पुणे बालेवाडी अपहरण: मुलं बेपत्ता होणार नाहीत, म्हणून पालकांनी कराव्या अशा 5 गोष्टी

प्रतीकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो
    • Author, गुलशनकुमार वनकर
    • Role, बीबीसी मराठी

पुण्यातला चार वर्षांचा डुग्गू सुखरूप त्याच्या घरी परतलाय. आठ दिवस सोशल मीडियावर त्याचे आणि त्याचं अपहरण होतानाचे फोटो फिरत होते, पण कुठेही सुगावा लागत नव्हता.

अपहरणाची ही काही पहिली घटना नाहीय, त्यामुळे अशा परिस्थितीला सामोरं जावं लागू नये यासाठी आपण काळजी घेणं, महत्त्वाचं आहे.

राष्ट्रीय गुन्हेगारी रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB)च्या आकडेवारीनुसार 2020मध्ये 18 वर्षांखालील मुलामुलींच्या अपहरणाच्या सर्वांत जास्त घटना महाराष्ट्रात नोंदवल्या गेल्या होत्या. त्याखालोखाल मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो.

त्यामुळे मुलं एकूणच बेपत्ता का होतात? त्यांचं अपहरण कसं टाळता येईल? त्यांना काय शिकवावे आणि कसं समजवावे, याबद्दल आम्ही 'विधायक भारती' संस्थेचे बालसंरक्षक आणि अभ्यासक संतोष शिंदे यांच्याशी चर्चा केली.

बालकांना कसं जपावं, यासाठी त्यांनी हे पाच मुद्दे सांगितले...

1.मुलांना संपर्क करायला शिकवा - मूल जर 5 वर्षांपर्यंतचं असेल तर त्यांच्याजवळ नेहमी तुमचा फोन नंबर असेल याची काळजी घ्या. त्यांच्या शाळेच्या दप्तरमध्ये किंवा अगदी खेळायला जाताना त्यांच्या खिशात घरच्या व्यक्तीचा नंबर असलेली एक चिट्ठी ठेवा. मुलं जर त्याहून मोठी असतील तर या गोष्टी त्यांना पाठ करायला सांगा.

2.परिसराची ओळख - आपलं घर कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं, कुठली चौकी जवळची आहे, याची माहिती पालक म्हणून आधीच घेऊन ठेवा. मुलांना घराचा पत्ता आणि आपण कुठे राहतो, याची माहिती लक्षात ठेवायला शिकवा. ते हरवलेत तर एखाद्या व्यक्तीला काय पत्ता सांगायचा, घरी कसं पोहोचायचं, हे कसं सांगणार, ते शिकवा.

3.पोलीस - अनेकदा आपण पोलिसांचा धाक दाखवून हट्टी मुलांना शांत करायचा प्रयत्न करत असतो. उलट, मुलांना हे शिकवा की पोलीस त्यांचे मित्र आहेत, त्यांच्या भल्यासाठी आहेत.

जर मुलं कुठे हरवलीत तर ती न घाबरता पोलिसांकडे जातील, यासाठी त्यांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करा. त्यांना सांगा की कुठल्याही परिस्थितीत पोलिसांना मदत मागायला घाबरू नका.

4.1098 - जर कुठे पोलीस दिसत नसतील तर धोक्याच्या परिस्थिती कुणाच्याही फोनवरून 1098 (दहा-नऊ-आठ) ही चाइल्ड हेल्पलाईन डायल करायला शिकवा.

5.मुलांशी संवाद साधा - अनेकदा पालक म्हणून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधायला विसरतो. त्यांच्याशी बोला, त्यांच्या मनातल्या, त्यांच्या विश्वातल्या गोष्टी जाणून घ्या. त्यांना कशाची किंवा कुणापासून भीती वाटते का, याची माहिती मिळवा. अनेकदा मुलं स्वतःहून घर सोडून जाऊ शकतात.

त्यामुळे पालकांशिवाय घरातली किंवा जवळच्या संवेदनशील माणसांशी एक फळी मुलांपुढे तयार करा, ज्यांच्याजवळ ते त्यांचं मन मोकळं करू शकतील. जर एखादी गोष्ट ते आई किंवा बाबाला नाही सांगू शकत, तर या व्यक्तीला ते निःसंकोच सांगतील.

याशिवाय आणखी एक सल्ला दिला जातो की मुलांसोबत एक पासवर्ड शेअर करा, जे फक्त तुम्हाला आणि तुमच्या मुलांनाच माहिती असेल.

म्हणजे जर त्यांना शाळेत किंवा ट्युशन क्लासला कुणी अनोळखी व्यक्ती घ्यायला आली आणि तिने सांगितलं की 'तुझ्या आईने / बाबाने मला घ्यायला पाठवलंय', तेव्हा तुमच्या मुलाने त्या व्यक्तीला पासवर्ड विचारावं.

जर ते त्या व्यक्तीला ठाऊक नसेल तर तुमचं मूल त्याच्याबरोबर जाण्यास नकार देऊ शकतं.

डुग्गू

शिंदे आणखी काही मुद्द्यांकडेही लक्ष वेधतात. ते सांगतात की अनेकदा मुलं एखाद्या गोष्टीचा हट्ट करतात, ती वस्तू मिळाली नाही की घर सोडून निघून जातात.

त्यामुळे पालकांनी मुलांना ते मागत असलेली वस्तू सध्याच त्यांना का नाही देऊ शकत, हे शांतपणे समजावून सांगण्याची गरज असते.

अनेकदा पालक मुलांना मोबाईल, लॅपटॉप इत्यादी यंत्र उपलब्ध करून देतात, पण त्यातून संभाव्य धोक्यांची जाणीव, उदाहरणार्थ, ऑनलाईन छळ किंवा दिशाभूल करणारा मजकूर, याची माहितीसुद्धा पालकांनीच देणं गरजेचं आहे.

संतोष शिंदे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतात, "आपली शहरं स्मार्ट होत असताना ती सुरक्षित आणि मुलांसाठी सुलभ (accessible) आहेत का, याचा विचार करायला हवा. उदाहरण म्हणून, फक्त शाळांच्या भिंती छान रंगवून शाळा बालस्नेही होणार नाही. अनेकदा शाळेच्या परिसरातले असे काही भाग असतात जिथे मुलांना जायला भीती वाटते. अशी ठिकाणं शहरांमध्येही असतात, अशा ठिकाणांची पोलिसांनी आणि प्रशासनाने दखल घ्यायला हवी."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)