संजय तेलनाडे इचलकरंजी: यंत्रमाग कामगाराचा मुलगा कसा बनला शहरातील सर्वांत मोठ्या गॅंगचा प्रमुख?

संजय तेलनाडे

फोटो स्रोत, Sarfarj Sanadi/BBC

    • Author, सरफराज सनदी
    • Role, बीबीसी मराठीसाठी, इचलकरंजीहून

गोष्ट 2013 सालची. कोल्हापूर पासून अवघ्या 35 किमी असलेल्या जयसिंगपूर या छोट्या शहरात भरदुपारी एक निर्घृण हत्या झाली.

हल्लेखोरांनी त्या व्यक्तीवर आधी चाकूने हल्ला केला आणि नंतर सहा गोळ्या झाडल्या. त्यात ती व्यक्ती जागीच ठार झाली.

या घटनेनी कोल्हापूर आणि आजूबाजूचा परिसर हादरला होता. ज्या व्यक्तीची हत्या झाली होती तो कोल्हापूरमधील एक कुख्यात गुंड होता. त्याचं नाव होतं भरत त्यागी.

भरत त्यागीच्या खुनात पोलिसांनी अनेकांना अटक केली. शेकडो लोकांच्या जबान्या घेतल्या. या सर्व तपासातून एक नाव पुढे आलं. ते म्हणजे 'एस. टी. सरकार गॅंग'. अर्थात संजय तेलनाडे सरकार गॅंग किंवा 'तेलनाडे बंधू'.

या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच एक फोटो व्हायरल झाला होता. पोलिसांनी 41 वर्षीय संजय तेलनाडेला अटक केली आणि त्यानंतर त्याची धिंड काढण्यात आली, असं कॅप्शन त्या व्हायरल फोटो खाली होतं.

'संजय तेलनाडेला अटक झाली हे सत्य आहे पण त्याची धिंड काढण्यात आली नव्हती तर आमचे वाहन खराब झाले म्हणून थोडे चाललो,' असे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले.

या सर्व घटनांनंतर संजय तेलनाडे कोण आहे आणि त्याबद्दल इतकी चर्चा होण्याचे कारण काय आहे असे प्रश्न अनेकांना पडले असतील. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात येत आहे.

संजय तेलनाडेचे वर्णन एका वाक्यात करायचे म्हणजे एका यंत्रमाग कामगाराचा मुलगा ते इचलकरंजीच्या गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असलेला एक कुख्यात गुंड असे करता येईल.

पण एका सामान्य यंत्रमाग कामगाराचा मुलगा इचलकरंजीच्या सर्वांत मोठ्या गॅंगचा प्रमुख कसा बनला हे समजून घेण्यासाठी मी सांगलीहून इचलकरंजीला पोहोचलो.

वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेलं शहर

हातकणंगले तालुक्यात पंचगंगा नंदीच्या काठी वसलेलं इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगाचे शहर म्हणून ओळखलं जाते. साधारणतः अडीच लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात नगर परिषद आहे.

ही नगर परिषद राज्यातील श्रीमंत नगर परिषदांपैकी एक म्हणून देखील ओळखली जाते. वस्त्रोद्योगामुळे इचलकरंजीचे नाव देशाच्या नकाशावर आहे.

इथल्या 'गावभाग' या एरियात जर तुम्ही फिरलात तर तुमच्या नजरेला शेकडो यंत्रे पडतील. त्यावर काम करणारे महिला-पुरुष आणि दिवसभर ऐकू येणारा धोट्याचा आवाज म्हणजे इचलकरंजीची खासियत.

तेलनाडे बंधू

फोटो स्रोत, Sarfaraj Sanadi

फोटो कॅप्शन, संजय आणि सुनील तेलनाडे

इचलकरंजीतील स्थानिक पत्रकार सांगतात, "या अशा शेकडो यंत्रमाग व्यावसायिकांपैकी एक होते शंकर तेलनाडे. मूळचे कर्नाटकातून आलेले शंकर तेलनाडे यांनी इचलकरंजीत वस्त्र व्यवसायात जम बसवला."

