कोरोनाची चौथी लाट येईल की नाही याबद्दल टास्कफोर्सचे डॉ. राहुल पंडित काय म्हणाले?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

मुंबईत कोव्हिड-19 रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सने बंदिस्त सभागृहात मास्क वापरण्याची सूचना केलीये. टास्कफोर्सने याबाबत राज्य सरकारला शिफारसही केलीये.

महाराष्ट्रात राज्य सरकारने मास्कसक्ती हटवली आहे. मास्क वापरणं ऐच्छिक करण्यात आलंय. तज्ज्ञ म्हणतात, कोरोना व्हायरस सतत बदलतोय. त्यामुळे, मास्क संसर्गापासून बचावाचं एकमेव शस्त्र आहे.

दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या हजारापार पोहोचलीये. तर, मुंबईत 57 दिवसानंतर रुग्णसंख्या शंभरीपार पोहोचली आहे. त्यामुळे, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केलीये.

तज्ज्ञांच्या मते, कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ होत असली तरी, याला चौथी लाट म्हणता येणार नाही. पण, कोरोना नियंत्रणासाठी मास्कसक्ती झाली पाहिजे का? महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे डॉ. राहुल पंडित यांच्याशी साधलेला हा संवाद.

मुंबई, दिल्लीत कोरोनारुग्णांची संख्या वाढतेय, तुम्ही या परिस्थितीकडे कसे पहाता?

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालीये यात काहीच वाद नाही. उत्तरेकडील राज्यात प्रामुख्याने वाढ दिसून येतेय. मध्य आणि दक्षिण भारतात ही वाढ जास्त नाहीये. यात दोन प्रमुख गोष्टी आहेत. फक्त रुग्णसंख्या किती वाढतेय याकडे न पहाता. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या किती?

आयसीयूत किती रुग्ण दाखल होत आहेत? याकडे लक्ष द्यायला हवं. सद्यस्थितीत ही परिस्थिती अजिबात नाही. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे.

भारतात कोरोनारुग्णांची संख्या वाढण्यामागे काही नवीन म्युटंट कारण आहे?

कोरोना व्हायरस सतत बदलतोय. त्यामुळे आपण जिनोम सिक्वेंसिंग जास्तीत जास्त केलं पाहिजे. जेणेकरून कोरोना व्हायरसचा कोणता नवीन स्ट्रेन किंवा म्युटंट आहे का? याची माहिती आपल्याला मिळेल. या नविन स्ट्रेनची माहिती लवकर मिळू शकेल. जितकं जास्त होईल करणं आवश्यक आहे.

भारतात ओमिक्रॉनचेच व्हेरियंट आढळून येत आहेत. सद्य स्थितीत नवीन व्हेरियंट असल्याचं दिसून येत नाहीये. जिनोम सिक्वेंसिंगमधून आपल्याला अलर्ट मिळेल.

कोरोनाची चौथी लाट येईल?

कोरोना संसर्गाची चौथी लाट येईल का नाही हे निश्चित सांगता नाही. काही तज्ज्ञ म्हणतात चौथी लाट येईल तर काही म्हणतात नाही. पण, एक गोष्ट निश्चित कोरोना कुठेही गेलेला नाही.

आपल्याला कोरोनासोबत जगावं लागणार आहे. त्यामुळे, चिंता करून घाबरून जाण्याचं कारण नाही. पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही. कोरोना नियंत्रणात कसा ठेवता येईल. जनजीवन कसं सुरू राहील याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं.

आपल्याकडे सोशल डिस्टंसिंग शक्य नाही. कोरोनाबाबत कोणतंही रॉकेट सायन्स अजूनही नाही. त्यामुळे मास्क वापरणं आणि लसीकरण अत्यंत महत्त्वावं आहे.

मास्कसक्ती गरजेची आहे?

कोरोना नियंत्रणासाठी वेळीच पावलं उचलावी लागतील. रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयार रहायला हवं. यासाठी मास्क वापरण्यावर भार देणं गरजेचं आहे. खासकरून, थिएटर, मॉल, ऑफिस, रुग्णालयं अशा बंदीस्त ठिकाणी मास्क घातलं पाहिजे.

या ठिकाणी संसर्गाचा प्रसार जास्त होतो याबाबतचा डेटा उपलब्ध आहे. ज्याठिकाणी हवा खेळती रहात नाही, त्याठिकाणी मास्क घातल्यास संसर्ग नियंत्रणात ठेऊ शकू. प्रत्येकाने एक सवय म्हणून मास्क वापरलं पाहिजे. बाहेर असताना मास्क घातलं तर नक्कीच चांगलं.

बंद ठिकाणी, ज्याठिकाणी एसी आहे तिथे मास्क हा संसर्गापासून बचावाचा एकच पर्याय आहे. बंद परिसरात लोकांना मास्क ऐच्छिक म्हणून नाही तर, एक सवयीचा भाग म्हणून घालावं. मास्कसक्ती करावी का नाही हा सरकारचा निर्णय आहे.

मास्क घालण्यासाठी कोणीच सक्ती केलेली नाही. मास्क तुमच्या आरोग्यासाठी घालावा असा यामागचा संदेश आहे. तुम्ही सुरक्षित असाल तर, तुमचे कुटुंबीय सुरक्षित रहातील. म्हणून बंदीस्त ठिकाणी मास्क गरजेचं आहे.

रुग्णांना होणारा आजार गंभीर आहे?

आत्तापर्यंत लोकांना होणारा आजार गंभीर नसल्याचं समोर आलंय. याची दोन प्रमुख कारणं. भारतात मोठ्या संख्येने लसीकरण झालंय. बहुतांश प्रौढांना लशीचे दोन डोस मिळाले आहेत. मुलांमध्ये लसीकरण वाढतंय. आपल्याकडे लसीकरणामुळे आणि नैसर्गिक संसर्गामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढलीये. आपल्याकडे जास्त रुग्ण नाहीत याचं कारण, आपली चांगली रोगप्रतिकारशक्ती.

रुग्णसंख्या वाढण्याची कारणं काय?

रुग्णसंख्या वाढण्याची अनेक कारणं असतात. प्रत्येक व्हायरसची एक सायकल असते. दर दोन-तीन महिन्यांनी व्हायरस पुन्हा येतो. फ्लूमध्ये असंच होतं. लोकं आपापसात मिसळू लागल्याने संसर्ग पसरण्याची भीती असते. केसेस कमी असतात, तेव्हा लसीकरण मंदावतं. त्यामुळे जेव्हा केसेस कमी आहेत त्यावेळी लसीकरण जास्त वाढलं पाहिजे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)