रचंड यश मिळत गेलं. पण एक चित्रपट निर्माता म्हणून ते जसे आहेत तसेच आहेत.

RRR

फोटो स्रोत, FB/RRR

राजामौली - तारक (ज्युनियर एनटीआर) पहिल्या दिवसापासून मी त्याला सेटवर पाहिलंय. मला वाटतं जन्मापासूनच त्याच्याकडे प्रतिभेचा खजिना आहे. त्याच्याकडे खूप प्रतिभा आणि भरपूर ऊर्जा आहे. कालांतराने तो आपल्या उर्जेचा योग्य प्रकारे वापर करायला शिकला.

तुम्हाला माहिती असेलच! असं वाटतं पूर्वी तो स्क्रिप्टही ऐकत नसावा. त्याच्याकडे जे चित्रपट यायचे ते तो साईन करायचा. पण आता तो शहाणा झालाय. कोणत्या प्रकारची पात्रं आव्हानात्मक असतील हे त्याला आता एक अभिनेता म्हणून कळतंय. आता तो आपली ऊर्जा योग्य प्रकारे वापरतो. या 20 वर्षांत त्याने खूप मोठा बदल पाहिलाय.

तुमची राजामौलींसोबत खूप छान मैत्री आहे. पण तुम्हाला बाहुबलीसाठी विचारलं नाही म्हणून त्यांच्याबद्दल नाराजी आहे? तक्रार आहे?

ज्युनियर एनटीआर - त्यांच्याविषयी तक्रार तर नेहमीच असते की, या चित्रपटात मी का नाहीये? आम्ही या चित्रपटाचा भाग का नाहीये?

रामचरण- 'मक्खी'साठी पण तसंच वाटतं

ज्युनियर एनटीआर- खरं आहे. आम्हाला त्या 'मक्खी'चा पण राग आला होता. फक्त आम्ही ते दाखवलं नाही.

तुम्ही या दोघांना काय सांगाल?

राजामौली - माझं उत्तर त्या दोघांनाही माहितीये.

मला माझ्या व्यक्तिरेखेसाठी योग्य असे लोक हवे असतात. या दोघांकडे कोणतीही व्यक्तिरेखा, भूमिका साकारण्याची क्षमता आहे. पण माझ्या मनात एखादी प्रतिमा असते आणि त्यानुसार मला माझ्या पात्रासाठी जे योग्य वाटतात त्याच अभिनेत्यांकडे जातो.

रामचरण - काही कारणाने आम्ही जर या चित्रपटात नसतो तर तुम्ही दुसऱ्या कोणासोबत तरी हा प्रोजेक्ट केला असता का, असं मी त्यांना विचारलं. मला अजूनही आठवतंय त्यांच्या अपार्टमेंटच्या खाली आम्ही उभे होतो. त्यांनी म्हटलं होतं की, नाही. चरण, ही कथा तर मी तुमच्या दोघांसोबतच केली असती. तुम्ही नसता तर मी दुसऱ्या कथेवर काम केलं असतं.

राम चरण

फोटो स्रोत, Instagram/Ram Charan

राजामौली - अर्थात, मी ठरवलं होतं मी आकाशपाताळ एक करीन पण हा प्रोजेक्ट करीन यांच्यासोबतच करीन.

अजय देवगण या चित्रपटात आहे. या तिघांना ही तुम्ही एकाच फ्रेममध्ये का आणलं नाही?

राजामौली - ही स्क्रिप्टची मागणी होती. बाजारात जे काही खपतं किंवा फॅन्स काय मागणी करतात त्यावर न ठरता स्क्रिप्टची गरज लक्षात घेतली जाते. स्क्रिप्ट ही मास्टर आहे आणि आपण ती फॉलो केली पाहिजे. किंबहुना प्रत्येकानेचं त्याचं पालन केलचं पाहिजे.

ज्युनियर एनटीआर - त्यांनी जे सांगितलं ते मला खूप आवडलं होत. चित्रपटाचे पाहिले 15 ते 20 मिनिटं तुम्ही फॅन्स असता आणि त्यानंतर कोणीही चाहता राहत नाही तर तो चित्रपटाचा प्रेक्षक होतो.

तुमच्या तिघांच्या मते हिरोईझम (नायकत्व) काय आहे ?

रामचरण - माझ्यासाठी नायक तो आहे ज्याच्याकडे सहानुभूती आहे. बाहेर काय चाललंय, त्याच्या समोर काय सुरू आहे, आजूबाजूला काय घडत आहे, त्या गोष्टींबद्दल त्याला सहानुभूती असायला हवी. समाजासाठी काय चांगले करता येईल, असा विचार त्याच्यातून निर्माण होतो. सहानुभूतीशिवाय काहीही शक्य नाही

राजामौली - माझ्यासाठी नायक पुरुषासारखा शक्तिशाली आणि लहान मुलासारखा अतिसंवेदनशील असावा.

ज्युनियर एनटीआर - माझ्यासाठी नायक तो आहे ज्याला केवळ स्वतःचंच नाव व्हावं हा अट्टाहास नसतो. समाजासाठी मूकपणे काम करणारा, प्रसिद्धीचा हव्यास नसलेला कोणीही नायक. माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे पण जो स्वतःला हिरो म्हणून पाहत नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)