You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फॅबइंडिया : कपड्यांच्या 'या' ब्रॅंडवर हिंदुत्ववादी लोकांचा इतका राग का?
- Author, सौतिक बिश्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आपल्या पारंपारिक कपड्यांच्या डिझाईनसाठी प्रसिद्ध असणारा ब्रॅण्ड फॅबइंडिया कायमच वादात अडकत असतो, विशेषतः उजव्या विचारांच्या हिंदुत्ववादी संघटनांच्या निशाण्यावर येत असतो.
आता प्रश्न असा आहे की, जो ब्रँड आपल्या स्थानिक परंपरांमध्ये रूजलेल्या मुळांची जाहिरात करत असतो त्याची प्रतिमा राष्ट्रवादी लोकांच्या मनात वाईट का?
गेल्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक आणि भाजपचे समर्थक विवेक अग्निहोत्री यांनी फॅबइंडियावर जोरदार टीका केली.
त्याच महिन्यात फॅब इंडियाने हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्यामुळे आपली एक जाहिरात मागे घेतली.
आपल्या पाच ट्वीट्सच्या थ्रेडमध्ये विवेक अग्नीहोत्रींनी फॅब इंडियावर आरोप केला की हा ब्रँड 'संस्कृती नसणाऱ्या शँपेन पिणाऱ्या, तथाकथित लिबरल, काँग्रेसी विचारधारेच्या लोकांचा आवडता ब्रँड आहे.'
विवेक पुढे म्हणाले की, "या ब्रँडचे संस्थापक जॉन बिसेलही अमेरिकन होते, जे फोर्ड फाऊंडेशन ग्रँटवर भारतात आले होते."
फॅबइंडियाची भारतातल्या 123 शहरांमध्ये 300 दुकानं आहेत आणि जगभरात इतर ठिकाणी 11 दुकानं आहेत.
फॅबइंडियावर टीका करणारे अग्निहोत्री पहिलेच नाही. याआधीही भारतातले लोकप्रिय लेखक चेतन भगत यांनी 2012 साली ट्वीट करून म्हटलं होतं की 'फॅबइंडियाचे कपडे घातल्यामुळे' तुम्ही बुद्धीजीवी आहात हे सिद्ध होत नाही.
2014 साली भारतात नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर लिबरल लोकांना सोशल मीडियावर सतत टीकेला सामोरं जावं लागतं.
जगभरात इतर ठिकाणी जे घडतंय तेच भारतात घडतंय आणि उदारमतवादी विचारसरणीवर हल्ले होत आहेत.
लोकांना वाटतं की लिबरल लोक फक्त अक्कल पाजळतात, इतरांची थट्टा करतात आणि त्यांना कमी लेखतात.
त्यामुळे विवेक अग्निहोत्रींनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, "फॅबइंडियाचे ग्राहक हे दांभिक लोक आहेत. त्यांना भारतीय दिसायचं आहे पण भारतीय संस्कृतीशी काहीही देणंघेणं नाही."
हा वाद चिंताजनक आहे. 'द फॅब्रिक ऑफ अवर लाईफ - स्टोरी ऑफ फॅबइंडिया' या पुस्तकाच्या लेखिका राधिका सिंह म्हणतात, "सुरुवातीला फॅबइंडिया उच्चभ्रूंचा ब्रँड होता हे खरंय. ते गालिचे बनवून त्याची निर्यात करायचे. याची सुरुवात 60 च्या दशकात झाली. जो माल निर्यात व्हायचा नाही त्याची विक्री दिल्लीतल्या एका गोडाऊनमधून श्रीमंत भारतीयांना केली जायची. याचं पहिलं दुकान दिल्लीत 1974 साली उघडलं."
1990 च्या शेवटापर्यंत फॅबइंडिया हे नाव घराघरात पोहोचलं आणि भारतातही लोकप्रिय झालं. पत्रकार सुनील सेठींच्या शब्दांत सांगायचं झालं तर, "भारतीय मध्यमवर्गाच्या लूकची व्याख्या' फॅबइंडिया ठरलं.
हाताने विणलेले किंवा हाताने प्रिंट केलेले कपडे आणि डिझाईन स्थानिक कलाकारांच्या हाताला काम देत होते. आज फॅबइंडिया भारतात 55 हजाराहून जास्त कलाकारांना रोजगार देतं असा त्यांचा दावा आहे.
'बिन्धास पीपल' या हॅन्डलूम कलाकारांना रोजगार देणाऱ्या संस्थेच्या सहसंस्थापक मीता मस्तानी म्हणतात की "त्यांचे कपडे कॉटनचे असतात, वापरायला सोपे आणि हलके असतात. या कपड्यांचा संबंध परंपरेशी जोडलेला असतो आणि त्या बरोबर कूल दिसण्याशीही."
पण आता हा ब्रँड फक्त कपडेच बनवत नाही. आता ते फर्निचर, पडदे, गालिचे आणि ऑरगॅनिक फुडही विकतात. फॅबइंडिया स्वतःचं वर्णन करताना म्हणतात की, 'भारतातली सगळ्यात मोठी खाजगी जागा जिथे पारंपारिक पद्धतीने, हाताने वस्तू बनवल्या जातात.'
याचं वर्णन करताना भारतातली माध्यमं 'लाईफस्टाईल ब्रँड' असं करतात.
