You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रणबीर-आलियाचं लग्न जिथे होणार आहे त्या RK स्टुडिओला जेव्हा लागली होती भीषण आग
- Author, वंदना
- Role, टीव्ही एडिटर, बीबीसी भारतीय भाषा
मुसळधार पाऊस. एकाच छत्रीत एकमेकांना जागा करून देणारे प्रियकर आणि प्रेयसी. दोघे एकमेकांच्या जवळ आहेत आणि तरीही दोघांमध्ये अंतरसुद्धा आहे.
मुंबईतल्या प्रसिद्ध आरके स्टुडिओमध्ये चित्रीत झालेलं 'प्यार हुआ इकरार हुआ' हे 'श्री 420' चित्रपटातील प्रेमगीत 1967 साली सर्वांच्या ओठी होतं.
किती चित्रपटांमधील किती प्रेमकहाण्यांची सुरुवात आणि शेवट राज कपूर यांनी उभारलेल्या आरके स्टुडिओमध्ये झाला, याचा अंदाज बांधणं अवघड आहे.
आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या वास्तव जीवनातील प्रेमकहाणीचा पुढील भाग याच आरके स्टुडिओच्या आवारात पार पडणार आहे. त्यांच्या लग्नातील काही विधी इथे होणार आहेत.
रणबीरचे वडील ऋषी कपूर आणि आई नीतू कपूर यांच्या लग्नाचं रिसेप्शन इथेच झालं होतं.
1980च्या दशकात ऋषी व नीतू यांचं लग्न झालं, तेव्हा हिंदी चित्रपटउद्योगातील दिग्गज मंडळी इथे उपस्थित होती.
राज कपूर यांच्या विनंतीवरून खुद्द उस्ताद नुसरत फतेह अली खान ऋषी कपूर यांच्या 'संगीत समारोहा'मध्ये गाण्यासाठी आरके स्टुडिओमध्ये आले होते. ऋषी कपूर यांनी 'खुल्लम खुल्ला' या त्यांच्या आत्मचरित्रात हा उल्लेख केला आहे.
आरके स्टुडिओला लागलेली भीषण आग
आज आरके स्टुडिओची ती इमारत उरलेली नाही. 2017 साली भयंकर आग लागून या स्टुडिओचा बराच मोठा भाग आणि तिथली चित्रपटांशी संबंधित साधनसामग्री जळून खाक झाली.
कपूर कुटुंबियांनी 2018 साली या स्टुडिओचं आवार गोदरेज प्रॉपर्टीजला विकून टाकलं. पण अजूनही लोकांच्या मनांमध्ये आरके स्टुडिओच्या आठवणी जतन केलेल्या आहेत.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर, 1948 साली राज कपूर यांनी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी 'आरके फिल्म्स'ची स्थापना केली आणि आरके स्टुडिओचं स्वप्न उभारायला सुरुवात केली. एका अर्थी या स्टुडिओचा आणि स्वतंत्र भारताच्या स्वप्नांचा प्रवास समांतरपणे होत आला.
दोन एकरांवर पसरलेला आरके स्टुडिओ, तिथे जवळच असणारं राज कपूर यांचं निवासस्थान आणि राज कपूर यांचं व्यक्तिमत्व याबद्दलचे किस्से आजही तितकेच प्रसिद्ध आहेत.
लेखक व पत्रकार खुशवंत सिंग 1976 साली 'न्यूयॉर्क टाइम्स'मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीवर एक लेख लिहिण्याच्या निमित्ताने आरके स्टुडिओमध्ये गेले होते.
सिंग लिहितात, "मी रात्री तिथे गेलो. त्या वेळी खोलीत राज कपूर आणि झीनत अमान होते. 'सत्यम शिवम् सुंदरम्' या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. राज कपूर यांच्या खोलीत भिंतींवर हिंदू देवीदेवतांची छायाचित्रं होती, शिवाय येशू ख्रिस्त, नेहरू आणि राज कपूर यांच्या सर्व नायिका यांचीही छायाचित्रं होती. बुकशेल्फमध्ये पुस्तकं रचून ठेवलेली होती आणि काचेच्या एका फुलदाणीमध्ये सोन्या-चांदीची नाणी होती."
