इचलकरंजी : 'सर्वांत श्रीमंत नगर पालिके'ला महापालिका होण्यास इतका उशीर लागला कारण...

फोटो स्रोत, Swati patil/bbc
- Author, स्नेहल माने
- Role, बीबीसी मराठीसाठी
राज्य सरकारने नुकतीच राज्यात एका नव्या महानगरपालिकेची घोषणा केली आहे. ते शहर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी.
या नव्या महानगरपालिकेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात आता दोन महानगरपालिका होणार आहेत. इचलकरंजीची ओळख संपूर्ण देशभरात वस्त्रोद्योगामुळे 'महाराष्ट्राचं मँचेस्टर' म्हणून आहे. एवढ्या संपन्न अशा इचलकरंजीला महानगरपालिकेचा दर्जा मिळण्यास इतका उशीर का लागला?
इचलकरंजी आणि तिथल्या वस्त्रोद्योग व्यवसायाचा इतिहास
इचलकरंजी म्हणजे पंचगंगा काठावर वसलेलं, ऐतिहासिक वारसा असलेलं टुमदार शहर. हे शहर आधी एक संस्थान होतं.
'इचलकरंजी संस्थानचा इतिहास' या पुस्तकात यशवंत वासुदेवशास्त्री खरे यांनी सांगितल्याप्रमाणे, 'थेट बाजीराव पेशव्यांशी नातं सांगणारे घोरपडे सरकार यांची ही जहागीर. मूळचे जोशी असणाऱ्या नारो महादेव या मूळपुरुषाने सेनापती घोरपडे यांच्या पदरी राहून मोठा पराक्रम गाजवला. याचं बक्षीस म्हणून त्यांना इचलकरंजीचं वतन बहाल करण्यात आलं. तेव्हा नारो महादेव यांनी आपलं जोशी हे आडनाव टाकून घोरपडे या आडनावाचा स्वीकार केला.'
या नारो महादेव यांच्या घराण्यातील अनेक पिढ्यांनी इचलकरंजी ही जहागीर सांभाळली. पण हे छोटंसं गाव श्रीमंत शहर बनलं ते श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे सत्तेत आल्यावर.
विसाव्या शतकाची सुरुवातीचा हा काळ होता. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यात अनेक नवनवीन प्रयोग करून आपल्या राज्याचा विकास सुरू केला होता.
इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे हे छत्रपती शाहू महाराजांचे समकालीन. ते स्वतः उच्चशिक्षित होते. छत्रपतींचं अनुकरण करून आपल्या जहागिरीमधील प्रजेचं कल्याण कसं करता येईल याचा ध्यास त्यांना लागला.
इचलकरंजीतील इतिहास अभ्यासक रणजीत यादव सांगतात, "18 जून 1892 रोजी श्रीमंत नारायण घोरपडे यांनी जहागिरीचा राज्य कारभार हाती घेतला. तोपर्यंत इचलकरंजी गावचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता. पंचगंगेच्या पाण्यावर पिकणारा ऊस हे तिथलं मुख्य पीक. शिवाय आसपासच्या गावात हळद, ज्वारी, मिरची, कापूस ही पिकं घेतली जायची. इंग्लंडला जाऊन तिथली औद्योगिक क्रांती पाहून आलेल्या घोरपडे सरकारांनी फक्त शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा इचलकरंजीत देखील वेगवेगळे कारखाने सुरू करता येतील का याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रोत्साहनातूनच विठ्ठलराव दातार या तरुणाने गावात पहिलं यंत्रमाग आणलं."
हाच देशभरात भरारी मारणाऱ्या इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाचा पाया मानला जातो. श्रीमंत नारायणराव घोरपडे यांनी आपल्या गावातील तरुणांना वस्त्रोद्योग सुरू करायला मदत केली इतकंच नव्हे त्यांना आर्थिक पुरवठा व्हावा यासाठी बँकेची स्थापना केली. पाणी आणि वीजेच्या इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या.