येल विद्यापीठात मानववंशशास्त्राच्या प्राध्यापक असणाऱ्या जेन लिंच यांनी फॅबइंडियावर रिसर्च केला आहे. त्या म्हणतात, "लोक अनेकदा स्वतःची ओळख फॅबइंडिया वापरणारी/वापरणारा अशी करून द्यायचे किंवा मला विचारायचे की मी फॅबइंडिया वापरते की नाही."
जेन यांच्या मते ही शहरी मध्यमवर्गीय ओळख होती.
फॅबइंडियाचे कपडे सुती असले तरी ते कधीही भारताच्या 'आंदोलन फॅशन' चा भाग बनले नाहीत. ही ओळख खादीची होती, आहे. स्वातंत्र्य लढ्यात चरख्याने कातलेल्या सुतापासून खादीचे कपडे बनायचे आणि ते स्वातंत्र्य चळवळीची ओळख बनले आणि म्हणूनच खादी आंदोलनाचं प्रतिक बनली.
विवेक अग्निहोत्रींनी अशाच प्रकारचं वक्तव्यं केलं की 'खरे, प्रामाणिक लोक खादी घालतात आणि फक्त दांभिक लोक फॅबइंडियाचे कपडे वापरतात.'
फॅबइंडियाचा संबंध भारतातल्या लिबरल लोकांशी कसा जोडला गेला? (हे जाणून घ्यायला आम्ही फॅबइंडियाशी संपर्क केला पण त्यांचं यावर बोलायला नकार दिला.)
प्रख्यात लेखिका शोभा डे याबद्दल आपलं मत मांडताना म्हणतात, "उजव्या विचारसरणीच्या लोकांचा राग ओढावून घेणं अजिबात अवघड नाहीये. फॅबइंडियाला उच्चभ्रू असं लेबल लावलेलं असल्याने त्यात अजून भर पडते. अर्थात याची सुरुवात अमेरिकन व्यक्तीने केली ही बाबही महत्त्वाची ठरते. या ब्रँडमध्ये स्थानिक, भारतीय माणसांचा सहभाग नाही मग ही तो खरंच 'आपलं' प्रतिनिधित्व करतो का? हा प्रश्न उभा राहातो."
शोभा डे यांच्यामते फॅबइंडिया 'चळवळीत काम करणाऱ्या, पण उच्चभ्रू झोलाछाप कार्यकर्त्यांसाठी हा ब्रँड आहे. ज्यांना पारंपारिक कपडे घालून कूल म्हणून मिरवायचं आहे. हे कपडेही स्वस्त नसतात. फॅबइंडिया म्हणजे दाखवण्यापुरती गरिबी आहे. गरीब दिसायचं पण स्टाईलमध्ये."
स्तंभलेखक संतोष देसाई म्हणतात की, "फॅबइंडियाचे कपडे म्हणजे झोलाछाप गरीब चळवळी आणि मॉडर्न भांडवलशाही यांची घातलेली सांगड आहे."
मग याचा अर्थ असा निघतो की फॅब इंडियाचे कपडे त्या लोकांसाठी आहेत ज्यांना कॉकटेलचा ग्लास हातात घेऊन चळवळ चालवायची आहे पण जमिनीवर काय घडतंय याचा त्यांना पत्ताच नाहीये."
संजय श्रीवास्तव लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. ते म्हणतात, फॅबइंडिया अशा हस्तोद्योग चळवळीशी संबंधित आहे जी काँग्रेस पक्षाने त्यांची सत्ता असताना पुढे नेली. त्यांचे कपडे एका विशिष्ट गटात म्हणजेच, 'समाजशास्त्र आणि कला विषयांचे प्राध्यापक' यांच्यात प्रसिद्ध होते.
आता हा गट मोदींवर टीका करतो.
प्राध्यापक श्रीवास्तव पुढे म्हणतात, "फॅबइंडियाचे प्रॉडक्ट शहरी भागातल्या सांस्कृतिक उच्चभ्रूंसाठी बनलेल्या आहेत. पण आता भारतात निमशहरी आणि ग्रामीण भागाचं प्रस्थ वाढतंय. इथले बरेच जण शहरी भागाकडे कामधंद्यासाठी जात आहेत. शहरी भागात भाजपला पाठिंबा देणारा मोठा वर्ग आहे आणि म्हणूनच फॅबइंडियाला प्रतिकात्मकरित्या लक्ष्य केलं जात असावं."
पण फॅब इंडिया वापरणारे सगळेच लिबरल गटाचे, नरेंद्र मोदींचे विरोधक असतील असं नाही. जेन लिंच म्हणतात, "फॅबइंडिया फक्त एका विचारधारेचं प्रतिनिधित्व करत नाही तर समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातून लोकांना एकत्र आणतं."
दुरवरच्या खेड्यांमधल्या हस्तकला, वस्त्रोद्योग कलाकारांना रोजगार देणाऱ्या फॅबइंडियाल 'मेक इन इंडिया'चा नारा देणाऱ्या मोदींचे समर्थक विरोध का करत असतील असा प्रश्न अनेकांना कोड्यात टाकतो.
फॅबइंडिया यंदा स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होईल. तेव्हा आपले 7 लाख शेअर्स ते कंपनीशी संबधित असणाऱ्या कलाकारांना आणि शेतकऱ्यांना भेट देणार आहेत.
देसाई म्हणतात, "कोणताही विचारधारा न मानणाऱ्या लोकांचा ब्रँड फॅबइंडिया बनला आहे. यामुळे लिबरल लोकांना लक्ष्य करणं सोपं जातं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)