"राज कपूर यांनी मला सांगितलं की, ते परदेशी प्रवास करून परत येतात तेव्हा सुटी नाणी त्या फूलदाणीमध्ये टाकतात. 'मी या जगात नसेल तेव्हा मी कुठे-कुठे जाऊन आलो ते लोकांना या नाण्यांवरून कळेल, असं ते म्हणाले."
आरके स्टुडिओ ही सर्वांत वलयांकित निर्मितीसंस्था असल्याचं खुशवंत सिंग यांनी त्या वेळी लिहिलं होतं.
आरके स्टुडिओची प्रसिद्ध होळी
चेंबूरमधील या आरके स्टुडिओमध्ये उत्साहाने साजरा होणारा होळीचा सण असो की गणेशोत्सव असो, त्या भोवती कायमच एक वलय असायचं.
चित्रपटविषयक नियतकालिकांमध्ये आरके स्टुडिओतील होळीमधले किस्से आणि रंगांनी माखलेल्या नटनट्यांची छायाचित्रं पानं भरून प्रसिद्ध होत असत. निव्वळ ही छायाचित्रं पाहण्यासाठी लोक अशी नियतकालिकं विकत घेत असत.
आरके स्टुडिओच्या जवळचं राज कपूर यांचं निवासस्थानसुद्धा असंच वैशिष्ट्यपूर्ण होतं. 'कपूरनामा' या पुस्तकाच्या लेखिका मधू जैन लिहितात, "हे कॉटेज आपल्यासाठी मंदिरासारखं आहे, असं राज कपूर अनेकदा म्हणत असत. या कॉटेजचा दरवाजा म्हणजे चित्रपटकर्ते राज कपूर आणि कुटुंबात रमणारे राज कपूर यांच्यातील सीमारेषेसारखा होता. कौटुंबिक बाबी कधीही या निवासस्थानाचा उंबरा ओलांडून आत आल्या नाहीत."
मुंबईतील चेंबूरचा भाग विशेष प्रसिद्ध नव्हता, तेव्हासुद्धा आरके स्टुडिओचा परिसर पर्यटनस्थळासारखा झाला होता. असंख्य लोक स्टुडिओच्या प्रवेशद्वाराबाहेर गर्दी करत असत. प्रवेशद्वारावर आरके स्टुडिओचा विख्यात लोगो असायचा.
राज कपूर यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास आणि नर्गिस यांच्याशी निर्माण झालेले त्यांचे प्रेमसंबंध, याचा संदर्भ 'आरके स्टुडिओ'च्या लोगोला होता. राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेला आणि 'आरके फिल्म्स'च्या बॅनरखाली निर्मिती झालेला पहिला चित्रपट, 'आग' 1948 साली प्रदर्शित झाला पण तो फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर 1949 साली राज कपूर यांनी नर्गिस यांना सोबत घेऊन 'बरसात' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.
या चित्रपटातील एक दृश्य विशेष प्रसिद्ध झालं. त्यात राज कपूर एका हाताने व्हायोलिन वाजवत आहेत, तर दुसऱ्या हाताने त्यांनी नर्गिसला जवळ घेतलं आहे. या दृश्यातून स्फूर्ती घेऊन 'आरके स्टुडिओ'चा लोगो तयार करण्यात आला.
राज कपूर 1950 साली नर्गिस यांच्याच सोबत 'आवारा' या चित्रपटाचं चित्रीकरण करत होते, तेव्हा त्यांना 'घर आया मेरा परदेसी' हे गाणं चित्रीत करायचं होतं. तोवर त्यांच्या स्वप्नातील आरके स्टुडिओचं बांधकाम पूर्ण झालं नव्हतं. तिथल्या भिंती उभ्या राहिल्या होत्या, पण अजून त्यावर छत नव्हतं.
पण स्वप्नांच्या नगराचा आभास निर्माण करणारं ते गाणं त्याच वेळी- छत नसलेल्या आरके स्टुडिओमध्ये चित्रीत करण्यात आलं.
आरके स्टुडिओच्या आवारात रणबीर कपूरचा लग्नसमारंभ पार पडणार असल्याची चर्चा आहे, पण त्याला स्वतःला या स्टुडिओत चित्रीकरण करायची संधी कधीच मिळाली नाही. तरीही त्याच्या कुटुंबातील पिढ्यांचा अनेक वर्षांचा इतिहास या ठिकाणी घडलेला आहे.
