You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार : शाहू, फुले, आंबेडकरांचा उल्लेख शिवछत्रपतींच्या भूमिकेचा उल्लेख करण्यासारखंच
"या राज्यात शिवछत्रपतींचं चरित्र फुलेंनी लिहिलं. शाहू, फुले आंबेडकरांना शिवाजी महाराजांबद्दल आस्था आहे. या तिघांचा उल्लेख करणं हा शिवछत्रपतींच्या भूमिकेचा उल्लेख कऱण्यासारखं आहे," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (12 एप्रिल) ठाण्यात सभा घेतली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं होतं, की शरद पवार हे शाहू, फुले, आंबेडकरांबद्दल बोलतात. पण शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत.
राज ठाकरे यांनी केलेल्या या आरोपांवर शरद पवार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
राज ठाकरे वर्ष सहा महिन्यात एखादी सभा घेतात ते फार गांभीर्याने घेण्यासारखं नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
"त्यांच्या पक्षाबद्दल काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा पक्ष संपवणारा पक्ष आहे याची नोंद मतदारांनी घेतली आहे. म्हणून त्यांचा एकही आमदार नाही. त्यांची सभा मोठी होते. त्यांच्या सभेने करमणूक होते," असं शरद पवारांनी म्हटलं.
'शिवछत्रपतींचं चरित्र फुलेंनी लिहिलं'
"शिवाजी महाराजाचं नाव घेत नाही असं ते म्हणाले. मी गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावतीत होतो. शिवाजी महाराजांचं योगदान या विषयावर माझं 25 मिनिटं भाषण होतं. वृत्तपत्र मला वाचायची सवय आहे. त्यासाठी लवकर उठावं लागतं," असं शरद पवार यांनी म्हटलं.
शरद पवार यांनी पुढं म्हटलं, "या राज्यात शिवछत्रपतींचं चरित्र फुलेंनी लिहिलं. शाहू, फुले, आंबेडकरांना शिवाजी महाराजांबद्दल आस्था आहे. या तिघांचा उल्लेख करणं हा शिवछत्रपतींच्या भूमिकेचा उल्लेख कऱण्यासारखं आहे. "
बाबासाहेब पुरंदरे यांना असलेल्या विरोधाबद्दलही ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी विधान केलं होतं.
त्याबद्दल बोलताना शरद पवारांनी म्हटलं, की पुरंदरेंनी शिवछत्रपतींचा उल्लेख करताना दादाजी कोंडदेवांनी शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व घडवलं याचा मला विरोध होता. या व्यक्तिमत्त्वाचं मोठेपणा पोहोचण्यासाठी राजमाता जिजामातेचं योगदान होतंजेम्स लेनने त्याच्या पुस्तकात काही उल्लेख केले होते. ही माहिती मी पुरंदरेंकडून घेतली आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. याबद्दल पुरंदरेंनी कधीही खुलासा केला नाही. त्यामुळे मला त्यांच्यावर टीका केल्याचं काहीही वाटत नाही.
सोनिया गांधींबद्दलची भूमिका अचानक बदलली नाही
सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या भूमिकेवरून काँग्रेसला विरोध करणारे शरद पवार नंतर त्यांच्यासोबतच गेले, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली होती.
"सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं की याबद्दल माझं मत स्पष्ट होतं. मात्र त्यांनीच पंतप्रधान होण्यास नकार दिला. त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं. त्यामुळे आमची भूमिका बदलली. आम्ही एकत्र आलो. आजही आहोत. त्यामुळे ही भूमिका अचानक बदलली नाही," असं शरद पवार यांनी म्हटलं.
मी माझ्या धर्माचं प्रदर्शन करत नाही
शरद पवार हे नास्तिक आहेत. ते कोणत्या मंदिरात जातात मला माहित नाही, असं राज ठाकरेंनी ठाण्यातल्या सभेत म्हटलं होतं.
शरद पवारांनी या टीकेला उत्तर देताना म्हटलं, "माझा धर्म आणिे देव यांच्याबद्दल प्रदर्शन करत नाही. माझ्यासमोर प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. प्रबोधनकांरांनी देवधर्माचा बाजार मांडण्यांवर टीका केली आहे."
प्रबोधनकारांचं लिखाण आम्ही वाचतो पण सगळेच नाही. त्यामुळे अधिक बोलायचं नाही, असा टोमणाही त्यांनी मारला.
माझ्या प्रचाराचा नारळ मी कोणत्या मंदिरात फोडतो, हे बारामतीत सगळ्यांना माहितीये, असंही पवारांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)