"गावभागातील मजुरांना बऱ्याचदा पैशाची अडचण भासत असे. तेव्हा त्यांना सावकारांचे दरवाजे वाजवावे लागत. कधी कधी सावकार नडलेल्या माणसाला अधिकच नाडत असे. त्यामुळे शंकर तेलनाडेंनीच आपल्या गाठीला असलेला पैसा उधार द्यायला सुरुवात केली. सावकारांपेक्षा कमी व्याजदर दिल्यामुळे तेलनाडेंकडे उधार घेणाऱ्यांची रांग लागायची.

"असं करत करत शंकर तेलनाडे हे स्वतः कधी सावकार बनले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. व्याप वाढल्यानंतर तेलनाडेंच्या हाताला त्यांची दोन्ही मुलं आली. कॉलेजमध्ये शिकणारे संजय आणि सुनील हे भाऊ आपल्या वडिलांसाठी वसुली करू लागले," स्थानिक पत्रकार सांगतात.

वसुली करता करता संजय आणि सुनील हे दोघे देखील स्वतंत्ररीत्या आपला व्यवसाय करू लागले. वसुलीसाठी धाकदपटशा, धमक्या किंवा मसल पॉवर वापरणे ओघानेच आले आणि ही मसल पॉवर त्यांनी मिळवली तरुणांचे संघटन बांधून.

97-98 च्या सुमारास संजय कॉलेजमध्ये जाऊ लागला. कॉलेजमधल्या मुलांना हाताशी धरून त्याने वसुली जोमाने केली. पुन्हा ज्या लोकांना पैशाची गरज पडत असे ते देखील त्याच्याकडे येऊ लागले. व्याजाचा पैसा हाताशी खेळू लागल्यावर संजय जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात आला. त्याचा लहान भाऊ सुनील देखील त्याला मदत करू लागला.

त्यानंतर तेलनाडे बंधूंनी एक सूत्र अंगीकारले ते म्हणजे गावातल्या मुलांना रोजगार द्यायचा आणि त्याबदल्यात त्यांचा वापर करायचा. तेलनाडेली इतक्या मुलांना कामाला लावलं की त्याच्या एका हाकेवर दोन हजार मुलं गोळा होऊ शकत असत. त्याच जोरावर तो पुढे पुढे जाऊ लागला.

मटका किंग आणि क्रिकेट बेटिंगमध्ये नाव

इचलकरंजीमध्ये एकेकाळी मटक्याची खूप क्रेझ होती असं स्थानिक पत्रकार सांगतात, इचलकरंजीमधील गावभागात 1990-2000 च्या काळात तर रस्त्यावर मटका लावता येत असे.

किशोरवयीन मुलं आणि महिला देखील मटक्यात आपलं नशीब आजमावत असत. तेलनाडे बंधूंनी या देखील धंद्यात शिरकाव केला. व्याजबट्टा, जमीन खरेदी-विक्री, ट्रांसपोर्ट यानंतर तेलनाडे बंधू मटका व्यवसायात उतरले.

आधीच्या तुलनेत आता तेलनाडेंकडे कैकपटींनी पैसा येऊ लागला. त्यातून इतर मटकाकिंगविरोधात ठिगण्या देखील उडू लागल्या होत्या.

संजय तेलनाडे

फोटो स्रोत, Sarfaraj sanadi

2007 मध्ये सलीम हिप्परगी या मटकाकिंगचा खून झाला. तेलनाडे बंधू देखील याच व्यवसायात असल्यामुळे त्यांच्यावर देखील संशयाची सुई आली.

पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी देखील बोलावले होते. पण तेलनाडे बंधूंचा या हत्येशी काही संबंध आहेत असे सांगणारे पुरावे नव्हते.

