महिला, बाळंतपण : दोन डोकी, तीन हातांची बाळं का जन्मतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शालिनी कुमारी,
- Role, बीबीसी प्रतिनिधी.
मध्य प्रदेशातील रतलाम येथे एका महिलेने नुकतेच एका आगळ्यावेगळ्या बालकाला जन्म दिला. या बाळाला दोन डोकी तर तीन हात आहेत.
ही एक प्रकारची बॉडी डिफॉर्मिटी (व्यंग) आहे. पण हे व्यंग का निर्माण होतं? अशा प्रकारच्या व्यंगांवर उपचार शक्य आहे का?
रतलामच्या या बाळाबद्दल विचार करायचा झाल्यास डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या स्थितीला पेरापेगस डायसिफलस असं म्हटलं जातं.
हा एक सयामी जुळेपणाचा एक दुर्मिळ प्रकार आहे. यासोबतच या व्यंगाचे आणखी काही प्रकारही आहेत.
इंदूरच्या MY हॉस्पिटलचे डॉ. बृजेश कुमार लाहोटी सांगतात, शरीरात निर्माण होणाऱ्या या व्यंगांना मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असंही संबोधलं जाऊ शकतं.
बॉडी डिफॉर्मिटी म्हणजे काय?
डॉ. बृजेश कुमार लाहोटी हे या रुग्णालयात बालचिकित्सा सर्जरी विभागाडे प्रमुख आहेत. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "बाळंतपणाच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये भ्रूणाचा विकास होत असताना अशा प्रकारचा दोष निर्माण होण्याची शक्यता असते. हे व्यंग शरीरातील मेंदू, हृदय, यकृत, किडनी, हात किंवा पाय अशा कोणत्याही अवयवामध्ये निर्माण होऊ शकतं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
डॉ. परविंदर एस. नारंग मॅक्स हॉस्पिटलमध्ये बालचिकित्सक आहेत. त्यांनी हे व्यंग काही उदाहरणं देऊन समजावलं.
ते म्हणतात, "कधी-कधी काही लोकांच्या हातांना पाचऐवजी सहा बोटे असतात. काहींच्या चेहऱ्यावर काही डाग असू शकतात. तसंच काही व्यंग अत्यंत दुर्मिळ असतात. 3 ते 5 हजारपैकी एक प्रकरण असं येऊ शकतं.
डॉ. बृजेश रतलामच्या बाळाबाबत बोलताना सांगतात, "बाळांमध्ये व्यंग आढळून येणं हे नैसर्गिक आहे. भारतात 2 ते 3 टक्के बाळांमध्ये जन्मजात व्यंग आढळून येतं. यांपैकी 5 ते 6 टक्के व्यंग जीवघेण्या स्वरुपाचे असू शकतात. काही व्यंग असेही असू शकतात, जे जन्मावेळी तर दिसत नाहीत. पण पुढे भविष्यात ते समोर येऊ शकतात."
व्यंग जितकं गंभीर ते तितक्या उशिराने कळतं, असंही त्यांनी सांगितलं.
शरिरात व्यंग का निर्माण होतं?
डॉ. बृजेश सांगतात, "कधी कधी लोकांमध्ये व्यंगांबाबत अनेक गैरसमज असतात. त्यांना दूर करण्यासाठी शिक्षण हाच एक मार्ग आहे. जन्मजात व्यंगांमध्ये बहुतांश प्रकरणात कारण आनुवंशिकच असतं. आपल्या गुणसूत्रांमध्ये होणाऱ्या बदलांची यात खूप मोठी भूमिका असते."

फोटो स्रोत, NIKHILESH PRATAP
ते पुढे सांगतात, काही बाळांमध्ये अन्ननलिका आणि श्वसननलिका जुळलेली असते. तर काही बाळांमध्ये गुदद्वारच तयार झालेलं नसतं.
व्यंग कसे ओळखावेत?
डॉ. बृजेश सांगतात, "गर्भावस्थेच्या सुरुवातीला 16 ते 20 आठवड्यातच सोनोग्राफीच्या मदतीने व्यंगांबाबत कळू शकतं. सोनाग्राफीत एखादं व्यंग आढळून आल्यास आम्ही त्याची तपासणी करतो. बाळ जन्मल्यानंतर जगू शकेल की नाही, याचा आम्ही अभ्यास करतो."

