कोल्हापूर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव 18901 मतांनी विजयी

फोटो स्रोत, @satejp
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसघांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 18901 मतांनी विजय मिळवला आहे.
आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या झाल्या. सुरुवातीपासून जयश्री जाधव यांनी मतमोजणीत आघाडी घेतली होती.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी जाधव यांचं अभिनंदन केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष करायला सुरुवात केली आहे.

फोटो स्रोत, Swati patil/bbc
तर काही ठिकाणी जाधव यांच्या विजयाचे बॅनरली लावण्यात आले आहेत.
कोल्हापूर उत्तर जागेसाठी 12 एप्रिल रोजी यासाठी मतदान झाले होते. एकूण 61.19 टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी वाढल्याने निकालाची उत्सुकता आहे. पण वाढलेल्या मतदानाचा कुणाला फायदा होणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

फोटो स्रोत, Swati patil/bbc
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली, तर भाजपने महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सत्यजित उर्फ नाना कदम यांना उमेदवारी दिली होती.
कोल्हापूरात सतेज उर्फ बंटी पाटील विरुद्ध महाडिक असा पारंपरिक संघर्ष असतो.
आजवर हा सामना कोल्हापूर दक्षिणमध्ये बघायला मिळायचा. पण मागील काही निवडणुकांमध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हा सामना पाहायला मिळाला, मग यात गोकुळ दूध संघाची निवडणूक असेल वा आजची कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक.
सत्यजित कदम यांचे आमदार सतेज पाटील यांच्याशी राजकीय वैर आहे. कदम हे महाडिक गटाचे कट्टर समजले जातात.
उत्तरचा सामना रंगला कसा?
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. पण राजकीय नेत्यांच्या बिनविरोधच्या हालचालींना सुरुंग लागला.
काँग्रेसचे चंद्रकांत जाधव निवडून येण्याआधी उत्तरची ही जागा शिवसेनेकडे होती. अर्थात शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे आमदार होते. त्यामुळे शिवसेनेने या जागेवर दावा केला. तसाच काँग्रेसनेही केला.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे महाविकास आघाडींतर्गतच मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रयत्न सुरू होते. परिणामी, महाविकास आघाडीचे त्रांगड निर्माण झाले होते. जाधव या काँग्रेसकडून रिंगणात उतरणार की महाविकास आघाडीकडून लढणार, हे स्पष्ट नव्हते. अखेर आघाडी धर्म पाळत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तरची जागा काँग्रेसला सोडली.

फोटो स्रोत, Swati patil/bbc
जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यामुळे "अजूनही 24 तास बाकी आहेत. जयश्रीताईंना भाजपकडून लढण्यास सांगा. आता माझ्या सहीने ए बी फॉर्म देतो. नानाला अर्ज मागे घ्यायला सांगतो," असं जाहीर आवाहनच चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.
महत्वाची बाब म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लागण्यापूर्वीही जयश्री जाधव यांना भाजपकडून तिकीटाची ऑफर दिली होती. मात्र, जयश्री जाधव यांनी विनम्रपणे ती नाकारात काँग्रेसकडूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
सरतेशेवटी भाजपने उमेदवार दिला आणि पोटनिवडणूक लागली. भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर झाली. सत्यजित कदम हे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय आहेत. उमेदवारी जाहीर होते न होते तोच त्यांनी प्रचारही सुरू केला होता. काँग्रेसकडून आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित होती.
भाजप विरुद्ध काँग्रेस
राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात अत्यंत टोकाचे राजकारण सुरू असल्याचं सर्वांनीच पाहिलं होतं. आणि त्याचीच प्रचिती कोल्हापुरातही आली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली.
उत्तरची निवडणूक थेट 'ईडी'च्या चौकशीपर्यंत गेली.
दोन्ही बाजूने मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा तर सुरू होत्याच पण त्याबरोबरच स्थानिक मुद्द्यापासून ते राज्यातील मुद्द्यांवर फोकस करण्यात आला होता. चित्रा वाघ यांच्या प्रचारसभेत दगडफेक झाल्यावरूनही आरोप-प्रत्यारोप गाजले. ईडीचा मुद्दा थेट मतदारांवरील कारवाईपर्यंत आला.

फोटो स्रोत, facebook
पण कोल्हापूरची रखडलेली थेट पाईपलाईन योजना, महापूर उपाययोजना, शाहू मिलच्या जागेवर गारमेंट पार्क, शहरातील रस्ते, उड्डाणपूल, आयटी पार्क, वाढलेली महागाई, बेरोजगारी याचं उत्तर दोन्ही बाजुंनी काही मिळालंच नाही. आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले.
आता दोन्ही बाजुंनी गुलाल आपलाच असल्याचा दावा केला जातोय. मात्र चुरस, संघर्ष आणि ईर्ष्या यातून कोण बाजी मारणार हे निकालच ठरवेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








