शरद पवारांना भाजपचं आव्हान, 'मशिदीत हनुमान चालिसा लावून दाखवा', #5मोठ्याबातम्या

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. मशिदीत हनुमान चालिसा लावून दाखवा, भाजपचं शरद पवारांना आव्हान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना आक्षेप घेतल्यानंतर राज्यात नवा वाद सुरू झाला आहे. मशिदींवरील भोंग्यांसमोर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते.

त्याचबरोबर राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातीवादाचा गंभीर आरोपही केला. राज ठाकरे यांच्या या टीकेला राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देताना, पुण्यात राष्ट्रवादीकडून हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं.

इतकंच नाही तर हनुमान जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवाकडून हनुमानाची आरती करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतर आता भाजपने थेट शरद पवार यांना आव्हान दिलंय. TV9 या वृत्तवाहिनीने ही बातमी दिलीय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

'शरद पवार यांनी त्यांच्या घरात मशिदीची स्थापना करून, त्यांनी घरी इफ्तार पार्टीचं आयोजन करावं. हिंदुंच्या आस्थेवर घाला घालू नका. हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन करता तर मशिदीत हनुमान चालिसा लावून दाखवा', असं ट्वीट करत भाजपनं थेट शरद पवारांनाच आव्हान दिलंय.

तर दुसरीकडे भाजप नेते मोहित कंबोज यांनी हनुमान जयंतीनिमित्त तब्बल एक हजार लाऊडस्पीकर मंदिरांना देण्यता येणार असल्याचं जाहीर केलंय. त्यासाठी त्यांनी अर्जही मागवले आहेत. अर्जांची पडताळणी करुन लाऊडस्पीकर दिले जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

2. भारताला छेडाल तर सोडणार नाही - राजनाथ सिंह

अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय-अमेरिकन समुदायाला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी चीनच्या सीमेवर भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याचा उल्लेख केलाय.

ते म्हणाले की, "त्यांनी (भारतीय सैनिकांनी) काय केलं आणि आम्ही (सरकारने) कोणते निर्णय घेतले, हे मी उघडपणे सांगू शकत नाही. पण मी खात्रीने सांगू शकतो की (चीनला) संदेश पाठवला आहे की, जर कोणी भारताला छेडले तर भारत त्याला सोडणार नाही." NDTV ने ही बातमी दिली आहे.

राजनाथ

फोटो स्रोत, Getty Images

भारत आणि अमेरिका यांच्यात वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित 'टू प्लस टू' मंत्रीस्तरीय चर्चेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले होते.

त्याचबरोबर संरक्षणमंत्र्यांनी युक्रेन रशिया मुद्द्यावर अमेरिकेलाही संदेश दिला. ते म्हणाले, "भारताचा झिरो सम गेम मुत्सद्देगिरीवर विश्वास नाही. भारताचे कोणत्याही एका देशाशी चांगले संबंध असतील तर याचा अर्थ असा नाही की, त्याचे इतर कोणत्याही देशाशी संबंध बिघडतील."

3. अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांचा भाजपने केला सत्कार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याच्या प्रकरणात ज्या आठ जणांना अटक करण्यात आली होती त्यांचा दिल्ली भाजपच्या कार्यालयात सत्कार करण्यात आलाय.

अरविंद केजरीवाल

फोटो स्रोत, Getty Images

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, भाजपचे दिल्ली राज्य प्रमुख आदेश गुप्ता यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आला. या सर्वांची जामिनावर सुटका झाली असून ते भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत.

या प्रकाराचा आपच्या आमदार आतिषी यांनी निषेध केला असून हा सत्कार म्हणजे कायदा हातात घेणाऱ्यांचा सन्मान केला जाईल, असा चुकीचा संदेश भाजपकडून दिला जात आहे, असा आक्षेप त्यांनी घेतला.

4. महावितरणकडून संकेतस्थळावर माहिती देणे बंद

महावितरणच्या संकेतस्थळावर गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील कोणती वीजनिर्मिती केंद्रे आणि कधीपासून व कोणत्या कारणाने बंद आहेत याचा अहवाल प्रसिद्ध करणे बंद झाले असल्याचे समोर आले आहे.

महावितरण

फोटो स्रोत, Getty Images

महावितरणच्या स्टेट लोड डिस्पॅच सेंटरच्या संकेतस्थळावर दररोज एक अहवाल प्रसिद्ध केला जातो. त्यामध्ये ही सर्व माहिती प्रसिद्ध केली जाते. दोन दिवसांपूर्वी महावितरणकडून याबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यातून नऊ वीजकेंद्रे बंद असल्याचे समोर आले होते.

विशेष म्हणजे ही केंद्रे कोळशाअभावी बंद नसल्याचेही समोर आले होते. त्यामुळे ही केंद्रे बंद असल्यामागच्या कारणांचा खुलासा करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महावितरण आणि महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. सकाळ ने ही बातमी दिलीय.

5. कंत्राटदार मृत्यू प्रकरणात कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा यांचा राजीनामा

कर्नाटकातील कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येनंतर कर्नाटक राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी शुक्रवारी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे सुपूर्द केलाय.

संतोष पाटील हे 37 वर्षीय कंत्राटदार एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले होते. पाटील यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये ईश्वरप्पा आणि त्यांच्या साथीदारांवर प्रलंबित प्रकल्पाची बिले मंजूर करण्यासाठी 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप केला होता. पाटील यांनी एका व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये सहकारी आणि काही पत्रकारांना सांगितले होते की, त्यांच्या मृत्युसाठी मंत्री थेट जबाबदार आहेत.

त्यानंतर संतोष पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान आपला राजीनामा देताना ईश्वरप्पा म्हटले, "माझ्यावर आरोप लावले जात आहेत, मी स्वच्छ बाहेर पडेल की नाही… चौकशी सुरू असताना मी मंत्री म्हणून राहिलो तर त्यांच्यावर प्रभाव टाकू शकतो, असे वाटेल. त्यामुळे मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मी तुम्हाला सांगतोय की, मी निर्दोष बाहेर येईन आणि नक्कीच पुन्हा एकदा मंत्री होईन."

झी न्यूजनं ही बातमी दिलीय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)