कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक : भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना

कोल्हापूर
    • Author, स्वाती पाटील
    • Role, बीबीसी मराठीसाठी

कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघात एका जागेसाठी पोटनिवडणूक होतेय. यासाठी आज (12 एप्रिल) मतदान सुरू आहे. कोल्हापूरमध्ये आज (12 एप्रिल) सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान होत आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे कोरोनामुळे निधन झाले त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होते आहे. काँग्रेसकडून जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या रिंगणात आहेत, तर भाजप कडून सत्यजित कदम लढत आहेत.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी ही निवडणूक लढली जात आहे. त्यामुळं दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लावणारी म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातंय.

भाजपकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, आशिष शेलार अशा नेत्यांच्या सभा झाल्या, तर महाविकास आघाडी सरकारमधील जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे अशा नेत्यांनी सभा घेतल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाइन सभा झाली. गेला महिनाभर आरोप प्रत्यारोप करत काँग्रेस विरुद्ध भाजप प्रचार रंगला होता.

या मतदानासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

कोल्हापूर

या मतदार संघात 2 लाख 91 हजार 539 इतके मतदार असून या मध्ये 1 लाख 45 हजार 626 पुरुष मतदार, 1 लाख 45 हजार 901 स्त्री मतदार, 95 सैनिक मतदार तर 12 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यासाठी 357 केंद्रांवर मतदान होणार असून यात 311 मुख्य केंद्रे तर 46 सहाय्यकारी केंद्रांचा समावेश आहे. 2 हजार 392 मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये 250 राखीव कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या निवडणुकीसाठी 45 विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 7 अधिकारी राखीव आहेत. मतदानयंत्रं व कर्मचाऱ्यांच्या वाहतूकीसाठी कोल्हापूर महापालिकेच्या 20 बस, महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या 49 बस आणि 3 जीपची सोय करण्यात आली आहे. तर मतदानासाठी 472 मतदान यंत्रे असून 115 यंत्रे राखीव आहेत.

मतदार संघात मतदार केंद्र क्रमांक 97 आदर्श मतदान केंद्र, तर केंद्र क्रमांक 105 सखी मतदान केंद्र असून 108 मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक, 181 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग, 68 मतदान केंद्रांवर व्हीडिओग्राफी, 108 मतदान केंद्रांवर CPF ची सोय करण्यात आली आहे. 670 टपाली मतदारांपैकी 80 पेक्षा अधिक मतदारांचे मतदान लिफाफे प्राप्त झाले आहेत, यामध्ये 18 विकलांग मतदारांचा समावेश आहे.

कोल्हापूर

उन्हाचा वाढलेला तडाखा पाहता सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रातच मतदान करण्याला मतदारांचं प्राधान्य राहण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढवण्याचं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

यासाठीची मतमोजणी 16 एप्रिलला शासकीय गोदाम, राजाराम तलाव, सरनोबतवाडी रोड, कोल्हापूर इथं होणार आहे.

भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची का आहे?

ही निवडणूक म्हणजे भाजपसाठी 2024 पुर्वीची लिटमस चाचणी असेल असं कोल्हापूरमधील ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाईम्सचे प्रतिनिधी सतिश घाटगे यांना वाटतं. त्याचं मुख्य कारण शिवसेनेला सोबत न घेता भाजप निवडणुकीच्या मैदानात किती यश मिळवते याची ही चाचपणी असणार आहे.

डिंसेबरमध्ये विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करत भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. पण या वेळी मात्र सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाला भाजपने साथ दिली नाही. उलट सत्यजित कदम यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार दिला. एकीकडे 4 राज्यांत मिळालेल्या यशामुळे भाजप जोमात आहे. त्यातच शिवसेनेतील कुरबुरीचा पडद्यामागून भाजपला फायदा होईल का हेही पाहावं लागेल, असं घाटगे सांगतात.

उद्धव-देवेंद्र

फोटो स्रोत, Facebook

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यावर होणाऱ्या कारवाई आणि आरोपांमुळे कॉंग्रेससह इतर पक्षांना अडचणीत आणण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. चार राज्यांतील विजयामुळं भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात भाजपच्या ताब्यात एकही जागा नाही त्यामुळं भाजपकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार असं दिसतंय.

तर कॉंग्रेससाठीदेखील ही निवडणूक सोपी नाही असं दैनिक सकाळचे मुख्य प्रतिनिधी निवास चौगुले सांगतात. त्याचं कारण असं की, सत्ता आल्यानंतर कोरोनाच्या काळात कुणालाही फार ठोस कामगिरी करता आली नाही. त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर फार काही ठोस बोलण्यासारखे सध्या तरी मोठे मुद्दे नाहीत. त्यात भाजपची आक्रमक भूमिका धोक्याची घंटा आहे.

सहानुभूतीच्या मुद्द्यावर किती यश

या निवडणूकीत सहानुभूतीचा फायदा कॉग्रेसला होईल असं घाटगे यांना वाटतं. चंद्रकात जाधव यांच्या अकाली निधनाने त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची साद कॉंग्रेसकडून घातली जाईल. या सहानुभूतीला खास करून महिला वर्ग प्रतिसाद देईल असं चित्र आहे असं घाटगे यांना वाटतं.

चंद्रकांत जाधव यांना अण्णा म्हणून ओळखलं जायचं. कोरोना काळात आरोग्य सुविधांसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या जाधव यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा दाखला देत कॉंग्रेसक़डून भावनिक आवाहन केलं जाईल. यासाठी अण्णांच्या माघारी आता आपली जबाबदारी अशी टॅगलाईन प्रचाराचे आकर्षण आहे.

जयश्री पाटील

फोटो स्रोत, FACEBOOK/JAYSHRI CHANDRAKANT JADHAV

पण चौगुले यांच्या मते मात्र जाधव यांच्या निधनामुळे सहानुभूतीच्या जोरावर विजय मिळण्याबद्दल ठाम सांगणं अवघड आहे. यामागं राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पंढरपूर मध्ये झालेल्या पराभवाचा अनुभव लक्षात घ्यावा लागेल.

मंगळवेढा मतदार संघात दिवंगत आमदार भारत भालके यांच्या मुलाचा भाजपने पराभव केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांचं या मतदार संघात मोठं नाव होते. त्यांनी तिथं कामंही केली होती. असं असताना भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा भाजपच्या समाधान आवताडे यांनी पराभव केला. हा अनुभव पाहता कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक कॉंग्रेससाठी अटितटीची लढाई असणार आहे.

एकीकडे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष विरूद्ध भाजप असा संघर्ष सुरू असताना ही पोटनिवडणूक होतेय. त्यामुळं सर्वच पक्ष ताकदीने निवडणूक मैदानात उतरणार असल्याचं चित्र आहे. शरद पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह सरकारमधले मंत्री, आमदार इथं प्रचाराला येणार आहेत. तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर विजय मिळणवण्याची जबाबदारी असणार आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)