अॅलोपेशिया: विल स्मिथने ख्रिस रॉकला पत्नीच्या या आजारामुळे मारली थोबाडीत

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

हॉलीवूड स्टार विल स्मिथने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात क्रिस रॉकच्या कानाखाली मारली. याचं कारण होतं, पत्नी जेडा पिंकेट-स्मिथवर मारलेला जोक.

जेडा 'अॅलोपेशिया' आजाराने गेल्याकाही काळापासून ग्रस्त आहे. तज्ज्ञ सांगतात, या आजारात डोक्यावरचे केस गळू लागतात आणि टक्कल पडू लागतं. महिला आणि पुरूष दोघांनाही या आजाराचा सामना करावा लागतो.

या आजाराने ग्रस्त असल्याने जेडाच्या डोक्यावर केस नाहीयेत. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात तिने अॅलोपेशिया आजाराशी कसा लढा दिला. याबाबत आपलं मन मोकळं केलं होतं.

पण, 'अॅलोपेशिया' हा आजार आहे तरी काय? या आजारावर उपचार आहेत का? हा आजार म्हणजे सामान्य केस गळणं आहे का? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

जेडा पिंकेट-स्मिथ काय म्हणाली होती?

2018 मध्ये जेडा पिंकेट-स्मिथने ती 'अॅलोपेशिया' या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती दिली होती.

ती म्हणाली होती, "मला केस गळण्याची समस्या आहे. याची सुरूवात झाली त्यावेळी हे भयंकर होतं." डॉक्टरांनी जेडाला हा त्रास नक्की कशामुळे झाला याचं ठोस कारण सांगितलं नाही. पण हा त्रास बहुदा स्ट्रेसमुळे असावा अशी शक्यता तिला वाटते.

सामान्यत: डोक्यावर स्कार्फ बांधून असणारी जेडा, ऑक्सर पुरस्कार कार्यक्रमात डोक्यावर काहीच न बांधता आली होती.

'अॅलोपेशिया' या आजाराशी तिने कसा लढा दिला याबाबत सांगताना ती पुढे म्हणाली, "आंघोळ करताना केस गळून हातात पडले. मी विचार केला, मला टक्कल पडतंय का? त्या दिवशी मी भीतीने थरथर कापत होते."

केस गळण्याच्या समस्येबाबत बोलणं फार कठीण आहे, असंही जेडा पुढे म्हणाली होती.

अॅलोपेशिया आजार काय आहे?

आपल्यापैकी अनेकांना महिला असो किंवा पुरूष, केस गळण्याचा त्रास असतो. आंघोळ करताना अनेकांचे केस गळतात. स्ट्रेस, प्रसूती, आजार, हॉर्मोनमध्ये झालेला बदल किंवा वैद्यकीय अशा अनेक कारणांमुळे केस गळती होते. काहीवेळा केस गळतीचं एक ठोस कारण सांगता येत नाही.

केस गळतीला वैद्यकीय भाषेत 'अॅलोपेशिया' म्हणतात. त्वचाविकारतज्ज्ञ सांगतात, 'अॅलोपेशिया'चे प्रमुख चार प्रकार आहेत. या सर्व प्रकारात डोक्यावरचे केस गळण्याचं कारण मात्र वेगळं आहे.

1. अॅन्ड्रोजेनिक अॅलोपेशिया

केस गळतीच्या या प्रकाराला हॉर्मोनल अॅलोपेशिया असंही म्हटलं जातं. यामध्ये डोक्यावरचे केस पातळ होतात आणि हळूहळू गळू लागतात. केस गळतीचा परिणाम म्हणजे डोक्यावर टक्कल पडतं. केस गळण्याचा हा आजार 95 टक्के प्रकरणात दिसून येतो.

मुंबईतील त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. रिकी कपूर सांगतात, "या आजारात मोठ्या प्रमाणात केस गळती होत नाही. केस गळण्याचं प्रमाण फार कमी असतं. बरेच वर्षं सतत थोडे-थोडे केस गळत रहातात." ज्यामुळे डोक्यावर टक्कल दिसू लागतं.

