You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाबासाहेब आंबेडकरांना करिअरचा सल्ला विचारणारा विद्यार्थीच जेव्हा बनला त्यांचा आद्यचरित्रकार
- Author, ज्ञानेश्वर शिंदे
- Role, बीबीसी मराठीसाठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामान्य माणसाचे, चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे नाते कसे होते याविषयी अनेकांना कुतूहल असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते पण ते पित्याच्या वात्सल्याने आणि ममत्वाने सर्वांशी वागत असत म्हणून त्यांना बाबासाहेब म्हटले जाऊ लागले हा इतिहास तर सर्वपरिचित आहे.
पण आज मी तुम्हाला अशा दोन गोष्टी सांगणार आहे, ज्यातून डॉ. आंबेडकरांचे आणि सामान्य माणसांचे नाते कसे होते याची कल्पना तुम्हाला येईल.
बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ त्या दोन लोकांशी सख्यच जपले नाही तर त्यांनी त्या दोघांना त्यांचे चरित्रकार होण्याची देखील संधी दिली. एका व्यक्तीने डॉ. आंबेडकरांचे हिंदीतले पहिले चरित्र लिहिले आहे तर दुसऱ्या व्यक्तीने मराठीत बाबासाहेबांचे चरित्र लिहिले आहे.
त्यामुळे त्यांना बाबासाहेंबाचे आद्यचरित्रकार असे देखील म्हटले जाते. त्या दोन व्यक्ती कोण आहेत आणि त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचे उत्तर असे की रामचंद्र बनवधा यांनी बाबासाहेंबाचे पहिले हिंदी चरित्र लिहिले तर दुसरे चरित्र मराठीध्ये लिहिले ते म्हणजे तानाजी बाळाजी खरावतेकर या विद्यार्थ्याने.
तानाजी बाळाजी खरावतेकर हा कोकणातले शिक्षण आटोपून तो मुंबईला आला 1942-44 ला तो इंटर सायन्सला होता. पुढे हा मुलगा उदरनिर्वाहासाठी कराची मध्ये वास्तव्यास गेला.
त्याकाळी त्याने बाबासाहेबांना एक भावनाप्रधान असं पत्र लिहिलं, त्यात त्याने असं लिहिलं होतं की, "प्रिय बाबासाहेब, मी कोकणातला असून शिक्षणासाठी मुंबईत आलेलो आहे मी इंटर सायन्सच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे आणि आता लष्करामध्ये भरती चालू आहे. लष्करात नोकरी करायला गेलो तर माझे आर्थिक प्रश्न सुटतील लवकर नोकरी लागेल आणि पुन्हा अशी भरती कधी होईल हे माहीत नाही."
"मी एका पेचप्रसंगात सापडलेलो आहे की, मी नोकरी करू की शिक्षण घेऊ?" असं पंधरा ओळीचं पत्र जे त्याने बाबासाहेबांना लिहिलेलं आहे. आता कोणताच चेहरा नसलेल्या या पत्राला किंवा कुठलीच ओळख नसलेल्या या पत्राची सुद्धा दखल बाबासाहेबांनी घेतल्याचं दिसून येतं आणि त्याच्या पत्राला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात.
मला 21 तारखेला तुमचे पत्र मिळाले आहे ज्यात तुम्ही तुमच्या करिअरबाबत माझा सल्ला मागितला आहे. माझा सल्ला असा आहे की तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवावा आणि तुमची शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण होईपर्यंत नोकरीचा विचार करू नये..
त्यांनी बाबासाहेबांचा हा सल्ला मान्य केला. त्यांनी बीएचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि शिकता-शिकताच बाबासाहेबांचे एक छोटेखानी चरित्र लिहिले. इकडून तिकडून निधी गोळा करून त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं. 1946 मध्ये हे चरित्र प्रसिद्ध झालं ते देखील कराचीत. त्या पुस्तकाचं नाव आहे 'डॉक्टर आंबेडकर' मग त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या पुढे निघाल्या.
परंतु दुर्दैव असे की हा तरुण लेखक वयाच्या 26 व्या वर्षीच हे जग सोडून गेला.
50 प्रश्नांची उत्तरं आणि हिंदीतले पहिले चरित्र
बाबासाहेबांचं हिंदीतलं पहिलं चरित्र रामचंद्र बनवधा यांनी लिहिलंय. आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव होतं 'आंबेडकर का जीवन संघर्ष' हे पुस्तक बाबासाहेब हयात असतानाच ते प्रसिद्ध झालेलं होतं. आणि या पुस्तकाला बाबासाहेबांच पाहिलं आत्मचरित्र म्हणतात. हे चरित्र तयार करणारे जे लेखक होते, ते रामचंद्र बनवधा एक सरकारी अधिकारी होते आणि ते बाबासाहेबांच्या विचारांचे खूप मोठे चाहते होते. रामचंद्र बनवधा अमराठी होते, पण बाबासाहेबांच्या विचारांमुळे ते एकदम प्रभावित झाले होते...