सलीम हिप्परगीच्या मृत्यूनंतर तेलनाडेंना मटाक्यात आव्हान देणारं कुणी राहिलं नव्हतं. तेलनाडेंनी हळुहळू आपला जम जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या मटका व्यवसायात बसवण्यास सुरुवात केली. बघता बघता कर्नाटक, कोल्हापूर, सांगली,सातारा जिल्ह्यात मटक्याची जाळे पसरले आणि त्यांनी क्रिकेट बेटिंगदेखील सुरू केले.

तेलनाडे बंधूंचे नाव इतके झाले की कॉलेजातील तरुण आपल्या बाईकवर एसटी सरकार असं टाकायचे. ट्रक, वडाप, खासगी वाहतूक करणारी वाहने यावर एसटी सरकार झळकू लागले होते.

एसटी सरकार नाव कसे पडले?

संजय तेलनाडेचा एक जवळचा मित्र त्यांना सरकार म्हणत असे. त्यावरून त्यांच्या गँगला एसटी सरकार गॅंग असे नाव पडले असं स्थानिक पत्रकार सांगतात.

केबल एजन्सी घेऊन त्यांनी अनेक तरुणांना उत्पन्नाचं साधन मिळवून दिलं. या मित्र परिवाराच्या जोरावर 2011 मध्ये संजय तेलनाडे नगरसेवक म्हणून निवडून गेला.

एकीकडे तेलनाडे बंधूंचा मित्र परिवार वाढत होता तर त्याचवेळी हितशत्रूंची संख्या देखील वाढू लागली होती.

संजय तेलनाडे

फोटो स्रोत, Sarfaraj Sanadi

एकेकाळी इचलकरंजीपुरते मर्यादित असणारे तेलनाडे बंधू जेव्हा कोल्हापुरातील इतर भागात मटका व्यवसाय करू लागले आहेत ही गोष्ट तेथील मटका व्यावसायिकांना आवडणारी नव्हती. त्यातून वर्चस्वाची लढाई सुरू झाली.

कोल्हापूर येथील सिद्धार्थनगर भागात भरत त्यागी हा मटका व्यवसाय करत होता. भरत त्यागी आणि तेलनाडे गॅंगचे वारंवार खटके उडू लागले.

भरत त्यागीने थेट तेलनाडे बंधूंना थेट आव्हान दिले आणि त्यातूनच भरत त्यागीचा खून झाल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी संजय तेलनाडेला अटक करण्यात आली होती.

भरत त्यागीचा खून कसा झाला?

2 013 साली भरत त्यागीच्या हत्येनी कोल्हापूर जिल्हा हादरला होता. कारण ही हत्या दिवसाढवळ्या झाली होती. भरत त्यागीची हत्या कशी झाली होती याचा वृत्तांत त्या वेळी लोकसत्तामध्ये छापून आला आहे.

त्यानुसार, "रविवारी तो जयसिंगपूर येथे कामानिमित्त एकटाच गेला होता. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या प्रकाश बारमध्ये त्याने मद्यप्राशन केले. तेथून तो बाहेर पडून जवळच असलेल्या शहा पेट्रोल पंपाजवळ आला होता. तेथेच त्याला हल्लेखोरांनी गाठले.

"सफारी गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी प्रथम चाकूने हल्ला केला. त्यात तो खाली कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी बंदुकीतून त्याच्यावर सहा गोळ्या झाडल्या.

मान, छाती, पाय आणि पोटावर चार गोळ्या लागल्या. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. कोल्हापूर-सांगली रस्त्यावर मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली."

संजय तेलनाडे

फोटो स्रोत, Facebook Sanjay Telnade

फोटो कॅप्शन, संजय तेलनाडे

या हत्येनंतर संजय तेलनाडे फरार झाला. त्याला सप्टेंबर महिन्यात पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली.

तेलनाडेनी अटकेनंतर आपल्यावरील आरोप त्या वेळी फेटाळून लावले होते. पण त्याला पोलीस कोठडी मिळाली होती.