'बॉबी', 'जिस देश मे गंगा बहती है', 'मेरा नाम जोकर', 'सत्यम्, शिवम्, सुंदरम्', 'जागते रहो', 'प्रेमरोग', 'राम तेरी गंगा मैली', असे अनेक चित्रपट व त्यातील गाणी इथे चित्रीत झालेली आहेत.
आगीमध्ये अनेक गोष्टी भस्मसात
या चित्रपटांशी निगडित असंख्य खुणा राज कपूर यांनी आरके स्टुडिओमध्ये जतन करून ठेवल्या होत्या.
'बॉबी'मध्ये डिंपल कपाडियाने घातलेला पोशाख त्या वेळी देशभर लोकप्रिय झाला होता, शिवाय 'श्री 420' आणि 'आवारा' या चित्रपटांमधील चार्ली चाप्लिनसारखा पोशाखसुद्धा आरके स्टुडिओमध्ये ठेवण्यात आला होता.
'आवारा'मध्ये राज कपूर नर्गिसच्या गळ्यात घालतात ती माळ, 'प्यार हुआ इकरार हुआ'मधली काळी छत्री, हे सगळं स्टुडिओच्या आवारात होतं.
मधू जैन 'कपूरनामा'मध्ये लिहितात, "राज कपूर यांच्या चित्रपटांशी संबंधित कपडे आणि सामान अनेक वर्षं आरके स्टुडिओमध्ये ठेवलेलं होतं. आधी नर्गिस यांची ड्रेसिंग रूम जिथे होती, तिथेच हे सर्व साठवून ठेवलं होतं. नर्गिस यांनी आरके स्टुडिओ सोडल्यानंतर ती खोली नवीन नायिकांच्या मेक-अपसाठी वापरली जाऊ लागली. अनेक वर्षांनी मी स्टुडिओत गेले तेव्हा तिथे या जुन्या काळच्या खुणा विखरून पडलेल्या होत्या."
"एका बाजूला आर्ची कॉमिक्सची पुस्तकं होती (ती राज कपूर यांना खूप आवडायची), एक बेनेक्विन, नर्गिस यांनी 'आवारा'मध्ये घातलेला काळा ड्रेस, इतकंच नव्हे तर राजू हे पात्र जग्गा डाकूचा खून ज्या चाकूने करतो तो चाकूसुद्धा तिथे होता."
पण आता या खुणा लुप्त झालेल्या आहेत. 2017 सालच्या आगीत आर. के. स्टुडिओची इमारतच नव्हे, तर हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील एक अख्खं पर्व संपून गेलं.
आर. के. स्टुडिओच्या आसपास असणारे दुकानदार, फेरीवाले, इतर संस्थांमध्ये काम करणारे लोक यांच्याकडे या आवाराच्या काही आठवणी आहेत. शेजारीच असणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधील लोक असोत अथवा स्टुडिओबाहेर खाद्यपदार्थ विकणारे नि पानटपरी चालवणारे लोक असोत, सर्वांकडे अशा आठवणींचा साठा आहे.
2018 साली हा स्टुडिओ विकण्यात आल्याची बातमी आली, तेव्हा ऋषी कपूर म्हणाले होते की, त्यांच्या कुटुंबाने अतिशय जड अंतःकरणाने हा निर्णय घेतला आहे.
कपूर कुटुंबियांनी आरके स्टुडिओच्या सर्व चित्रपटांच्या निगेटिव्ह भारतीय राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागाराकडे सुपूर्द केल्या आहेत. 1948 साली प्रदर्शित झालेल्या 'आग'पासून 1999 साली प्रदर्शित झालेल्या 'आ अब लौट चले'पर्यंतच्या सर्व चित्रपटांचा यात समावेश आहे.
राज कपूर यांच्या निधनानंतर 'आरके फिल्म्स' आणि 'आरके स्टुडिओ' यांना आपले स्थान का टिकवता आले नाही, असा प्रश्न चित्रपटप्रेमी अनेकदा विचारतात.