ते एसपी म्हणूननिवृत्त झाले होते यानंतर त्यांनी बाबासाहेबांसोबत संपर्क साधायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला. या पत्रव्यवहारानंतर शेवटी बाबासाहेबांनी त्यांना रेल्वेमध्ये भेटण्याची वेळ दिली.
रामचंद्र बनवधा यांनी सोबत आणलेल्या 50 लेखी प्रश्नांचे उत्तरे बाबासाहेबांनी दिली. आणि या दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरावरूनच बाबासाहेबांचं पहिलं चरित्र तयार झालं. डॉ.'आंबेडकर का जीवन संघर्ष' या पुस्तकामुळेच 'रामचंद्र बनवधा' इतिहासामध्ये चरित्रकार म्हणून प्रसिद्ध झाले.
सामान्य व्यक्तीचे रूपांतरण चरित्रकारात कसे झाले?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जननेते तर होतेच पण त्यांनी इतर लोकांना देखील कार्य करण्याची प्रेरणा दिली. ही प्रक्रिया कशी घडली हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी केला.
तेव्हा ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे म्हणतात, "बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते तर ते राष्ट्रीय पातळीवरील नेते होते आणि नव्या राष्ट्राच्या निर्मितीमधील एक महत्त्वाचा घटक होते. जे महान नेते असतात या नेत्यांच्या बाबतीत एक सुंदर गोष्ट झालेली असते ते म्हणजे त्या व्यक्तीचे कार्य हे केवळ त्या व्यक्तीचेच कार्य न राहता त्याचे एका व्यापक जनलढ्यात किंवा चळवळीत रूपांतर होते.
"हे तेव्हाच होतं जेव्हा समाज आतून - बाहेरून नेत्यावर विश्वास देण्यासाठी तो पाहिजे त्या पद्धतीचा त्याग करायला तयार होतो.
"बाबासाहेब हे मास लीडर होते, ते समूहाचे नेते होते, समाजाचे नेते होते, ते राष्ट्रवादी नेते होते. जेव्हा बॅरिस्टर होऊन आले तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांचे नेत्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि काही कार्यकर्ते स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी बाबासाहेबांचे नेतृत्व स्वीकारलं.
"मुंबईमध्ये शिवतरकर आले, दादासाहेब गायकवाड आले. कोल्हापूरातून दत्तूजी पवार, हे सगळे लोक बाबासाहेबांकडे आकर्षित होत होते. आणि त्यांना कार्य करण्याची प्रेरणा मिळत असे," असं कांबळे उलगडून सांगतात.
आपली जनावरे विकून लोक चळवळीत सामील झाले
चळवळीत कार्य करणे म्हणजे घरादारावर तुळशीपत्र ठेवणे असते. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असे कित्येक लोक होते जे बाबासाहेंबाकडून प्रेरणा मिळाली म्हणून आंदोलनात सामील झाले. खरं तर या सर्वच लोकांची आर्थिक स्थिती चांगली होती असे नाही पण आंबेडकरांवरील प्रेमापोटी आणि विश्वासापोटी ते चळवळीत सामील झाले.
याविषयी उत्तम कांबळे सांगतात, "बाबासाहेबांवरचा प्रचंड विश्वास ही चळवळीची एक मोठी देणगी होती, एक मोठं वैशिष्ट्य होतं. इतका प्रचंड विश्वास भारतातल्या कोणत्याही नेत्याच्या वाट्याला कधी आला नाही. याचे उदाहरण म्हणजे त्यांच पहिलं मोठं आंदोलन महाडचा सत्याग्रह या सत्याग्रहाला देशभरातून महाराष्ट्रातून इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येतील असं कोणाला अंदाज नव्हता. पण प्रत्यक्षात वेगळंच घडलं कित्येक कुटुंबांनी आपली जनावरे विकून त्या आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यात महिला देखील मोठ्या प्रमाणात होत्या."
"आपण भारतीय चळवळीतल्या महिलांचा विचार करतांना आपण नेहमी महात्मा गांधी यांचं उदाहरण देतो. महात्मा गांधीच्या आंदोलनामध्ये भारतातल्या सगळ्या महिला मोठ्या प्रमाणात आल्या ही गोष्ट खरी आहे पण अस्पृश्य समाजातील महिला या प्रचंड मोठ्या प्रमाणात आल्या त्या डॉक्टर बाबासाहेबांच्या आंदोलनामध्ये.
"सामान्य लोक आणि बाबासाहेब एकमेकांना सोडू शकत नव्हते कारण ते त्यांना समजणाऱ्या आणि त्यांच्या मनाला भिडणाऱ्या भाषेतच बोलायचे. लोकांना वाटायचं की हे इतके उच्चशिक्षित आहेत आणि आपल्या सारखं बोलतात यामुळेच सर्वसामान्य जनतेच आणि आंबेडकरांच जैविक नातं होतं असं मी म्हणतो, असं उत्तम कांबळे सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)