पुरूषांमध्ये पुढचे केस कमी झाल्यामुळे हेअरलाईन मागे जाते आणि टक्कल पडतं. डॉ. कपूर पुढे म्हणतात, "हा आजार काही प्रमाणात अनुवांशिक असतो."

पण गेल्याकाही वर्षांत पर्यावरण, स्ट्रेस, लाईफस्टाईल आणि इतर कारणांमुळे 16-18 या वयोगटातील मुलांमध्येही हा आजार दिसून आलाय.

हा आजार झालेल्या महिलांमध्येही हळूहळू केस गळू लागतात. पण, महिलांना पूर्ण टक्कल पडत नाही, तज्ज्ञ माहिती देतात. महिलांमध्ये हा आजार हॉर्मोनमध्ये झालेल्या बदलांमुळे प्रामुख्याने होतो.

2. अॅलोपेशिया एरियाटा

"हा एक ऑटो-इम्युन आजार आहे. या आजारात शरीरातील रोगप्रतिकारक पेशी केसांच्या मुळांवर हल्ला करतात," डॉ. कपूर पुढे सांगतात. यामुळे त्या भागातील केसांची वाढ खुंटते आणि टक्कल पडतं.

या आजारात डोक्यावर काही ठिकाणी पॅचेसमध्ये केस गळती होते. ज्यामुळे त्या भागात गोलाकार आकारात टक्कल पडतं. हा आजार डोकं, मिशी, भुवई आणि शरीरावर केस असलेल्या इतर भागात होऊ शकतो.

या आजाराची पसरण्याची तीव्रता अधिक आहे. भारतात एका अंदाजानुसार जवळपास 10 लाख लोक या आजाराने ग्रस्त आहेत.

त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. सृती नासवा म्हणाल्या, "काही रुग्णांमध्ये पूर्ण केस गळून टक्कल पडतं. याला वैद्यकीय भाषेत अॅलोपेशिया टोटॅलिस असं म्हणतात."

मात्र, शरीराची रोगप्रतिकारशक्ती केसांच्या मुळांवर अचानक हल्ला का करते याचं ठोस उत्तर अजूनही मिळालेलं नाही.

सामान्यत: तिशीच्या आधी हा त्रास दिसून येतो.

त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. किरण गोडसे म्हणाले, या आजारात योग्य डाएट महत्त्वाचं आहे. व्हीटॅमिन, कॅल्शियम, झिंक आणि प्रोटीनचं सेवन केलं पाहिजे. जेणेकरून याचा चांगला फायदा होईल.

3. टिलोजीन इफ्लूबियम

तणाव, शस्त्रक्रिया, इन्फेक्शन, प्रसूती आणि औषधांचं सेवन या गोष्टीमुळे झालेल्या केसगळतीला टिलोजीन इफ्लूबियम असं म्हणतात. कोव्हिड, डेंगू, थायरॉईड यांसारख्या आजारातही मोठ्या प्रमाणात केस गळती होते.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या प्रकारात शरीराला मिळणारा पौष्टीक आहार शरीराकडून महत्त्वाच्या अवयवांकडे पाठवला जातो. जेणेकरून हृदय, फुफ्फुस आणि मेंदू यांसारख्या अवयवांना उर्जा मिळेल. पण, डोक्यावरील केस फारसे महत्त्वाचे नसल्यामुळे केसांच्या मुळांची वाढ होत नाही.

त्यातच शरीराला फार जास्त इजा, तणाव किंवा आघात झाला असेल तर त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी खूप केस गळतात.

4. अॅनजीन इफ्लूबियम

या प्रकारात कॅन्सरच्या किमो आणि रेडिओथेरेपीमुळे आणि औषधांमुळे केसांच्या मुळांवर आघात होतो. त्यामुळे केस तात्काळ गळू लागतात.

