रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांना ईडीनं केली अटक, साई रिसॉर्टप्रकरणी कारवाई

शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) अटक केली आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ही कारवाई केल्याचं कळतंय.

सदानंद कदम हे माजी पर्यावरण मंत्री आणि शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. सदानंद कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात.

या कारवाईनंतर किरीट सोमय्यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "दापोली साई रिसॉर्ट घोटाळ्याप्रकरणी सदानंद कदम यांना अटक (अनिल परब यांचे पार्टनर). अब क्या होगा तेरा अनिल परब"

रत्नागिरीतील खेडमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी जमली होती. या सभेसाठी सदानंद कदम यांनी ताकद लावल्यानंच त्यांच्यावर कारवाई झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

या आरोपांना उत्तर देताना सदानंद कदमांचे पुतणे आणि गुहागरचे आमदार योगेश कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना याबाबत म्हटलं की, "सदानंद कदमांची साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परबांशी जे व्यवहार झाले, त्याबाबत वर्षभरापासून त्यांची चौकशी सुरू होती. त्याला खेडच्या सभेशी जोडणं, हे योग्य नाही. गेल्या 25 वर्षांपासून अनिल परब-सदानंद कदम व्यावहारिक संबंध आहेत."

तर अनिल परब म्हणाले की, "वर्षभरापासून साई रिसॉर्टची चौकशी सुरू आहे. मूळ मुद्दा असा आहे की, रिसॉर्टचं पाणी समुद्रात जातं, म्हणून प्रदूषण महामंडळाच्या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीनं चौकशी सुरू केली होती. या प्रकरणात चौकशीअंती अहवालानुसार, रिसॉर्टमधून समुद्रात पाणी जात नाही.

"आतापर्यंत या प्रकरणात सदानंद कदमांना ईडीच्या ऑफिसला बोलावलं, तेव्हा ते गेले. मलाही बोलावलं गेलं. मीही तीन ते चारवेळा ईडी ऑफिसला जाऊन प्रत्येक गोष्टीची माहिती दिली. सदानंद कदमांनी मान्य केलंय की त्यांचं स्वत:चं ते रिसॉर्ट आहे. त्यांनी त्याचा खर्च दाखवलाय. असं असतानाही त्यांना ईडीचा समन्स होतं. पण कालच सर्जरी झाली असल्यानं ईडी ऑफिसला संबंधित कागदपत्रं पाठवली. डॉक्टरनं 15 दिवस सक्त विश्रांती घेण्याची सूचना असतानाही आज सकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना मुंबईत घेऊन येतायत."

"किरीट सोमय्या हे ईडीचे दलाल नाहीत. असलं तर त्यांनी जाहीर करावं. आम्ही सोमय्यांचे बांधील नाहीत. आम्ही यंत्रणांचे बांधील आहोत. आम्ही सर्व कागदपत्रं ईडीला दिली आहेत. खेडच्या सभेचा हा सर्व परिणाम आहे," असंही परब म्हणाले.

रिसॉर्टविरोधात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची तक्रार

शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दापोली रिसॅार्टप्रकरणी अनिल परब आणि इतरांविरोधात दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे.

अनिल परब यांनी रिसॅार्ट बांधण्यासाठी CRZ ची परवानगी घेतली नाही. त्यामुळे हे रिसॅार्ट अवैध आहे, असा दावा या तक्रारीत करण्यात आलाय.

"या प्रकरणाची चौकशीचे आदेश द्यावेत आणि आरोपींवर कारवाई करावी," अशी मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केलीय.

अनिल परब यांनी 2017 ला जागा विकत घेऊन रजिस्टेृशन दोन वर्षांनी केल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयानं तक्रारीत दिलीय.

पर्यावरण मंत्रालयाने आपल्या तक्रारी अनिल परब यांचा उल्लेख 'आरोपी नंबर एक' असा केला आहे.

आमचा हातोडा परबांच्या रिसॉर्टसोबतच ठाकरे सरकारही तोडणार - सोमय्या

ठाकरे सरकारने फक्त राज्याला लुटायचं काम केलं आहे. आमचा हातोडा अनिल परबांच्या रिसॉर्टसोबतच ठाकरे सरकारही तोडणार आहे, असं वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचं रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली इथे असलेलं रिसॉर्ट तोडण्यासाठी म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या शनिवारी (26 मार्च) दुपारी पाचच्या सुमारास ते दापोलीत दाखल झाले. यावेळी ते बोलत होते.

नरेंद्र मोदींनी देश भ्रष्टाचारमुक्त केला, आम्ही महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करू, असं किरीट सोमय्या यावेळी म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार निलेश राणे हेसुद्धा होते.

दरम्यान, दापोलीत पोहोचल्यानंतर किरीट सोमय्या यांची स्थानिक पोलिसांसोबत बैठक झाली. पण पोलिसांनी रिसॉर्टकडे जाणारा रस्ता बंद केल्यामुळे सोमय्या यांनी पोलीस ठाण्याच्या पायरीवरच ठिय्या मांडला आहे.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी दापोली आणि परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, याठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनीही गर्दी केल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांना काळे झेंडे दाखवून या दौऱ्याचा विरोध केला. तसेच सोमय्यांच्याविरोधात घोषणाबाजीही त्यांनी केली.

प्रतीकात्मक असा मोठा हातोडा सोमय्या यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना दाखवला. हा हातोडा जनतेच्या भावनांचं प्रतीक असल्याचं सोमय्या म्हणाले.

अनिल परबांच्या रेसॉर्टवर हातोडा चालणार का?

अनिल परब यांचं कथित अनधिकृत साई रिसॉर्ट तोडण्यासाठी सोमय्या यांनी जोरदार रोड शो करत आपल्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असोच्या घोषणा दिल्या. यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत होता.

सोमय्या यांचे कोल्हापूर, पुणे, रायगड हे सगळे दौरे वादग्रस्त ठरले होते. दापोली दौऱ्यातही भाजप-शिवसेना संघर्ष तापण्याची शक्यता आहे.

मंत्री अनिल परब यांचं रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी स्वत:च दापोलीतला बंगला पाडला होता.

आम्ही जनतेची भाषा बोलतो, जनतेची ताकद दाखवायला दापोलीला जात आहे असं सोमय्या यांनी सांगितलं.

दरम्यान सोमय्यांनी दापोलीत येऊन दाखवावं, आम्ही त्यांना रोखणार असं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे नेते संजय कदम यांनी म्हटलं आहे.

हे गुजरात नाही तर कोकण आहे. आम्ही कोकणातील लोक पर्यटकांच्या साथीने त्यांना रोखणार. यांच्या राजकारणाचा मोठा फटका इथल्या पर्यटनाला बसला आहे. स्थानिकांनी कर्ज काढत, कोरोनातून सावरत घसरलेला गाडा रुळावर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला असं कदम म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)