इचलकरंजी नगरपालिकेची स्थापना
तरुण भारतचे वरिष्ठ पत्रकार आणि इतिहास विषयक अभ्यासक संजय खुळ यांनी बीबीसी मराठीशी बोलताना नगरपालिकेचा इतिहास सांगितला.
खुळ सांगतात, "श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे हे सत्तेत आल्यावर एकाच वर्षात त्यांनी इचलकरंजीमध्ये नगरपालिका स्थापन केली. ते वर्षं होतं 1893चं. जवळपास सात हजार लोकसंख्या असणाऱ्या या नगरपालिकेला तेव्हा स्वतःची इमारत सुद्धा नव्हती तेव्हा नारायण बाबासाहेबांनी नरसोबा मंदिराला लागून असलेली धर्मशाळा आणि घर नगरपालिकेला आपलं ऑफिस चालवण्यासाठी देऊन टाकली. "

फोटो स्रोत, Swati patil
"कोल्हापूर स्टँडिंग लेजिस्लेटिव्ह कमिटी आणि कोल्हापूर कौन्सिल ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन यांनी कोल्हापूर नगर पालिकेसाठी बनवलेल्या नियमामध्ये थोड्याफार फरकाने बदल करून हेच नियम इचलकरंजी नगरपालिकेस लागू करण्याचा हुकुम घोरपडे सरकार यांच्याकडून देण्यात आला."
"त्याकाळात नगरपालिकेचा चेअरमन म्हणून सरकारी अधिकारीच नियुक्त केला जाई. नगरपालिकेच्या पहिल्या वर्षाचे उत्पन्न रु. 2297.50 होते, ते पुढे जाऊन 12,000 रुपयांपर्यंत पोहचलं."
"नारायण बाबासाहेब घोरपडे यांच्या कारकिर्दीत गावात रस्ते बांधण्यात आले, वाचनालय, शाळा उघडण्यात आल्या. शेतीशी पूरक व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात आलं. फक्त नगरपालिकाच नाही तर एक स्वच्छ आणि टुमदार औद्योगिक नगरी म्हणून इचलकरंजीची ओळख नारायणराव घोरपडेंच्या दूरदृष्टीमुळे मिळाली," असं ही खुळ यांनी सांगितलं.
वस्त्रोद्योगाची भरभराट आणि सर्वांत श्रीमंत नगरपालिका
साधारण पहिल्या महायुद्धांनंतर भारतात सहावारी पातळ वापरण्याची फॅशन रूढ होऊ लागली. इचलकरंजीतील पॉवरलूमवर हेच कापड बनत होतं. इचलकरंजीचं धोतर आणि कापड सगळीकडे प्रसिद्ध झालं.
बाहेरून लोक येऊन इचलकरंजीमध्ये वसू लागले. यात राजस्थान, गुजरातच्या व्यापाऱ्यांचा समावेश होता. लगतच असलेल्या कर्नाटकातून देखील मोठी लोकसंख्या यंत्रमागावर काम करण्यासाठी कामगार म्हणून आली.

फोटो स्रोत, Swati Patil
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील सहकारी चळवळीने जोर धरला. इचलकरंजीमध्ये देखील दत्ताजीराव कदम, रत्नाप्पा कुंभार, बाबासाहेब खंजीरे, बाळासाहेब माने, कल्लापाअण्णा आवाडे यासारख्या नेत्यांच्या प्रयत्नातून सहकार रुजला. परिसरात साखर कारखाने उभे राहिले, सहकारी तत्वावर सूतगिरण्या सुरू झाल्या.
'डेक्कन सूतगिरणी' तेव्हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण आशियात सर्वांत मोठी म्हणून ओळखली जात होती. या सहकारी चळवळीचा परिणाम इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाला मोठ्या प्रमाणात झाला.
इचलकरंजी येथील सुप्रसिद्ध आपटे वाचन मंदिराचे उपाध्यक्ष अशोक केसरकर सांगतात, "साधारण पन्नास ते साठच्या दशकात इचलकरंजीचा वस्त्रोद्योग शिखरावर जाऊन पोहचला. साधारण याच काळात गावाची ओळख महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत नगरपालिका म्हणून बनली. शहरात यंत्रमाग आणि इतर पूरक व्यवसाय उभे राहत होते आणि त्यामुळे जकात आणि इतर कराच्या माध्यमातून नगरपालिकेचं उत्पन्न देखील तगडं होत गेलं."