त्यानंतर काही महिने तुरुंगात काढून संजय तेलनाडे बाहेर आला. पुन्हा आपल्या व्यवसायावर त्याने लक्ष दिले. 2016 मध्ये पुन्हा नगर परिषदेची निवडणूक झाली यावेळी तर संजय तेलनाडे बिनविरोध नगर परिषदेत निवडून गेला.

पोलिसांनी आवळल्या मुसक्या

संजय तेलनाडेच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी हालचाल सुरू केली. संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी मोक्का हा कायदा लावला जातो. पोलिसांनी एसटी सरकार गॅंगविरोधात पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली.

इचलकरंजी शहरातील एस. टी. सरकार अर्थात तेलनाडे टोळीची दहशत हे दिवसेंदिवस वाढतच चालली होती. 2018 साली तेलनाडे यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी पाऊले उचलली.

सुनील तेलनाडे

फोटो स्रोत, Sunil telnade/Facebook

फोटो कॅप्शन, सुनील तेलनाडे सध्या फरार आहे.

तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, डीवायएसपी कृष्णा पिंगळे, डीवायएसपी गणेश बिरादार यांनी एस. टी. सरकार गँगवर कारवाई सुरू केली आणि संजय व सुनील तेलनाडे यांच्यासह त्यांच्या गॅंगवर 17 गुन्हे दाखल करत मोक्का कायद्यांतर्गत कारवाई देखील केली.

मोक्याच्या कारवाईनंतर मातरम तेलनाडे बंधू हे पाऊणे तीन वर्षांपासून फरारी होती.

खून, खुनाचा प्रयत्न, मटका, जुगार, बेटिंग, वाळू तस्करी, जमीन खरेदी, दहशत माजवणे, असे जवळपास 17 गुन्हे एस. टी. सरकार गॅंग म्हणजेचं संजय आणि सुनील तेलनाडे यांच्यावर दाखल आहेत.

तेलनाडे बंधू व त्यांच्या साथीदार टोळीवर दोनदा मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून संजय आणि सुनील तेलनाडे हे दोघे फरार होते.

तेलनाडेची धिंड काढण्यात आली का?

यातील एस. टी. सरकार गॅंगचा प्रमुख संजय तेलनाडे याला 1 जानेवारी 2022 रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी इचलकरंजी पोलिसांनी पुण्याच्या आंबेगाव येथून अटक केली.

संजय तेलनाडे

अटकेच्या कारवाईनंतर इचलकरंजी पोलिसांनी संजय तेलनाडे याला रविवारी 2 जानेवारी 2022 रोजी मोक्का न्यायालयात हजर केले.

ज्यामध्ये 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलो. त्यानंतर न्यायालयापासून काही अंतरापर्यंत पोलिसांनी संजय तेलनाडे याला पायी चालवत नेले.

त्यामुळे संजय तेलनाडे गँगची दहशत मोडीत काढण्यासाठी धिंड काढल्याची चर्चा सुरू झाली. पण पोलिसांनी हे फेटाळून लावले आहे. "गाडीत बिघाड झाल्याने काही अंतर चालवत घेऊन जावे लागले, मात्र गाडी आल्यानंतर पुन्हा गाडीतून नेण्यात आले," असं इचलकरंजी विभागीय पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या कडून सांगण्यात आले आहे.

तर याबाबत संजय तेलनाडे याचे वकील सुनील माने यांनी बीबीसी मराठीशी बोलताना आक्षेप नोंदवला आहे.

"आमचे अशील संजय तेलनाडे यांना चालवत नेण्याचा केलेले प्रकार हा न्यायालयाचे नियम मोडणारा आहे. याबाबतीत आपण लवकरच उच्च न्यायालयात 'कंटेम्प्ट ऑफ कोर्ट' दाखल करू," असे माने यांनी सांगितले आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)