You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार : 'शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न सुरू'
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न सुरू - शरद पवार
देशातील विविध प्रकारच्या शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष मुलांच्या मनात विष पेरत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
राजधानी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित अल्पसंख्याक संमेलनात ते बोलत होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, "देशात काय परिस्थिती आहे हे सर्वांना दिसत आहे. देशात सांप्रदायिक शक्तीचा जोर वाढत आहे. या सर्व शक्तींच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे. काश्मीर फाईल या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रपोगेंडा उभा केला जात आहे. या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती."
मात्र ज्या लोकांचा हातात सत्ता तेच याचा प्रचार करीत आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता शरद पवार यांनी केली.
जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हा संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा असा प्रयत्न केला जात आहे. भाजप देशातील अभ्यासक्रम बदलवून लहान मुलाच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं पवार म्हणाले. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.
2. कामावर रुजू व्हा, नाहीतर बडतर्फ व्हाल, ठाकरे सरकारचा इशारा
एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या संपकरी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने अखेरचा इशारा दिला आहे. 1 एप्रिल रोजी कामावर रुजू व्हा, अन्यथा कायदेशीर कारवाई करून बडतर्फ करण्यात येईल, असं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते मुंबई येथे बोलत होते. कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही तर 11 हजार नवे कंत्राटी एसटी चालक आणि कंडक्टर यांच्या भरतीचं टेंडर काढण्यात येणार असल्याचंही परब यांनी यावेळी सांगितलं.
कर्मचाऱ्यांना आतापर्यंत 7 वेळा इशारा देण्यात आला. पण सरकार कारवाई करत नाही, असा त्यांचा समज झाला आहे. त्यामुळे उद्यापासून (1 एप्रिल) कामावर न परतणाऱ्या कर्मचाऱ्याला कामाची गरज नाही, असं आमचं मत बनलं आहे. कारवाई काही दिवस थांबली होती. पण उद्यापासून ही कारवाई पुन्हा सुरू होईल, असं परब यांनी म्हटलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
3. 'जुमलोंसे भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान'
पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या आठ दिवसांत सातवेळा वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्ली येथे पेट्रोलच्या दराने 100 रुपये प्रतिलीटरचा आकडा ओलांडला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला.
'प्रश्न न पूंछो फकीर से, कॅमेरापर बाँटे ज्ञान,
जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान,'
अशी चारोळी राहुल गांधी यांनी ट्वीट केली.
म्हणजे, 'फकीरा'ला कोणताही प्रश्न विचारू नका. तो फक्त कॅमेऱ्यावर ज्ञान देतो. 'जुमल्यां'नी भरलेली झोळी घेऊन तो भारताला लुटतो, असा याचा आशय आहे.
आपल्या या ट्वीटमध्ये राहुल गांधीं अफगाणिस्तान ते नेपाळ या देशांमधील पेट्रोल दरसुद्धा दिला आहे, हे विशेष. ही बातमी लोकमतने दिली.
4. अनिल देशमुख, सचिन वाझे आता CBI च्या ताब्यात
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा ताबा आता CBI कडे देण्यात आला आहे.
ED च्या तपासानंतर आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांची पुढील चौकशी CBI कडून केली जाणार आहे.
या प्रकरणात अनिल देशमुख, सचिन वाझे , संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांचा ताबा मिळण्यासाठी CBI ने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज कोर्टानं स्वीकारल्यामुळे चारही आरोपी आता CBI च्या ताब्यात जातील. ही बातमी एबीपी माझाने दिली.
5. इलेक्ट्रिक वाहनांची किंमत दोन वर्षांत पेट्रोल वाहनांइतकी
देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढतअसून दोन वर्षांत सर्व इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती पेट्रोल वाहनांइतक्या होतील, असा दावा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
गुरुवारी संसदेत बोलताना नितीन गरडकरी यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे संसदेच्या आवारात चार्जिंग स्टेशनची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
लोकांना भविष्यात पर्यायी इंधनावर चालणाऱ्या गाड्यांची गरज भासणार असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)