ते पुढे सांगतात, "पुण्याशेजारी पिंपर- चिंचवड सारखी शहरं बजाज टाटा या कारखान्यामुळे भरभराटीला आली. तरी इचलकरंजी नगरपालिका उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्रात आघाडीवरचं होती. अगदी नव्वदच्या दशकापर्यंत इचलकरंजी नगरपालिकेचा मोठा दबदबा होता. शहरात उभारलेले क्रिकेट स्टेडियम, ऑलिम्पिक दर्जाचा स्वीमिंग पूल, प्रशस्त एसटी स्टॅन्ड, मोठे रस्ते हे तिथल्या श्रीमंतीचं प्रतीक मानलं जात होतं."
'आधी संधी चालून आली होती'
नाव न जाहीर करण्याच्या अटीवर एक वरिष्ठ पत्रकार बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात की, "साधारण सत्तरच्या दशकात इचलकरंजीला पहिल्यांदा महानगरपालिका बनण्याची संधी चालून आली होती.
"वाढती लोकसंख्या, वस्त्रोद्योगामुळे इतर कारखान्यांमुळे शहराच्या प्रशासनावर वाढत चाललेला भार याचा विचार करून सत्तरच्या दशकात इचलकरंजी नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात यावं असा विचार पुढे आला. पण यासाठी आसपासच्या खेडेगावांचा देखील समावेश महानगरपालिकेत केला जावा अशी अट घालण्यात आली होती," असं ते सांगतात.

फोटो स्रोत, Swati Patil
"मात्र याला त्या गावातून जोरदार विरोध झाला. महानगरपालिका झाली तर घरफाळा, पाणीपट्टी वाढेल. त्याचा भार छोट्या गावातील शेतकऱ्यांना सोसणार नाही, असं तेव्हाच्या काळातील नेत्यांचं म्हणणं पडलं. हद्दवाढ करू नये या मतावर गावकरी ठाम होते. आसपासच्या खेडेगावात असलेल्या सूतगिरण्या महानगरपालिकेच्या करक्षेत्रात आल्यामुळे वस्त्रोदयोगाला देखील फटका बसण्याची शक्यता बोलून दाखवली गेली.
"एकेकाळी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या रत्नप्पा कुंभार यांचा सहकारी कारखाना देखील महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आला असता. त्यांच्याच आग्रहामुळे तेव्हाच्या काळातील इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रस्ताव बारगळला," असा ते दावा करतात.
वस्त्रोद्योगाला घरघर आणि...
इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगासमोरील समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही 'डिकेटीई' या टेक्स्टाईल इन्स्टिट्यूटचे माजी प्राध्यापक आणि सध्या अरिहंत कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले डॉ. पुरुषोत्तम वडजे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी 'Challenges for small textile business' या आपल्या रिसर्च पेपरमध्ये वस्त्रोद्योगासमोरील समस्यांचं विवेचन केलंय.
बीबीसीशी बोलताना डॉ. वडजे सांगतात, "साधारण नव्वदच्या दशकापर्यंत इचलकरंजीचा वस्त्रोद्योगात दबदबा होता. इथल्या यंत्रमागावर तयार होणारं प्रमुख उत्पादन धोतर आणि साडीच्या कापडाचं होतं. पण नव्वदच्या दशकापर्यंत धोतर आणि साडीचा वापर कमी होत चालला होता. जागतिकीकरणानंतर देशात विविध प्रकारच्या फॅशनचा उदय झाला. तंत्रज्ञान बदलत गेलं. या बदलाशी जुळवून घ्यायला इचलकरंजीतील पॉवरलूम कमी पडले."

