You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र, कुंकू, जोडवी काढायची गरज नाही’
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड या गावाबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्याचं कारण हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेला एक निर्णय... पतीच्या निधनानंतर विधवा महिलेला दिली जाणारी वागणूक म्हणजे विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला आहे.
फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात विधवा महिलांना समाजात इतर स्त्रियांप्रमाणे मानसन्मान मिळावा यासाठी हेरवाड गावाने उचलेलं हे पाऊल कौतुकास पात्र आहे.
पतीच्या निधनानंतर महिलांना दिली जाणारी वागणूक म्हणजे विधवा प्रथा आजही सूरू आहे. या प्रथेनुसार पतीच्या निधनानंतर स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढलं जातं, कपाळावरचं कुंकू पुसलं जातं, पायातील जोडवी, हातातील बांगड्या तसंच अंगावरील दागिने काढले जातात.
पतीच्या निधनानंतर महिलेचं आयुष्य एकाकी करण्याच्या या प्रथेमुळे विधवा महिलांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी होता येत नाही. कोणत्याही शुभ कार्यात विधवा महिलांना हीन वागणूक दिली जाते. याच प्रथेच्या विरोधात हेरवाड ग्रामस्थांनी आवाज उठवला. हेरवाड गावातील लोकांनी हा समज झुगारून लावत ग्रामसभेत या प्रथेविरोधात ठराव संमत केला.
हेरवाड गावचे सरपंच सुरगोंडा पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. ग्रामसभेत हा विधवा प्रथा बंद करण्याबाबत ठराव मांडला आणि इतर ग्रामपंचायत सदस्यांनी या ठरावाला एकमताने मंजूरी दिली.
करमाळा इथल्या महात्मा फुले सामाजिक संस्थेचे प्रमुख प्रमोद झिंजाडे यांच्या प्रेरणेतून हा निर्णय घेतल्याचं सरपंच सुरगोंडा पाटील यांनी सांगितलं.
प्रमोद झिंजाडे हे राज्य विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियानाचे समन्वयक आहेत.
"विधवा महिलांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी अशा प्रथा बंद करण्याची गरज आहे. शिरोळ तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी अशा प्रकारचे ठराव संमत करून सरकारकडे पाठवावेत," असंही सरपंच पाटील यांनी म्हटलं.
ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या माध्यमातून हा प्रश्न विधानसभेत मांडला जावा यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने हे छोटं पाउल उचलल्याचं पाटील सांगतात. विधानसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा कायदा संमत व्हावा यासाठी इतर गावांमधूनही पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
अपमानास्पद वागणूक सोसणाऱ्या विधवा महिलांना सन्मान देण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
विधवा महिलांना धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता यावं, इतरांप्रमाणे सामान्य आणि सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी हेरवाड ग्रामसभेतील हा निर्णय महत्त्वाचं पाऊल आहे, असं हेरवाडच्या रहिवासी राणी माने यांनी म्हटलं.
हेरवाडच्या या क्रांतिकारी निर्णयाची दखल समाजाच्या सर्वच स्तरातून घेतली गेली. समाज माध्यामातून हेरवाड गावाच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेणारी हेरवाड ग्रामपंचायत ही पहिलीच ग्रामपंचायत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हेरवाड गावचे सरपंच सुरगोंडा पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सातारा इथं सत्कार केला.
यावेळी बोलताना पवार यांनी म्हटलं की, हेरवाड गावाने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. सरकार अशा निर्णयाच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. तसंच हा कायदा अंमलात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील हेरवाड गावचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं म्हटलं. त्या म्हणाल्या, समाजात परपंरागत विधवा महिलांसाठी असलेली प्रथा हेरवाडकरांनी मोडीत काढत राज्यातच नव्हे तर देशात आदर्श निर्माण केला आहे.
राज्यातील इतर ग्रामपंचायतींनी अशा प्रकारे ठराव करायाला हवेत ज्यामुळे महिलावरील अन्यायाला वाचा फुटेल. याबाबतचा कायदा अंमलात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही सुळे यांनी सांगितलं.
हा ठराव ग्रामसभेत मांडल्यानंतर सूचक म्हणून मुक्ता पुजारी तर अनुमोदक म्हणून सुजाता गुरव या महिलांनी काम पाहिलं. त्यामुळं हेरवाड गावातील महिलाच विधवा प्रथेविरोधात पुढे सरसावल्या आहेत. आता गरज आहे, ती समाजातील सर्वच स्तरातून या निर्णयाची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी होण्याची...
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)