You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Amway: मल्टिलेव्हल मार्केटिंग, पिरॅमिड स्कीम म्हणजे काय? ED ने कारवाई का केली आहे?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीनं केलेल्या कारवाईमुळे 'अॅमवे' ही कंपनी सध्या चर्चेत आहे. सौंदर्यप्रसाधनं, व्हीटॅमिन सप्लिमेंट्स आणि होमकेअर प्रोडक्ट्सची थेट विक्री करणाऱ्या या कंपनीची भारतातील 757 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे.
मनी लाँड्रिंग विरोधी कायदा अर्थात PMLA अंतर्गत ईडीनं ही कारवाई केली. त्यात तामिळनाडूच्या दिंडिगल जिल्ह्यात असलेली अॅमवे इंडिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मालमत्ता जप्त झाली आहे.
यामध्ये जमीन, कारखान्याची इमारत, त्यातील मशिनरी, वाहनं आणि बँकेतील खाती तसंच मुदत ठेवींचा समावेश असल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
उत्पादनांची थेट विक्री आणि मल्टी लेव्हल मार्केटिंगच्या आडून पिरॅमिड स्किम चालवल्याचा अॅमवेवर आरोप आहे. अॅमवे हे आरोप कायम नाकारत आली आहे.
पण नेमका या कंपनीचा कारभार कसा चालतो? मल्टिलेव्हल मार्केटिंग आणि पिरॅमिड स्कीम म्हणजे काय? त्यातून नुकसान होऊ नये यासाठी काय करायला हवं?
मल्टीलेव्हल मार्केटिंग आणि पिरॅमिड स्किम म्हणजे काय?
आपल्या घरातूनच एखाद्या विशिष्ट कंपनीच्या सौंदर्यप्रसाधनं, डबे, व्हिटॅमिन सप्लीमेंट्स, घरगुती वापराच्या वस्तूंची विक्री करणारे लोक तुमच्याही आसपास असतील. यातले काहीजण थेट विक्री आणि मल्टीलेव्हल मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांशी जोडलेले असतात.
मल्टीलेव्हल मार्केटिंग हा साखळी पद्धतीनं केल्या जाणाऱ्या विक्रीचाच हा एक प्रकार आहे. म्हणजे यात आधी वस्तू खरेदी करणारे ग्राहक मग त्या वस्तूंची, प्रोडक्ट्सची इतरांना विक्रीही करतात.
या वस्तूंची विक्री करणाऱ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांनी डिस्ट्रिब्युटर, मेंबर, ब्रँड पार्टनर, सदस्य, सल्लागार अशी वेगवेगळी नावंही दिली आहेत.
हे सदस्य सामान्यतः प्रत्यक्ष प्रोडक्टच्या विक्रीतून नफा कमवू शकतात. पण काहीवेळा नव्या सदस्यांना भरती करून घेतल्यावर त्यांना कमिशन दिलं जातं.
म्हणजे समजा सदस्य क्रमांक 1 नं दोन जणांना ही प्रोडक्टस विकली आणि त्यांनाही सदस्य करून घेतलं. या दोघांनी पुढे आणखी तीन-चार जणांना सदस्य करून घेतलं. तर या सगळ्यांच्या कमिशनमधला एक वाटा पहिल्या सदस्यालाही मिळतो.
अशा प्रोडक्टच्या प्रत्यक्ष विक्रीपेक्षा नव्या सल्लागारांच्या भरतीवर जास्त भर दिला जात असेल, तर त्या व्यवसायाला पिरॅमिड स्कीम म्हटलं जातं.
कारण या योजनेत सुरुवातीच्या म्हणजे, टॉपवर असलेल्या काही व्यक्तींना भरपूर पैसा कमावता येतो, पण तळाशी असलेल्या बहुसंख्य लोकांना यातून काहीच मिळत नाही.
प्रसंगी अशा लोकांचं नुकसानही होतं, कारण प्रोडक्टस खरेदी करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो.
काही पिरॅमिड स्कीम्स वस्तूंच्या विक्रीवर नाही, तर सदस्यांच्या गुंतवणुकीवर अवलंबून असतात. म्हणजे तुम्ही सुरुवातीला काही पैसा गुंतवायचा. मग आणखी काही जणांना पैसा गुंतवायला सांगायचं, त्यातून तुम्हाला कमिशन मिळणार.
