You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवारांना भीमा कोरेगाव प्रकरणी समन्स #5 मोठ्याबातम्या
विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. शरद पवारांना भीमा कोरेगाव प्रकरणी समन्स
शरद पवारांना भीमा कोरेगाव आयोगापुढे चौकशीकरता हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स जारी झालं आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
5 आणि 6 मे रोजी मुंबईत होणाऱ्या सुनावणीत हजर राहण्यासाठी आयोगानं पवारांना बजावलेलं हे तिसरं समन्स आहे.
1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. पुणे जिह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवला असला तरी राज्य सरकरातर्फे चौकशी आयोगाचं कामकाज सुरूच आहे.
'भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे जबाबदार असून त्यांनी तिथलं वातावरण बिघडवलं होतं. तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा तपास यात कमालीचा विरोधाभास आहे', असं पवारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होत.
त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची साक्षही चौकशी आयोगाने नोंदवली पाहिजे अशी त्यांची मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता.
2. संभाजी भिडे सायकलवरुन पडले; खुब्याला दुखापत, रुग्णालयात केले दाखल
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे सायकलवरून पडून जखमी झाले आहेत. ही बातमी लोकमतने दिली आहे.
संभाजी भिडे यांना खुब्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संभाजी भिडे सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाल्याचे समोर आलं आहे.
संभाजी भिडे नेहमी सायकलवरून प्रवास करतात. ते संध्याकाळी शहरातल्या गणपती मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते.
दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर सायकलवरून ते पुन्हा आपल्या घरी निघाले. मात्र याचदरम्यान काही अंतरावर गेले असता त्यांना अचानकपणे चक्कर आली आणि ते सायकलवरून खाली पडले.
दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे.
3. संपूर्ण देशात उष्णतेचा कहर, महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये पारा 41 पार
देशातील 70 टक्के भागांत उष्णतेची लाट आलेली आहे. ही बातमी दिव्य मराठीने दिली आहे.
बुधवारी देशातल्या 33 शहरांत तापमान 44 अंशाच्या वर होते. यातल्या 7 शहरांत तापमान 45 अंशाहून अधिक होते.
महाराष्ट्रात 25 हून अधिक शहरांत पारा 41 अंशाच्या वर गेला आहे. ब्रह्मपुरी आणि वर्धा शहरांत तापमान 45 अंशावर होतं.
भारतीय हवामान विभागाने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. मात्र, विदर्भामध्ये सर्वात जास्त उन्हाची तीव्रता राहणार असल्याचे सांगितलं.
आगामी आठवडाभर राज्यात उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून कमाल तापमानाचा पारा चढता राहणार आहे.
4. औरंगाबादच्या किराणा दुकानात नोटांचा पाऊस, हवाला रॅकेटचा पोलिसांचा संशय
औरंगाबादमध्ये एका तांदूळ व्यापाऱ्याकडे छापा टाकून पोलिसांनी 1 कोटी 9 लाख रुपये जप्त केलेत.
हा सगळा व्यवहार हवालाचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याच दुकानातून शहरातील हवाला व्यवहार होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीने आता जीएसटी आणि आयकर विभाग तपासणी करणार आहे. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
पोलीस काही दिवस या दुकानावर लक्ष ठेवून होते. या दुकानात मशीननं नोटा मोजणं सुरू असल्याचं कळल्यावर पोलिसांनी छापा टाकला, यावेळी दुकानातलं चित्र पाहून पोलीसही चक्रावले.
अनेक लोकं दुकानात जात होती, पण कोणतंही सामान न घेता रिकाम्या हाताने बाहेर येत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
पोलिसांना संशय आल्याने दुकानावर छापा टाकण्यात आला. यावेळी दुकानाच्या ड्रॉव्हरमध्ये 200 आणि 500 रुपयांच्या नोटांची बंडलं आढळून आली. पोलिसांनी दुकानाच्या मालकाकडे याबाबत विचारणा केली. पण त्याला याचं उत्तर देता आलं नाही.
हे पैसे हवालाचे असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आयकर आणि जीएसची विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं.
5. मल्याळम अभिनेता-निर्मात विजय बाबूवर बलात्काराचा गुन्हा दाखल, पीडितेचं नाव केलं उघड
प्रसिद्ध मल्याळम् अभिनेता-निर्माता विजय बाबूवर एका अभिनेत्रीचा बलात्कार केल्याचा आरोप आहे आणि त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसंच एका फेसबुक लाईव्हमध्ये या पीडितेची ओळख जाहीर केल्याबद्दल विजय बाबूवर आणखी एक केस दाखल झाली आहे. ही बातमी NDTV ने दिली आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून हा अभिनेता बेपत्ता असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
विजय बाबूच्या प्रोडक्शन कंपनीच्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्रीने 22 एप्रिलला पोलिसांकडे तक्रार केली आणि आपल्यावर झालेल्या कथित अत्याचाराची एक सविस्तर पोस्टही फेसबुकवर लिहिली.
या अभिनेत्रीचं म्हणणं आहे की विजय बाबूने तिचं लैंगिक शोषण केलं आणि तिला मारहाणही केली. त्याने आपल्याला जबरदस्ती ड्रग्स घ्यायला लावल्याचा आरोपही तिने केला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)