You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Oscar Awards 2022: विल स्मिथ ख्रिस रॉकला म्हणतात- मी तुझी जाहीर माफी मागतो, मी चुकलो
ऑस्कर सोहळ्यादरम्यान सूत्रसंचालक ख्रिस रॉक याला थोबाडीत मारल्याप्रकरणी अभिनेता विल स्मिथ यांनी रॉक यांची माफी मागितली आहे. स्मिथ यांच्या पत्नीसंदर्भात रॉक यांनी आक्षेपार्ह उद्गार काढले होते.
"माझं वागणं योग्य नव्हतं आणि त्याचं समर्थन होऊ शकत नाही. ख्रिस, मी तुझी जाहीर माफी मागतो. मी शिष्टसंकेतांचा भंग केला. मी चुकलो", असं विल स्मिथ यांनी म्हटलं आहे.
ऑस्कर फिल्म अकादमीने या घटनेसंदर्भात विल स्मिथ यांच्या कृतीचा निषेध केला आहे. याप्रकरणी शहानिशा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार घोषणेवेळी रॉक बोलत होते. त्यावेळी त्यांनी पिंकेट स्मिथ यांच्यासंदर्भात GI Jane2 म्हणजेच केसविरहित डोक्याचा उल्लेख केला. पिंकेट स्मिथ यांना अलोपेसिआ नावाचा आजार आहे. यामध्ये डोक्यावरचे केस जातात. यासंदर्भात पिंकेट स्मिथ यांनी जाहीरपणे या आजाराविषयी सांगितलं आहे.
रॉक बोलत असताना स्मिथ व्यासपीठावर गेले आणि त्यांनी थोबाडीत लगावली. तुझ्या बोलण्यात माझ्या बायकोचा उल्लेख करू नकोस असं स्मिथ सांगत असताना दिसलं. स्मिथ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी बोलताना स्मिथ यांनी माफी मागितली.
"मी संयोजकांची माफी मागतो. नॉमिनेशन मिळालेल्या कलाकारांची माफी मागतो. प्रेमात पडल्यानंतर माणूस अनेक अतर्क्य गोष्टी करतो. माझ्या हातून असंच काहीसं घडतं", असं स्मिथ यांनी सांगितलं.
'कोडा' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. कोडा चित्रपटाच्या चमूला उभं राहून अभिवंदन करण्यात आलं.
'द आईज ऑफ टॅमी फाय' चित्रपटातील भूमिकेसाठी जेसिका चेस्टेन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.
'किंग रिचर्ड' या चित्रपटासाठी अभिनेता विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना स्मिथ भावुक झाला होता. या चित्रपटात त्यांनी सेरेना आणि व्हीनस विल्यम्सच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
बॅड बॉईज, परस्युट ऑफ हॅपीनेस, आय एम लिजंड हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. टीव्ही मालिकांच्या माध्यमातून
वेस्ट साईड स्टोरी चित्रपटातल्या भूमिकेसाठी एरियाना डीबोस यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार पटकावणाऱ्या कृष्णवर्णीय आणि समलैंगिक अशी जाहीर ओळख असलेल्या त्या पहिल्याच महिल्या अभिनेत्री आहेत. 'स्वप्नं प्रत्यक्षात साकारतात हा विश्वास देणारा क्षण आहे,' असं त्यांनी सांगितलं.
द पॉवर ऑफ द डॉग चित्रपटाच्या दिग्दर्शक जेन कँपियन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत दोनदा नॉमिनेशन मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला दिग्दर्शक आहेत. 1967 मध्ये प्रकाशित झालेल्या 'द पॉवर ऑफ द डॉग' या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.
जेम्स बॉँडच्या नो टाईम टू डाय या गाण्यासाठी बिली एलिशला सर्वोत्कृष्ट मूळ गायकाचा पुरस्कार देण्यात आला. प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळालेला पुरस्कार जॅक स्नायडरच्या आर्मी ऑफ द डेड चित्रपटाची निवड झाली.
द समर ऑफ सोल हा सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला. याच श्रेणीत रायटिंग विथ फायर या भारतीय माहितीपटला नामांकन मिळालं होतं.
बेस्ट ओरिजिनल स्कोअरसाठी हंस झिमर यांची निवड झाली आहे. द लाँग गुडबाय या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म हा पुरस्कार मिळाला.
सोहळा कमी वेळाचा असावा यादृष्टीने काही पुरस्कार आधीच देण्यात आले. एमी शुमर, रेजिना हॉल आणि वॉन्डा साइक्स यंदाचा ऑस्कर सोहळ्याचं सूत्रसंचालन करत आहेत.
ट्रॉय कॉस्टर यांना कोडा चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ऐकू न येणाऱ्या मुलाच्या पित्याची भूमिका कॉस्टर यांनी साकारली होती.
ऑस्कर पुरस्कार पटकावणारे कॉस्टर दुसरे मूकबधीर अभिनेते आहेत. याआधी मार्ली मॅटलिन यांनी 1986 मध्ये चिल्ड्रन ऑफ ए लेसर गॉड चित्रपटात सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला होता.
कॉस्टर यांनी सांकेतिक भाषेत भाषण केलं. मूकबधीर समाज, कोडा चित्रपटाशी सर्वजण आणि दिव्यांग मंडळींना मी हा पुरस्कार समर्पित करतो असं कॉस्टर यांनी सांगितलं.
सोहळ्यादरम्यान अनेक कलाकारांनी युक्रेनसाठी पाठिंबा दर्शवला. जेसन मोमोआ यांनी युक्रेनच्या झेंड्याचा रुमाल पोशाखावर परिधान करत पाठिंबा दिला. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांसाठी सोहळ्यात मौन पाळण्यात आलं.
पुरस्कारविजेते
सर्वोत्कृष्ट चित्रपट- कोडा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- जेन कॅंपियन
सर्वोत्कृष्ट अभिनेता- विल स्मिथ
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- जेसिका चेस्टिअन
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- ट्रॉय कॉस्टर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- एरियाना डीबोस
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले- बेलफास्ट
सर्वोत्कृष्ट र्अडॉप्टेड स्क्रीनप्ले- कोडा
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म- इनकान्टो
सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म- ड्राईव्ह माय कार
सर्वोत्कृष्ट माहितीपट- समर ऑफ सोल
सर्वोत्कृष्ट माहितीपट विषय- द क्वीन ऑफ बास्केटबॉल
सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन माहितीपट- द लाँग गुडबाय
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड माहितीपट- द विंडशिल्ड वायपर
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर- ड्यून
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग- नो टाईम टू डाय
सर्वोत्कृष्ट साऊंड- ड्यून
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिसाईन- ड्यून
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- ड्यून
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग- द आईज ऑफ टॅमी फाय
सर्वोत्कृष्ट कॉस्च्यूम डिसाईन- क्रूएला
सर्वोत्कृष्ट संकलन- ड्यून
सर्वोत्कृष्ट व्हिज्यु्ल इफेक्ट- ड्यून
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)