'शेर शिवराज'चे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी मागितली खासदार अमोल कोल्हेंची माफी

सिनेदिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी फेसबुकवर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे वादाची ठिणगी पडली आहे. या पोस्टमुळे अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे नाराज झाले आहेत आणि त्यांनी ही नाराजी त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरून व्यक्तही केलीय.

दिग्पाल लांजेकर हे मराठीतील प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आहेत. ऐतिहासिक कथानकांना मोठ्या पडद्यावर नेण्याचं काम त्यांनी केलं आहे. फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलंय.

अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार असून, ते सिनेकलावंतही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका असलेल्या मालिका-सिनेमे त्यांनी केले आहेत.

नेमका वाद कुठून सुरू झाला?

झालं असं की, काही दिवसांपूर्वी दिग्पाल लांजेकरांनी फेसबुक अकाऊंटवरून त्यांच्या 'शेर शिवराज है' सिनेमाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट त्यांच्या एका चाहत्यानं लिहिली होती.

या पोस्टमध्ये अनेक वादग्रस्त विधानं दिसून येतात. याच पोस्टमध्ये डॉ. अमोल कोल्हेंबाबत सदर पोस्टकर्त्यानं लिहिलं होतं की, "टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि शंभूराजे म्हणजे मीच अशी कोल्हेकुई बंद करून शेर शिवराज हे असे असतात हे सिद्ध करणारा चिन्मय मांडलेकरांचा जबरदस्त अभिनय असलेला सिनेमा."

हे वाक्य असलेली पोस्ट दिग्पाल लांजेकरांनी स्वत:च्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून शेअर करत, हात जोडल्याचे इमोजी टाकले आहेत.

या पोस्टनंतर डॉ. अमोल कोल्हेंनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंट आणि 'अमोल ते अनमोल' या यूट्यूब चॅनेलवरून एक व्हीडिओ शेअर करत दिग्पाल लांजेकरांबद्दल आपली नाराजी व्यक्त केली.

आपल्या नाराजीचा व्हीडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये डॉ. अमोल कोल्हेंनी लिहिलंय की, "जय शिवराय! आजवर प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना मी कायमच त्या थोर व्यक्तिरेखांना नतमस्तक होत केवळ शिवशंभू भक्त आणि कलाकार म्हणून प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येकाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मान ठेवून इतरांच्या सादरीकरणावर कधीही नकारात्मक भाष्य केले नाही उलट कौतुकच केले.. असे असताना "अशा" प्रकारची पोस्ट लिहिणाऱ्यांचे व ती शेअर करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!"

दिग्पाल लांजेकरांनी मागितली माफी

डॉ. अमोल कोल्हेंच्या या नाराजीनंतर दिग्पाल लांजेकरांनीही 'मनापासून दिलगिरी' म्हणत माफीही मागितलीय.

दिग्पाल लांजेकर दिलगिरी व्यक्त करताना म्हणाले, "आताच माननीय खासदार श्री. अमोलजी कोल्हे यांची पोस्ट माझ्या बघण्यात आली. माझ्या फेसबुक वॉलवर शेअर झालेल्या एका पोस्टबाबत बोलत होते. ही जी पोस्ट आहे, ती माझ्या एका चाहत्यानं केली होती. अनेक चाहते 'शेर शिवराज है'नंतर भराभरा पोस्ट शेअर करत होते. त्यात अनावधनाने पहिल्या काही ओळी वाचून सोशल मीडिया पोस्ट शेअर केली गेली. नंतर खाली काहीतरी म्हटलं गेलंय कळल्यावर तातडीने उडवली गेली."

"दुर्दैवानं त्या पोस्टचा स्क्रीनशॉट काढून त्यांच्यापर्यंत पोहोचवला असेल. तर मी या माध्यमातून सांगू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या इतक्या मोठ्या कलावंताबद्दल माझ्या मनात कधीही आकस नाही आणि नसेल. कुठल्याही प्रकारे त्यांचा असा अनादर करण्याचा माझी मनस्वी भूमिका नसेल. तरीसुद्धा सदर पोस्ट वाचून, त्यांना वाईट वाटले असेल तर समाजमाध्यमातून माफी मागतो," असंही लांजेकर पुढे म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)