राज कपूर यांचं 1988 साली निधन झालं, त्यानंतर त्यांच्या दिग्दर्शनाखाली सुरू झालेल्या 'हिना' या चित्रपटाचं उरलेलं चित्रीकरण 1991 साली रणधीर कपूर यांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आलं.
राजीव कपूर यांनी 1996 साली ऋषी कपूर व माधुरी दीक्षित अभिनित 'प्रेमग्रंथ' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. त्यानंतर 1999 साली ऋषी कपूर यांनी ऐश्वर्या राय व अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'आ अब लौट चले' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. हाच 'आरके स्टुडिओ'चा अखेरचा चित्रपट होता. परंतु, या नंतरच्या चित्रपटांमधील कोणत्याच चित्रपटाला तिकीटखिडकीवर फारसं यश मिळालं नाही.
'खुल्लम खुल्ला' या आत्मचरित्राच्या प्रकाशनकार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत ऋषी कपूर म्हणाले होते, "मी अभिनयात व्यग्र होतो. बहुधा प्रेक्षकांशी असलेला दुवा आम्ही हरवून बसलो होतो. चित्रपट उद्योगही बदलला. नवीन नायक आले होते. विचार बदलत होते. मी खोटी कारणं देणार नाही. कदाचित मी नवीन लोकांना कंपनीत घ्यायला हवं होतं. मला चित्रपटांचं दिग्दर्शन करायचं नव्हतं, पण मी त्यासाठी चांगल्या लोकांना सोबत घेऊ शकलो असतो."
नवीन शतकातील पिढीचं 'आरके स्टुडिओ'शी नातं जुळलं नाही. काही दूरचित्रवाणी मालिकांचं चित्रीकरण तिथे होत असे. इम्तियाज अली यांच्या 'जब हॅरी मेट सेजल' या चित्रपटातील एका दृश्याचं चित्रीकरण तिथे झालं होतं.
पण आज रणबीर कपूरच्या निमित्ताने या स्टुडिओशी निगडित काही आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
आरके स्टुडिओ सक्रिय होता तेव्हा तिथे चित्रपट, तारेतारखा, त्यांचे हास्यविनोद, त्यांचं सामान, या सगळ्याने हे आवार गजबजलेलं असायचं.
या स्टुडिओच्या भिंती जणू काही बोलायच्या, तिथली छायाचित्रं वेगवेगळ्या कथा सांगायची, तिथल्या प्रत्येक वस्तूशी निगडीत काही ना काही कहाणी होती. 'बरसात'मध्ये राज कपूर यांच्या हातात दिसणारं व्हायोलिन, 'जिस देश मे गंगा बहती है'मध्ये राज कपूर वाजवतात ती डफली, 'संगम'मध्ये राजेंद्र कुमार यांनी वैजयंती माला यांना लिहिलेलं निनावी प्रेमपत्र, एम. एफ. हुसैन यांनी 'हिना' चित्रपटासाठी रंगवून दिलेली श्रेयनामावली, 'श्री 420' मधील राज कपूर यांची टोपी, 'मेरा नाम जोकर'मधील जोकर... अशा एक ना अनेक गोष्टी आणि त्याच्याशी निगडीत कहाण्या...
या जोकरचा विग पडला होता, खुर्चीवर बसून बसून हा जोकर एका बाजूला कलंडला होता, तरीसुद्धा अखेरपर्यंत तो 'आरके स्टुडिओ'च्या इमारतीत बसून सर्व काही पाहत होता. कदाचित आगीत भस्मसात होताना तो जोकरही म्हणाला असेल- 'द शो मस्ट गो ऑन'.
'आरके स्टुडिओ'मध्ये चित्रीत झालेलं 'प्रेम रोग' या चित्रपटातलं एक गाणं या निमित्ताने आठवतं- ये गलियाँ ये चौबारा, यहाँ आना न दोबारा, की हम तो भए परदेस की तेरा यहाँ कोई नहीं.
आता या स्टुडिओचं आवार लक्झरी अपार्टमेन्टमध्ये रूपांतरित झालेलं आहे, पण राज कपूर यांचा नातू रणबीर कपूर याच्या लग्नानिमित्ताने 'आरके स्टुडिओ'च्या या खुणांच्या आठवणी जागवण्याची संधी मिळाली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)