फोटो स्रोत, Swati Patil
"नवीन तंत्रज्ञान स्वीकारायला भांडवल मोठं लागणार होतं. उत्पादन आणि त्यातून मिळणारा परतावा याचं गणित जुळेनासं झालं. अशातच सुतव्यापारी, दलाल यांचा हस्तक्षेप वाढला होता. सुताच्या आणि कापडाच्या दरावर अप्रत्यक्षरीत्या व्यापाऱ्यांकडून ठेवलं जाणार नियंत्रणदेखील यंत्रमागधारकांना नुकसानकारक ठरलं. जसं नवं सहस्त्रक उजाडलं (2000 सालानंतर) तसं इचलकरंजीच्या वस्त्रोदयोगाला मंदीनं गाठलं."
ते पुढे सांगतात, "दरम्यानच्या काळात माजी मंत्री आणि माजी खासदार कल्लापाअण्णा आवाडे यांनी इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योगावर तंत्रशुद्ध अभ्यास उपलब्ध व्हावा म्हणून डीकेटीई या इंजिनियरिंग कॉलेजची उभारणी केली होती. तिथे असलेल्या टेक्स्टाईल विभागात इचलकरंजीच्या वस्त्रोद्योग समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. पॉवरलूमला पर्याय उभे करणे, वस्त्रोद्योगात आधुनिकीकरण आणणे या गोष्टींना सुरवात केली. नव्या तंत्रज्ञानामुळे इचलकरंजीत सेमी ऑटोलूमपासून ते शटल लेस लूमकडे वाटचाल सुरु झाली."
"वस्त्रोद्योग खात्याचं मंत्रिपद मिळाल्यावर प्रकाश आवाडे यांनी या आधुनिक तंत्रज्ञानासाठी सबसिडी, कमी व्याज दर कर्जे अशा सुविधांची उपलब्धता करून दिली. मात्र किती जरी झालं तरी हे बदल करणं फक्त मोठ्या उद्योगपतींनाच शक्य होतं," असं वडजे म्हणाले.
यावर स्थानिक पत्रकार नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगतात. "या काळात धोतर बनवणाऱ्या पॉवरलूम डबघाईला गेल्या. यंत्रमागधारक कर्जबाजारी झाले. भंगारच्या दरात पॉवरलूम विकावे लागले. शहरातून कामगारांचं देखील स्थलांतर झालं. अशातच सरकारने जकात बंद केला. या सगळ्याचा एकत्रित परिणाम नगरपालिकेच्या उत्पन्नावर झाला. महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत नगरपालिका हे बिरुद मिरवणारी इचलकरंजी मंदीच्या तडाख्यात पिचून गेली."
"वाढत्या बेरोजगारीमुळे शहरात गुन्हेगारीचंदेखील प्रमाण वाढलं. तीन लाखाच्या उंबरठ्यावर असलेली लोकसंख्या नगरपालिकेच्याच अधिपत्याखाली येत असल्यामुळे प्रशासनाला हा बोजा सांभाळणं कठीण होऊन गेलं. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नापासून रस्ते बांधणी, कचरा व्यवस्थापन, गटारींचा प्रश्न यांनी अक्राळविक्राळ रूप घेतलं. शहराला येत चाललेल्या बकालपणास राजकीय शैथिल्य हे सुद्धा एक कारण नक्कीच होतं," असं वडजे सांगतात.

फोटो स्रोत, Swati Patil
या सर्वातूनच शहराचा विकास ठप्प झाला. गेल्या दहा वर्षांत शहराने वस्त्रोद्योगाच्या मंदीतून बाहेर येत नवी कात टाकण्याचा प्रयत्न चालवला असला तरी विकासाची चक्रं पुन्हा वेगाने धावण्यासाठी नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालकेत केले जावं या मागणीने जोर धरला होता.
महाराष्ट्रात चार नव्या महानगरपालिकांचे प्रस्ताव समोर आले होते. पण खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्यानंतर इचलकरंजी ही राज्यातील 28 वी महानगरपालिका होईल असं जाहीर करण्यात आलं.
या नव्या नगरपालिकेच्या निर्मितीसाठी कोणतीही हद्दवाढ केली जाणार नसल्याचं बोललं जात असल्यामुळे आसपासच्या खेड्यातून कोणताही मोठा विरोध होणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








