You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणेंनी दिली ठाकरे सरकार कोसळण्याची डेडलाईन; जून महिन्यात राजकीय वादळ #5मोठ्याबातम्या
आज सकाळी विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1.जून महिन्यात राजकीय वादळ; राणेंनी दिली ठाकरे सरकार कोसळण्याची डेडलाईन...
"आमच्याकडे कोकणात मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या सुरुवातीला वादळ येतं. त्यात हलणारी झाडं फांद्यांसकट कोसळून पडतात. हे तीन पक्षांचं एक झाड आहे, त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री आहेत, मुख्य खोडावर नाहीत. ते जून महिन्याच्या अगोदर जाणार आहेत." असं म्हणत भाजपाचे नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे.
लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
राणे हे वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर निशाणा साधला. या अगोदर राणेंनी मार्चपर्यंत सरकार पडेल असं म्हटलं होतं.
यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला.
ते म्हणाले, "सामना आणि संजय राऊत याबद्दल काही प्रश्न विचारू नका. त्यांना मी पत्रकार मानत नाही, संपादक तर नाहीच नाही. तुम्ही त्यांची भाषा, वैचारिकता बघा. मागील एका पत्रकारपरिषदेत त्यांनी घाणेरड्या शिव्या दिल्या. असा पत्रकार आणि असं सामनात छापून येतं. त्याला बोलायला काही जागा आहे का?"
2. दर्जेदार शिक्षण इंग्रजी शाळेतचं असतं हे डोक्यातून काढून टाका: बच्चू कडू
इंग्रजीत पोरगं बोललं की, बाप उड्या मारतो. मात्र इंग्रजी बोलतो म्हणून सगळे हुशार असं नाही. इंग्रजी म्हणजे दर्जेदार असतं हे डोक्यातून काढून टाका, मराठी शाळा सुद्धा दर्जेदार असतात, हे अभिमानाने सांगता आलं पाहिजे. आम्ही आमच्याच भाषेला पायाखाली ठेवून इंग्रजीचा वाहवा करत असू तर ते चुकीचे असल्याचे सांगत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांच्या कारभारावर ताशेरे ओढले.
सकाळने दिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बच्चू कडू बोलत होते.
यावेळी कडू म्हणाले की, "आर्थिक विषमता चालेल, परंतु ज्या दिवशी देशामध्ये शैक्षणिक विषमता निर्माण होईल, त्या दिवशी देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आता शैक्षणिक विषमता वाढत चालली आहे. आज मंत्र्यांचं तुमचं पोरगं चांगल्या शाळेत शिकतं आणि आम्हाला मते देणाऱ्याच्या पोराला शिक्षण भेटते की नाही हाच आमच्या पुढे प्रश्न आहे."
इंग्रजी शिकवलेले 20 टक्के पोरं गावाच्या बाहेर जातात, 80 टक्के गावातच राहतात, त्यांच्यासाठी आमच्याकडे काय व्यवस्था आहे, ही बाबही लक्षात घेतली पाहिजे. शिक्षणाधिकाऱ्याला परत करण्याची ताकद जर चपराशी आणि संस्थाचालकांमध्ये आहे तर सरकार आहे कुठे? असा सवालही कडू यांनी यावेळी केला.
3. मुंबईतील मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज झाला कमी
मशिदींवरील भोंगे काढण्याच्या मनसेच्या मागणीवर मुंबईत धुमशान सुरू असताना, मुंबईतील 72 टक्के मशिदींनी पहाटेचा भोंगा बंद केला असल्याचं समोर आलंय. भोंग्याचा वापर न करताच पहाटेची अजान केली जात असल्याचे पोलिसांनी गोपनीयरीत्या घेतलेल्या आढाव्यात पुढे आलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुंबईसह राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी पुरेपूर खबरदारी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्याच आठवड्यात मुंबईतील सर्व धर्मांचे धर्मगुरू, मौलाना यांची पोलिसांनी बैठक बोलावली. या बैठकीत ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाने दिलेला आदेश उपस्थितांना अवगत करून देण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून ध्वनिप्रदूषण केल्यास कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जातो. यामध्ये शिक्षेची तरतूद कोणती हेदेखील धर्मगुरू, मौलवींना विस्तृतपणे सांगण्यात आले. कायदा मोडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा शब्दात पोलिसांनी समज दिल्याचे समजते.
धार्मिक सलोखा बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांच्या विविध शाखा लहानसहान घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. पोलिसांच्या विशेष शाखेने केलेल्या गोपनीय सर्वेक्षणात मुंबईतील 72 टक्के मशिदींनी पहाटे लाऊडस्पीकरवर होणारी अजान बंद केली आहे. तर, काहींनी न्यायालयाने परवानगी दिलेल्या पातळीपेक्षा भोंग्याचा आवाज कमी ठेवला आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होत नसून इतरांनाही त्या आवाजाचा त्रास होत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिलीय.
4. राज्यात मास्क परतणार?
कोरोनाच्या सुरुवातीपासूनचं केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांनी धडकी भरविली होती. देशातील बहुतांश रुग्ण या तीन राज्यांतून मिळत होते. यात दिल्लीचा देखील मोठा वाटा होता. आता पुन्हा दिल्लीसह पाच राज्यांत कोरोना वाढू लागला असून केंद्र सरकारकडून य़ा राज्यांना कोरोनाच्या पंचसुत्रीचे पालन करण्यासाठी पत्र आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.
लोकमतने ही बातमी दिली आहे.
दिल्ली आणि आजुबाजूच्या सीमावर्ती भागातील नोएडा एनसीआर, चंदीगड आदी भागात कोरोनाने टेन्शन वाढविले आहे. रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत नसले तरी पॉझिटिव्हीटी रेट 8 टक्क्यांवर गेला आहे. यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र पाठवून सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यावर जोर देण्यात आला आहे. कोणत्याही स्तरावर काळजी घेण्यात चूक झाली तर आजवर कोरोनावर मिळविलेले नियंत्रण कमी होईल.
5. देशातील हिंसाचाराप्रकरणी 13 पक्षांचे पंतप्रधानांना पत्र : उद्धव ठाकरेंचा सही करण्यास नकार
"देशभरात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत?" अशा आशयाचा प्रश्न विचारत प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सहीच नसल्यानं चर्चांना उधाण आलंय.
देशभरात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूलच्या ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मोदींना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावर सही केली नाही. या पत्रावर उद्धव ठाकरेंनी सही करावी यासाठी सर्व विरोधी पक्षनेत्यांनी तब्बल सहा तास वाट पाहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ABP माझा वृत्तवाहिनीने ही बातमी दिलीय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)