You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुष्पा मुंजियालः राहुल गांधींना संपत्तीचा वारस करणाऱ्या पुष्पा मुंजियाल कोण आहेत.
- Author, राजेश डोबरियाल
- Role, डेहराडूनहून, बीबीसी हिंदीसाठी
डेहराडूनच्या डालनवाला कॉलनीमधल्या वेल्हम गर्ल्स शाळेशेजारच्या प्रेमधाम आश्रमात मंगळवार सकाळी गजबज होती. इथे राहणाऱ्या 79 वर्षांच्या पुष्पा मुंजियाल यांना भेटायला मीडियाची गर्दी झाली होती.
पुष्पा मुंजियाल यांना डोळ्यांनी दिसत नसलं तरी सध्या त्या अनेकांच्या नजेरत भरल्या आहेत. कारण त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना त्यांच्या सगळ्या संपत्तीचं वारस केलंय.
ही संपत्ती लाखोंची असून यामध्ये 10 तोळे सोनंही असल्याचं सांगितलं जातंय. याशिवाय यात विविध बँकांमधल्या 20 लाखांच्या 17 ठेवी आहेत.
पुष्पा यांनी राहुल गांधी यांना त्यांच्या या सगळ्या संपत्तीचं वारस जाहीर केलंय.
राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला निवडणुकीमध्ये सपशेल पराभवाला सामोरं जावं लागलं असताना पुष्पा मुंजियाल यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकजण चकित झाले आहेत.
काँग्रेस नेत्यांना सोपवलं मृत्यूपत्र
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांच्याकडे पुष्पा मुंजियाल यांनी त्यांचं मृत्यूपत्र सोपवलं. 9 मार्च 2022ला त्यांनी हे मृत्यूपत्र तयार केलंय.
गंमतीची गोष्ट म्हणजे ही गोष्ट आता प्रकाशझोतात आली असली तरी गेल्या दहा वर्षांमध्ये पुष्पा यांनी केलेल्या प्रत्येक गुंतवणुकीसाठी त्यांनी राहुल गांधी यांचंच नाव नॉमिनी - वारसदार म्हणून दिलं होतं.
प्रेमधाम वृद्धाश्रमात येणाऱ्या योग शिक्षिका सीमा जोहर यांच्या मार्फत पुष्पा यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष लालचंद शर्मा यांच्याशी संपर्क साधला. शर्मांनी त्यांची गाठ काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांच्याशी घालून दिली.
'पुष्पा मुन्जियाल या राहुल गांधींच्या विचारांनी प्रभावित असून या कुटुंबाने देशाचं ऐक्य आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली असल्याने त्यांनी राहुल गांधींना वारस म्हणून निवडल्याचं' शर्मा सांगतात.
बीबीसीशी बोलताना पुष्पा म्हणाल्या, "राहुल गांधी गरिबांबद्दल खूप विचार करतात म्हणून त्यांची निवड केली. त्यांच्या (राहुल गांधींच्या) हातात असतं, तर जादूची कांडी फिरवत सगळ्या गरीबांना त्यांनी श्रीमंत केलं असतं."
राहुल गांधीच का?
राहुल गांधींच्या चांगुलपणाविषयी आपण टीव्हीवर ऐकल्याचं पुष्पा सांगतात. पण याविषयी त्यांना फार बोलायचं नव्हतं.
पुष्पा यांनी त्यांची संपत्ती दान करण्याची ही काही पहिली वेळ नाही. 1999मध्ये पुष्पा शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या तेव्हा त्यांनी बचतीतून साठवलेले 25 लाख रुपये डून हॉस्पिटलला दान केले होते. पण आता त्या या हॉस्पिटलवर खुश नाहीत.
त्या सांगतात, "दरवर्षी यातले किती पैसे कुठे खर्च केले जातात याविषयी मला माहिती द्यावी अशी अट घालूनही हॉस्पिटलने त्या पैशांचं काय केलं हे कधीच सांगितलं नाही."
याच कारणामुळे आपण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान मदत निधीला पैसे न देता राहुल गांधींच्या नावे संपत्ती केल्याचं पुष्पा सांगतात.
सोबती काय सांगतात?
पुष्पा मुंजियाल यांच्या नावाची मीडियात जितकी चर्चा आहे तितकीच शांतता प्रेमधाम आश्रमात आहे. आश्रमात राहणाऱ्या इतर महिलांपैकी पुष्पा यांच्याबद्दल बोलण्यास कोणीच तयार नाही. त्या बहुतेकवेळ त्यांच्या खोलीतच असतात आणि फारशा कुणाशी बोलत नसल्याचं या महिला सांगतात.
इथल्या लोकांमध्ये पुष्पा फारशा लोकप्रिय नसल्याचं एका ज्येष्ठ महिलेने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितलं.
कर्मचाऱ्यांच्या मते 'पुष्पा यांचे नातेवाईक त्याच शहरात राहतात पण त्यांनी कधीही कोणालाही मदत केली नसून त्या स्वभावाने अतिशय कंजूष आहेत.'
'फ्रान्सिस्कन सिस्टर्स ऑफ अवर लेडी ऑफ ग्रेस' ही ख्रिश्चन धर्मादाय संस्था प्रेमधाम आश्रम चालवते.
1990 पासून हा आश्रम अस्तित्त्वात असून पुष्पा या आश्रमाच्या सर्वात जुन्या सदस्य आहेत. गेली 23 वर्षं त्या या आश्रमात राहतात.
पुष्पा यांना खुश ठेवणं सोपं नसल्याचं लोक सांगतात. इथल्या जेवणाबद्दल पुष्पा यांनी डेहराडूनच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पूर्वी तक्रार केल्याचं वृद्धाश्रमातल्या महिलांशी बोलताना समजलं. इथलं जेवण घेऊन त्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या. जेवणात आणि पाण्यात माती मिसळण्यात येत असल्याचं त्यांच म्हणणं होतं.
पण तेव्हा झालेल्या तपासात अशी कोणतीही गोष्ट आढळली नव्हती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)