रणबीर कपूर-आलिया भट्टच्या लग्नाची चर्चा 'या' कारणांमुळे रंगलीये?

बॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्रा आलिया भट यांच्या लग्नाच्या चर्चेला सध्या उधाण आलंय. हे लग्न या एप्रिलमध्येच होणार अशी चर्चा असल्याने सध्याच्या उन्हाळ्यातला हॉट टॉपिक म्हणूनच याकडे पाहिलं जातंय.

एव्हाना हे कपल मुंबईतल्या कपूर कुटुंबीयांच्या आर के हाऊसमध्ये सप्तपदी घेणार, त्यांच्या लग्नाला 450 पाहुणे असतील, फॅशन झिझायनर बिना कन्नन त्यांचे लग्नाचे पोषाख तयार करणार वगैरे वगैरेच्या बातम्या माध्यमांनी प्रसिद्ध करून झाल्या आहेत.

सोशल मीडियावर या जोडप्याच्या चाहत्या वर्गाने सुद्धा त्यांचं लग्न या महिन्यातच होणार या थाटात चर्चाही सुरू केलीय. मात्र या सगळ्या चर्चेला आधार आहे तो म्हणजे सूत्रांनी दिलेली माहिती. त्यामुळे निश्चितच या जोडप्याचं लग्न होणार याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

पण, तरी सुद्धा या लग्नाची चर्चा का होतेय? हा प्रश्न आणि त्यामागची उत्सुकता कायम आहे. पण रणबीर - आलियाच्या लग्नाची चर्चा आता पुन्हा नेमकी का सुरू झालीये?

लग्न करणार, पण...

नुकतंच NDTV ला दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरला लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानं त्याची उत्तरंही दिली.

मात्र जेव्हा त्याला लग्नाच्या तारखेबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला, 'मला वेडा कुत्रा चावलेला नाहीये जे मी लग्नाची तारीख सर्वांना आत्ता सांगू. पण मी आणि आलिया लवकरच लग्न करणार आहोत.'

मात्र लवकरच म्हणजे नेमकं कधी याचा खुलासा मात्र त्यानं अद्याप केलेला नाही.

वर्षाचा शेवट दणक्यात...

आलिया भट्टने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान तिच्या बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी एका प्रश्नावर बोलताना आलिया लाजून म्हणाली, "आता सांगण्यासारखे फार काही नाही, पण मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकते की, या वर्षाचा शेवट दणक्यात होईल."

आलिया भट्टने नुकत्याच केलेल्या या वक्तव्याचा संबंध तिच्या आणि रणबीर कपूरच्या लग्नाशी जोडला जात आहे.

फॅशन डिझायनरची सूचक पोस्ट

प्रसिद्ध साडी डिझायनर बिना कन्ननने आठवडाभरापूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघेही दिसत आहेत.

फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये, रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत असे लिहिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच या जोडप्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

'बहु कब आ रही है?'

रणबीर कपूरची आई आणि अभिनेत्री नीतू सिंग यांचा एक व्हीडिओ viralbhayani या इन्स्टा हँडलने टाकलाय.

यात नीतू सिंग यांना माध्यमांनी विचारलं की, सून कधी घरी आणणार? त्यावर नीतू सिंग यांनी हसत सूचकरित्या आभाळाकडे हात केले. मात्र, या प्रश्नाचं उत्तर टाळलं नाही किंवा धड 'हो' असं उत्तरही दिलेलं नाही. हा पण व्हीडिओ खूप व्हायरल झालाय.

पण, रणबीर, आलिया आणि नितू सिंग यांची वरची उत्तरं पाहता त्यांनी लग्न कधी, कुठे आणि केव्हा होणार याची उत्तरं दिली नसली तर लग्न लवकरच होणार या प्रश्नाला होकारार्थी उत्तर दिलंय.

आता हे लग्न माध्यमांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या एप्रिलमध्ये होणार की ते एप्रिल फूल ठरणार हे पाहावं लागेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)