5. ट्रॅक्शन अॅलोपेशिया

या आजाराबाबत माहिती देताना डॉ. स्मृती नासवा सांगतात, केस सारखे ओढल्यामुळे किंवा खेचल्यामुळे केस गळण्यास सुरूवात होते. केस घट्ट बांधल्यामुळे (पोनीटेल), ड्रेडलॉक, तसंच गंगावन किंवा व्हिविंगमुळेही केस गळण्याचा त्रास होतो.

केस गळतीमुळे टक्कल पडलं तर कायम राहतं?

केस हा प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपण कसे दिसतो यावरून आपलं समोरच्यावर इंप्रेशन पडतं असं म्हणतात. त्यामुळे पुरूष असो किंवा महिला, प्रत्येकजण केसांची निगा योग्य राखण्यासाठी खूप प्रयत्न करतो.

अॅलोपेशियाग्रस्त रुग्णांचे केस कायम जाऊन टक्कल पडतं असं नाही. काही प्रकारात हा आजार आपोआप बरा होतो. पण, योग्य निदान आणि उपचार महत्त्वाचं आहे.

डॉ. रिंकी कपूर सांगतात, "अॅन्ड्रोजेनिक अॅलोपेशिया हा हळूहळू वाढणारा आजार आहे. यावर योग्य वेळीच उपचार केले नाहीत. तर टक्कल पडणार हे निश्चित."

दुसरीकडे, काही प्रकरणात अॅलोपेशिया एरियाटा पाच-सहा महिन्यात आपोआप बरा होतो. तर काही रुग्णांमध्ये हळूहळू वाढतो असं तज्ज्ञ सांगतात.

यावर तात्काळ उपचार होणं गरजेचं आहे. टिलोजीन इफ्लूबियममध्ये पाच-सहा महिन्यात केस गळती थांबते किंवा कमी होते. पण, अचानक खूप जास्त केस गळल्यामुळे याचा लोकांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होतो.

तर, कॅन्सर किंवा औषधांमुळे झालेली केस गळती काही दिवसानंतर थांबते. 50-60 टक्के केस परत येतात.

डॉ. स्मृती म्हणाल्या, "पौष्टिक अन्नाचं सेवन, व्यायाम, लाईफस्टाईलमधील योग्य बदल यामुळे स्ट्रेस कमी होऊन केसांची वाढ चांगली होण्यासाठी मदत होते."

अॅलोपेशियाचं महिला आणि पुरुषांमधील प्रमाण किती?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पुरुषांमध्ये अॅन्ड्रोजेनिक अॅलोपेशियाचं प्रमाण खूप जास्त आहे. तीन पुरूषांच्या मागे एका पुरूषाला याचा त्रास असतो.

डॉ. रिंकी कपूर पुढे सांगतात, "महिलांमध्येही लठ्ठपणा, जंकफूड, बदललेली लाईफस्टाईल यामुळे केस गळती वाढल्याचं पहायला मिळालं आहे."

केस गळती संसर्गजन्य आजार नाही. पण केस गळल्यामुळे लोकांच्या मानसिकतेवर याचा मोठा आघात होतो. खासकरून महिलांमध्ये केस गळती सुरू झाल्यानंतर चिडचिडेपणा खूप वाढतो.

केस गळतीमुळे लोकांचा आत्मविश्वास खूप कमी होतो. वाशीच्या हिरानंदानी रुग्णालयाचे त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. किरण गोडसे केस गळतीमुळे होणारा स्टिग्मा कशापद्धतीने कमी करता येईल याची माहिती देतात. ते सांगतात,

  • डॉक्टरांकडे जाऊन केस गळतीचं कारण समजून घ्या.
  • योग्य आणि वेळेवर उपचार करण्यावर भर द्या.
  • केस गळतीमुळे मानसिक त्रास होत असेल तर मानसोपचारतज्ज्ञांना भेटा.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)