You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमोल कोल्हे यांनी साहित्य संमेलनामध्ये अभिजन-बहुजन वादावर नेमकं काय म्हटलं?
मराठी रंगभूमी ही केवळ अभिजनांसाठी न राहता बहुजनांच्या प्रबोधनाचं माध्यम होऊ शकली तरच काही साध्य होऊ शकेल, अशी स्पष्ट भूमिका खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मांडली.
नाशिकमधील अखिल भारतीय साहित्य संमेलनात 'मराठी रंगभूमी एक पाऊल पुढे, दोन पाऊल मागे' या परिसंवादावर चर्चा करण्यासाठी विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी हे मत व्यक्त केलं.
यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी कलाक्षेत्रातील अभिजन आणि बहुजन असा मुद्दा मांडत काळानुसार सर्वाभिमुख असे बदल होणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं.
'अभिव्यक्तीबरोबरच प्रबोधनही हवं'
"मराठी नाटकं अभिव्यक्तीपुरतीच मर्यादित राहिली, की त्यातून प्रबोधनही झालं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण अभिव्यक्तीच्या बाबतीत एक पाऊल पुढं जाताना, प्रबोधनाच्या बाबतीत दोन पावलं मागं गेलो असं होता कामा नये," असं अमोल कोल्हे म्हणाले.
रंगभूमी ही केवळ अभिजनांसाठी न राहता बहुजनांच्या प्रबोधनाचं ती जर माध्यम होऊ शकली, तरच हे एक पाऊल पुढं आणि दोन पावलं मागं वाटेल आणि ते जास्त महत्त्वाचं असेल असंही अमोल कोल्हे म्हणाले.
यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी अभिजन आणि बहुजन या मांडणीबाबत आणि त्यामागची नेमकी भूमिकाही मांडली. ही जातीवाचक किंवा तशा अर्थाने केलेली मांडणी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
या मांडणी मागचा अन्वयार्थ हा रंगभूमी समाजाभिमुख होणं असा असल्याचं अमोल कोल्हे यावेळी परिसंवादात बोलताना म्हणाले.
रंगभूमी समाजाभिमुख कधी होणार?
"आम्ही शफी सरांना (शफाअत खान) शिवाजी मंदिरला आल्यानंतर कौतुकानं पाहिलंय. चंद्रकांत कुलकर्णी सरांनी आमच्याकडे एक कटाक्ष टाकावा म्हणून आम्ही शिवाजी मंदिरच्या समोर तासन् तास ताटकळलोय. आमच्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या पोराला हे माहिती आहे की, जोपर्यंत यांचा कटाक्ष पडत नाही तोपर्यंत आमच्या नट असण्यावर मोहोरच पडत नाही, तोपर्यंत रंगभूमी समाजाभिमुख होणार कधी?" असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला.
असा प्रकारे समाजाभिमुख आणि प्रबोधनाचा विषय समोर येतो तेव्हा नेमकंच अभिजन आणि बहुजन हा विषय येतो असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.
"शफाअत खान कोणत्या समाजाचे आहे किंवा चंद्रकांत कुलकर्णी कोणत्या समाजाचे हे महत्त्वाचं न राहता, एक मान्यता मिळालेला अभिजन आणि त्यापासून वंचित राहिलेला बहुजन हा प्रवास पूर्ण होणं गरजेचं आहे."
जोपर्यंत हा प्रवास होत नाही तोपर्यंत एक दोन नव्हे तर 100 पावलं पुढं जाण्याची गरज आहे, असंही अमोल कोल्हेंनी म्हटलं.
केवळ चर्चांनी काय साधणार?
"साळुंके सर आपण 'रणांगण' सारख्या नाटकाचा उल्लेख केला. अत्यंत उत्तम प्रयोग होता. पण रंगभूमीचं दुर्दैव म्हणजे रणांगण हे नाटक नाशिकमधल्या दिग्दर्शकानं केलं असतं तर त्याचा उल्लेख साहित्य संमेलनाच्या या व्यासपीठावरून झाला नसता. त्यासाठी दिग्दर्शकही राजमान्यता असलेला असावा लागतो तेव्हाच अशा व्यासपीठावरून त्याचा उल्लेख होतो," अशी थेट भूमिका मांडत अमोल कोल्हे यांनी मराठी नाट्यक्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मत मांडलं.
जोपर्यंत अशा प्रकारचे प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत अशा चर्चांमधून काय साध्य होणार? असं अमोल कोल्हे यांनी यावेळी म्हटलं.
रंगभूमी कशाप्रकारे जुन्याच किंवा एका ठरावीक टप्प्यात अडकून आहे हे एका उदाहरणाच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांनी मांडलं.
"परवा एका मावशीने सांगितलं लग्नात फार भरजरी शालू होता. 50 वर्षांपूर्वी सगळे बघत होते असा शालू लग्नात घेतला होता. त्यावर मावशीबाईंना विचारलं आजची परिस्थिती काय? तेव्हा 50 वर्ष त्या शालूच्या भरजरी पणातच मी रंगले, असं मावशी म्हणाल्या. आपल्या रंगभूमीचंही असंच तर होत नाही ना? असा विचारही आपण प्रामाणिकपणे केला पाहिजे," असं म्हणत अमोल कोल्हे यांनी त्यांची भूमिका मांडली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)