फोटो स्रोत, Getty Images
पण सगळ्याच ठिकाणी याची सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे दुर्गम भागातही सोनोग्राफी किंवा चाचणीचे उपकरण उपलब्ध झाल्यास व्यंगांचं प्रमाण कमी होऊ शकतं, असं ते म्हणाले.
बाळांमध्ये हृदयाशी संबंधित व्यंग सर्वाधिक आढळून येतं. कधी पायांमध्ये क्लबफूट (पाय वाकडे असणं) होतं. याशिवाय आपल्या देशात भ्रूणांमध्ये सर्वाधिक आढळून येणारं व्यंग म्हणजे पाठीच्या मणक्याचा विकास न होणं.
उपचार काय?
डॉ. बृजेश सांगतात, "जन्मजात व्यंगांमुळे प्रत्येक बाळाचा मृत्यू होईल, अशी शक्यता नाही. काही व्यंगांवर उपचार शक्य आहेत. काही प्रकरणांमध्ये आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागते. 90 टक्के व्यंगांवर उपचार केले जाऊ शकतात."

फोटो स्रोत, Getty Images
मृत्यूंच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास नवजात बालकांमध्ये 7 टक्के मृत्यू अशा प्रकारच्या व्यंगांमुळे होतात.
डॉ. परविंदर म्हणतात, प्रत्येक व्यंगाच्या उपचारांचा खर्च वेगळा असतो. उदाहरणार्थ, थायरॉईडची कमतरता झाल्यास त्याचा उपचार स्वस्तात होऊ शकतो. पण हृदयाची एखादी शस्त्रक्रिया करायची म्हटली, तर त्याचा खर्च वाढू शकतो."
फॉलिक असिडवर ठेवा लक्ष
असे प्रकार टाळण्यासाठी महिलांनी गरोदरपणात जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. परविंदर म्हणतात, "आपल्या शरिरात कोणत्या गोष्टींची कमतरता आहे, हे महिलांना माहीत असणं आवश्यक आहे. फॉलिक असिड तसंच व्हिटामीन योग्य प्रमाणात घेणं यावेळी महत्त्वाचं असतं. यामुळे हृदय तसंच पाठीचा मणका यांच्यात व्यंग निर्माण होण्याची शक्यता कमी होते."
डॉ. बृजेश म्हणतात, महिलांमध्ये काही प्रमाणात फॉलिक असिडची कमतरता निर्माण होते. ती औषधोपचाराने ठिक केली जाऊ शकते. ज्याप्रकारे मीठात आयोडीन मिसळून त्याची कमतरता दूर केली जाऊ शकते, तसंच फॉलिक असिडचं सप्लीमेंट सुरू करता येतं."
भारतात जन्मजात व्यंगासंदर्भात वीमा संरक्षण नाही
डॉ. बृजेश म्हणतात, भारतात जन्मजात व्यंगांच्या संदर्भात वीमा संरक्षण उपलब्ध नाही, ही खूप मोठी समस्या आहे. विदेशात वीमा संरक्षण सगळ्याच गोष्टींवर लागू होतं. त्यामुळे अशावेळी कुटुंबावर अतिरिक्त आर्थिक ताण पडत नाही. मात्र आपल्या इथे अशा प्रकारचे व्यंग आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबातच जास्त प्रमाणात आढळून येतात.
याचं कारण म्हणजे वेळच्या वेळी तपासणी न करणं हे असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ. बृजेश यांच्या मते, सोनाग्राफी वेळच्या वेळी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच बाळंतपणापूर्वीच वीमा काढल्यास काही प्रमाणात आपला खर्च वाचू शकतो."

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








