कोरोना: मास्क, लस आणि कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (27 एप्रिल) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकाऱ्यांची आढवा बैठक घेतली.

चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत:हून मास्क वापरणं, लस घेणं अपरिहार्य आहे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

राज्यात रुग्णांमध्ये फ्लू सदृश्य लक्षणं आढळल्यास तत्काळ आरटीपीसीआर टेस्टींग करा, राज्यातील टेस्टिंगची संख्या तसेच लसीकरणाचा वेग वाढवा अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.

राज्यात पुन्हा एकदा गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज 27 एप्रिल रोजी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितलं.

बैठकीसाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्यसचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्यासह अनेक उच्चस्तरिय अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज दुपारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली.

चीनमधील 40 कोटी जनता सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. आपणही कोविडच्या तीन लाटांचा सामना केला असला तरी यात आपल्यापैकी अनेकांनी आप्तस्वकीयांना गमावले आहे, यासाठी लावलेल्या निर्बंधांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली, अनेकांचे रोजगार या काळात गेले असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

राजेश टोपे काय म्हणाले?

राज्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी टेस्टिंग वाढवण्याची गरज असून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

तसंच आरोग्य संस्थांमधील सर्व संयंत्रांची देखभाल दुरुस्ती करताना फायर ऑडिटचे काम ही पूर्णत्वाला न्यावे असंही ते म्हणाले.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा एकदा गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा आज (27 एप्रिल) घेतला. यावेळी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आणि कोरोना टेस्टिंगबाबत चर्चा झाल्याचं राजेश टोपे म्हणाले.

राज्यात दररोज जवळपास 25 हजार जणांचं टेस्टिंग होत आहे. कोरोना केसेस वाढत असल्याने टेस्टिंग वाढवलं जाणार आहे.

  • 6-12 वयोगटासाठी लसीकरणासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
  • 12-15 वयोगटाच्या लसीकरणाकडे लक्ष देण्याची गरज असून यासाठी पालक आणि शिक्षकांना विश्वासात घेऊन मोहीम सुरू केली जाणार आहे.
  • राज्यात कोरोनाचे नवीन व्हेरियंट आढळले असले तरी ते ओमिक्रॉनचाच भाग असल्याचंही टोपेंनी स्पष्ट केलं.

राज्यातील सर्व महसूल, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था चोख राहील यादृष्टीने दक्ष राहण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

लसीकरणाच्या सक्तीसाठी केंद्राकडे मागणी करणार

केंद्र शासनाकडे लसीकरण सक्तीचे करण्याबाबत तसंच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बुस्टर डोस देतांना 9 महिन्याचा कालावधी कमी करण्याबाबत पत्र पाठवणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यस्तरावर कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवश्यक ती जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

18 ते 59 या वयोगटातील नागरिकांना शासकीय रुग्णालयातून बुस्टर डोस देण्याबाबतचा शासन विचार करत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)