You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र भुयार : राजू शेट्टींनी त्यांच्या एकमेव आमदाराची पक्षातून हकालपट्टी का केली?
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
अमरावतीतील मोर्शी मतदारसंघाचे स्वाभिमानी पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आले. स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज (25 मार्च) हिवरखेड येथील शेतकरी मेळाव्यात ही घोषणा केली आहे. स्वाभिमानी पक्षाशी निष्ठावान नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी पक्षाचे एकमेव आमदार होते.
महाविकास आघाडीतून स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतर आमदार भुयार यांची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीकता वाढली होती. या कालावधीत ते स्वाभिमानी पक्षाच्या संपर्कात नसल्याचे आरोप त्यांच्यावर होते. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही त्यांनी आवाज उठवला नसल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
हिवरखेड येथील शेतकरी मेळाव्यात भुयार यांची स्वाभिमानी पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा राजू शेट्टींनी केली.
शेतकरी मेळाव्यात बोलताना ते म्हणाले "मोर्शी, वरूड या भागातून भुयार यांच्या विरोधात अनेक तक्रारी माझ्याकडे झाल्या. देवेंद्र भुयार याला वाटत असेल की मोठा झालो तर त्यांनी जुने दिवसांची आठवण करून घ्यावी. भुयार याने सामान्य जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळं जनतेच्या निर्णयाचा आदर करत त्याला पक्षातून निष्कासित करण्याची वेळ आली आहे. भुयार सारखी घाण आमच्या संघटनेत राहू नये, असं माझं मत आहे."
"मी चुकीच्या माणसाच्या बाजूला उभ राहिलो ही आमची चूक होती त्यासाठी मी जनतेची माफी मागतो. आघाडीसोबत भांडून भुयार साठी उमेदवारी घेतली होती. त्यावेळी भुयार यांचा नावाला अजित पवारांचाही विरोध होता. तरीही त्याला साथ दिली, पण तो गद्दार निघाला त्यामुळं त्याची पक्षातून हकालपट्टी आम्ही करतोय. यानंतर त्याचा आमच्या पक्षाशी जराही सबंध नाही" शेट्टी म्हणाले.
भुयार काय म्हणाले?
स्वाभिमानी पक्षातून निष्कासित केल्यानंतर आमदार देवेंद्र भुयार यांनी राजू शेट्टींना धन्यवाद दिले.
ते म्हणाले "शेतकरी मेळाव्यात माझ्यावर झालेले आरोप खरे आहेत, त्यामुळं त्यांचे मी धन्यवाद मानतो. माझ्या मतदार संघात विकास व्हावा त्यासाठी आघाडीतील सर्व नेत्यांसोबत जवळीकता आवश्यक आहे. यामुळे ते मी करतोच, दुसरं मी मतदार संघ सोडून कुठेच जात नाही. त्यामुळं त्यांच्या निर्णयाचा मी स्वागत करतो" भुयार म्हणाले.
कोण आहेत देवेंद्र भुयार?
देवेंद्र भुयार वरूड मोर्शी मतदार संघाचे आमदार आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते आणि तत्कालीन कृषिमंत्री अनिल बोंडेंचा पराभव करून ते विधानसभेत पोहोचले.
कृषिमंत्री आणि सामान्य शेतकरी यांच्यातल्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले होत. काँग्रेस महाआघाडीचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारीवर ते निवडणूक लढले.
देवेंद्र भुयार यांचं मोर्शी तालुक्यातील गव्हाणकुंड हे मुळ गाव आहे. पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य असा त्यांचा प्रवास सुरू होता. विधानसभेची ही त्यांची पहिलीच निवडणूक होती.
शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी भरीव कामगिरी त्यांना करायची होती. त्यासाठी बच्चु कडू यांच्या प्रहार संघटनेत सहभागी झाले. त्यावेळी डॉ. बोंडे शिवसेनेत होते.
त्यावेळी डॉ. बोंडे आणि बच्चू कडू आक्रमक आंदोलनासाठी प्रसिद्ध होते. त्यांचाच प्रभाव भुयार यांच्यावर पडला अस त्यांनी अनेकदा स्पष्ट केलं होत. सोफिया वीज प्रकल्पाविरोधातल्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग होता. मात्र सोफिया वीज प्रकल्पावरून त्यांच्यात फूट पडली आणि भुयार यांनी वेगळी संघटना उभारली.
त्यानंतर देवेंद्र भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलन त्यांनी केली.
बोंडे आमदार ते मंत्री असताना मतदार संघातील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम अपूर्ण असल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला. त्याचबरोबर मतदार संघातील सर्वांगीण विकास कसा खोळंबला यावर ते सातत्याने प्रहार करत राहिले.
संत्राला राजाश्रय देण्यात सत्ताधारी पक्षाला अपयश येत असल्याचं सांगण्यात भुयार यशस्वी ठरले. पण निवडणुकीत ऐन मतदानाच्या दिवशी भुयार यांच्यावरचा हल्ला त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली, मतदारांची सहानुभूतीची त्यांच्या बाजूने वळली. आणि ते विधानसभेत पोहचले.
दरम्यानच्या काळात भुयार यांच्यातली आंदोलनाची धार कमी झाल्याचे आरोप त्यांच्यावर व्हायला लागले. स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या आंदोलनाकडे त्यांनी पाठ फिरवली असल्याचं रविकांत तुपकर म्हणाले.
"आमदार झाल्यानंतर भुयार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जवळीकता वाढली. त्यांच्या मतदार संघात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी स्वाभिमानी पक्षाचा साधा बिल्लाही लावत नसायचे. आंदोलन तर नव्हतेच पण पक्षाच्या संपर्कातही ते राहिले नाहीत. त्यांना निवडणूक देण्यासाठी पक्षाने जीवाच रान केलं. पण भुयार आमच्यासोबत प्रामाणिक राहिले नाही. त्यामुळं पक्षातून त्यांची हकालपट्टी झाली आहे," असंही रविकांत तुपकर म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)