उद्धव ठाकरेंविरोधात पंगा घेणाऱ्यांना दाखवला इंगा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्षांपूर्वी स्थापन झालं आणि तेव्हापासून या सरकारसमोरील राजकीय आव्हानं काही कमी होत नाहीत. एकामागोमाग एक राजकीय आव्हानं समोर उभी राहतायेत. त्यातही शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तर विरोधकांकडून थेट वार होताना दिसतायेत.

मात्र, असं एकीकडे चित्र असताना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं सुद्धा आपल्यावरील वार पलटवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेवर आरोप, टीका होत असताना, अनेक प्रसंगी शिवसेनेनंही विरोधकांना चितपट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी केलेल्या पलटवाराचं उदाहरण दिसून आलं. यापूर्वीही हे दिसून आलं होतं.

ठाकरेंविरोधात पंगा घ्याल, तर इंगा दाखवू, असाच काहीसा संदेश या कारवायांमधून देण्याचा प्रयत्न झाल्याचा दिसून येतो.

आपण या बातमीच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षांमधील म्हणजे ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून कोणत्या कोणत्या प्रसंगी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विरोधकांना इंगा दाखवण्याचा प्रयत्न केला, हे एकेक करून पाहू.

1.अर्णब गोस्वामींना तुरुंगाची हवा

2020 मध्ये अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या हत्येनंतर शिवसेना आणि रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यात संघर्ष उफाळून आला. सुशांतच्या आत्महत्येनंतर शिवसेना आणि अर्णब यांच्या दावे आणि प्रतिदावे होत होते.

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव आलं आणि संघर्ष टिपेला पोहोचला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू सातत्याने लावून धरली. त्यात भरीस भर म्हणजे रिपब्लिकन टीव्हीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आणि या वादात आणखी भर पडली.

या प्रकरणी अर्णब यांच्याविरुद्ध आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला. अर्णब यांनी माफी मागावी अशी मागणी शिवसेनेने आणि महाविकास आघाडीने लावून धरली.

हे सगळं सुरू असतानाच कथित टीआरपी घोटाळ्यात रिपब्लिक टीव्हीचे कार्यकारी संपादक आणि अन्य पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हेही प्रकरण फार गाजलं.

शेवटी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण वर आलं. अन्वय नाईक यांच्या मृत्यूला अर्णब गोस्वामी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आणि गोस्वामी यांना अटक करण्यात आली. ही अटक अनेक अर्थाने वादग्रस्त ठरली. या सर्व प्रकरणात उद्धव ठाकरेंनी आधी संयम दाखवला आणि एका विशिष्ट वेळी कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

यात सातत्याने उद्धव ठाकरेंबद्दल बोललं जात असतानाही त्यांनी संयम ठेवला होता आणि शेवटी त्यांचा संयम कारवाईच्या रुपात संपला.

अर्णब गोस्वामींना एक रात्र तुरुंगात काढावी लागली. मात्र, नंतर 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका झाली. असं असलं तरी अर्णब गोस्वामींना तुरुंगाची हवा मात्र खावी लागली.

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यानंतर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा अपमान करणंच अर्णब गोस्वामींना अधिक भोवलं होतं, हे स्पष्ट आहे.

2.नारायण राणेंना केंद्रीय मंत्री असतानाही अटक

नारायण राणे आणि शिवसेनेमधील वैर दोन दशकांचं आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून नारायण राणे हे शिवसेनेविरोधात बोलण्याची आणि कृती करण्याची एक संधी सोडत नाहीत.

सध्या भारत सरकारच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी 23 ऑगस्ट 2021रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आणि 24 तासांत नारायण राणेंना अटक करण्यात आली.

ठाकरे कुटुंबाविषयी राणेंनी टोकाचं काही बोलण्याची ही पहिलीच वेळ नव्हती पण कोणाच्याही ध्यानी-मनी नसताना ठाकरे सरकारने आता ही कारवाई केली. या कारवाईचं कारणही तसंच होतं.

झालं असं होतं की, गेल्यावर्षी म्हणजे 2021 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयातील ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केले.

त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान मात्र त्यांचा गोंधळ उडाला. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरकमहोत्सव? यावरून मुख्यमंत्री गोंधळलेले दिसले असं ते म्हणाले.

"बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती", असं वादग्रस्त वक्तव्य केलं नारायण राणे यांनी केलं आहे.

"देशाच्या स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला माहिती नसावी? मला सांगा किती चीड येणारी गोष्ट आहे, असंही राणे म्हणाले. सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, सरकारला ड्रायव्हरच नाही", अशी टीका देखील त्यांनी केलीय. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला आहे.

यानंतर नारायण राणेंना केंद्रीय मंत्री असतानाही एक दिवस का होईना, पण तुरुंगाची हवा खायला लावण्यात आली.

3.राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान देत, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर राजकीय नाट्य रंगलं.

आपण रेल्वेनं मुंबईत दाखल होणार असल्याचं सांगून, राणा दाम्पत्य विमानानं मुंबईत आले आणि शिवसैनिकांना चकवा दिला. मात्र, शिवसैनिकांनी मातोश्री बंगल्याबाहेर आणि राणा दाम्पत्याच्या खारमधील खासगी निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी करत, राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी केली.

शिवसैनिकांच्या कडाडून विरोधानंतर राणा दाम्पत्यानं माघार घेत, हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मातोश्री बंगल्याबाहेर जाणार नसल्याचे जाहीर केले.

जोपर्यंत राणा दाम्पत्य माफी घेत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली. राणा यांना घरातून बाहेर काढण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि अधिकारी या परिसरात दाखल झाले होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी शिवसैनिकांना गर्दी कमी करण्याची विनंतीही केली. महिला शिवसैनिकांना रोखण्यासाठी आणि राणा यांना घराबाहेर जाण्या वाट करुन देण्यासाठी महिला पोलिसांचीही मोठी कुमक या परिसरात दाखल झाली होती.

त्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि खार पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

तिथं राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिवीगाळ केल्याचा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. तसंच, राणा दाम्पत्यावर शासन व्यवस्थेला आव्हान दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यातून कलम 124-अ म्हणजे राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आता राणा दाम्पत्याला 29 एप्रिल 2022 पर्यंत म्हणजे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरेंना थेट आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्यालाही तुरुंगाची हवा खावी लागते आहे.

4.किरीट सोमय्यांवर हल्ला

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सुद्धा शिवसेनेवर सातत्याने आरोप करत असतात.

2014-19 या काळात भाजप-सेनेचं सरकार असताना 2017 साली सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख 'बांद्रा का माफिया' असा केला होता. नंतर 2019 साली त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं नाही. उद्धव ठाकरेंमुळेच तिकीट कापलं गेल्याची चर्चा होती. आता भाजपा विरोधी पक्षात असल्याने किरीट सोमय्या शिवसेना नेत्यांवर अनेक आरोप करत असतात.

नुकतेच राणा दाम्पत्याला खार पोलीस ठाण्यात भेटायला गेले असताना, किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केलाय.

या हल्ल्यात त्यांच्या हनुवटीला किरकोळ दुखापत झाली. या हल्ल्याची तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या दिल्लीत दाखल झाले आहेत.

किरीट सोमय्यांनी या हल्ल्याची तक्रार केंद्रीय गृहसचिवांकडेही केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)