या कमिशनमधून पैसा मिळवण्याचं आमिष अशा कंपन्या दाखवतात. पण प्रत्यक्षात जगभरातील अनेक देशांमध्ये अशा पिरॅमिड स्कीमवर कायद्यानं बंदी आहे.
अॅमवे वर अशाच पद्धतीची पिरॅमिड योजना चालवल्याचा आरोप आहे. पण या कंपनीवर असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही आणि अशी कारवाई झालेली ही जगातली पहिलीच कंपनीही नाही.
'अॅमवे'वर आताच कारवाई का झाली आहे?
अॅमवे म्हणजे 'अमेरिकन वे'चा शॉर्ट फॉर्म. 1959 साली अमेरिकेच्या मिशिगनमध्ये या कंपनीची स्थापना झाली आणि जगभरात तिच्या अनेक शाखा निघाल्या. 1995 साली ही कंपनी भारतात आली.
भारतात 2006 पासूनच अॅमवेच्या व्यवसायावर वाजवीपेक्षा जास्त किंमतीला उत्पादनं विकण्याचे आणि आर्थिक घोटाळ्याचे आरोप होत आले आहेत.
2011 साली दाखल झालेल्या तक्रारीनंतर दोन वर्षांनी केरळ पोलिसांनी अॅमवे इंडियाच्या सीईओंसह काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटकही केली होती.
आताची कारवाईही त्या प्रकरणातल्या चौकशीअंतर्गतच होत असल्याचं अॅमवेनं मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं असून आपण तपासात सहकार्य करू असं आश्वासन दिलं आहे. काही वर्षांपूर्वी चीनमध्येही अॅमवेवर कारवाई झाली होती.
पिरॅमिड स्कीमपासून कसं वाचणार?
भारतातही डिसेंबर 2021 मध्ये थेट विक्रीसंदर्भातील ग्राहक संरक्षण नियम लागू केले आहेत, ज्याअंतर्गत अशा कंपन्यांच्या कारभारावर राज्य सरकारला बारकाईनं नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पूर्वी अशा पिरॅमिड स्कीम्समध्ये वस्तूंची विक्री करणारे लोक प्रत्यक्ष भेटत असत. आता त्यासाठी सोशल मीडिया, इन्फ्लुएन्सर्सचाही वापर होत असल्याचं युके, युरोप आणि आफ्रिकेतील देशांतही दिसून आलं आहे.
क्रिप्टो करन्सी व्यवहारातही अशा पिरॅमिड स्कीम्सचा वापर झाल्याचं दिसून आलं.
पिरॅमिड स्कीममध्ये अडकू नये यासाठी अर्थतज्ज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत.
- तुम्हाला सदस्यत्वाची ऑफर देताना ती कंपनी माहितीविषयी काही संदिग्धता ठेवते आहे का, हे नीट पाहा.
- तुमच्याकडे कोणी अशी योजना घेऊन आलं, तर इंटरनेटवर सर्च करून पाहा की त्या कंपनीचा रेकॉर्ड नेमका कसा आहे? ती चालवणारी माणसं कोण आहेत? त्यांचं नाव याआधी अशा कुठल्या वादात सापडलेलं नाही ना?
- तुम्ही लवकरात लवकर योजनेत सहभागी व्हा, अशी गळ घातली जात असेल, तर थोडं जपून.
- नेमकी कोणती प्रॉडक्ट्स विकली जाणार आहेत, प्रॉडक्टच्या विक्रीवर भर दिला जातो आहे की सदस्य वाढवण्यावर हे समजून घ्या.
- अशा कंपन्या अनेकदा आपल्या उत्पादनांपेक्षा या व्यवसायातून तुम्ही पैसा कसा कमावू शकता, याची जाहिरात करताना दिसतात.
- विक्री करू शकणार नसाल, तर वस्तू परत करता येतील का आणि त्यासाठी तुम्हाला रीफंड कसा मिळेल, याची माहिती घ्या.
- महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी वेळात जास्त नफा मिळेल अशा आशेनं भुलून जाऊ नका.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)