आदित्य ठाकरे आधी संचालक असलेली कंपनी आम्ही शोधायला गेलो तेव्हा...

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 2014 ते 2019 या काळात पाच वर्षं कोमो स्टॉक एन्ड प्रॉपर्टीज (LPP) या कंपनीत संचालक होते. आदित्य ठाकरे 2019 मध्ये या कंपनीकडून बाहेर पडले. पण सद्यस्थितीत हवाला ऑपरेटर असल्याचा आरोप असलेले नंदकिशोर चतुर्वेदी या कंपनीचे संचालक आहेत.

भाजपने नंदकिशोर चतुर्वेदी यांचे आदित्य ठाकरेंशी संबंध असल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी ईडीने चौकशी केली पाहिजे अशी भाजप नेत्यांनी मागणी केलीय.

ही कंपनी कोणता व्यापार करते? नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याशी काही संपर्क होऊ शकतो का? हे शोधण्यासाठी आम्ही या कंपनीच्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली.

कोमो स्टॉक एंड प्रॉपर्टीज (LPP) कंपनी काय आहे?

कॉर्पोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटवर कोमो स्टॉक एन्ड प्रॉपर्टीज (LPP) या कंपनीची माहिती मिळाली. या कंपनीचा रजिस्टर पत्ता देण्यात आलाय -1202, मॅरेथॉन ओमेगा, सेनापती बापट मार्ग, लोअरपरळ, मुंबई.

कॉर्पोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटवर ही कंपनी कंस्ट्रक्शन म्हणजेच बांधकाम व्यावसायाशी निगडीत असल्याचं सांगण्यात आलंय. आम्ही या पत्त्यावर जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला.

नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याशी संपर्क होऊ शकतो का? ही कंपनी कोणता बिझनेस करते याची माहिती विचारण्याचा प्रयत्न केला.

इमारतीत उपस्थित सेक्युरिटीने मॅरेथॉन ओमेगा ही रहिवासी इमारत असून या ठिकाणी अशी कोणतीही कंपनी नाही असं सांगितलं.

1202 नंबरचं घर गेले कित्येक वर्षांपासून बंद आहे, कोणीच रहात नाही. घर कोणाचं आहे याची माहिती नाही, असं सेक्युरिटी गार्ड पुढे म्हणाले.

त्यांनी आम्हाला वर जाऊ दिलं नाही. पण, आम्ही इमारतीच्या मॅनेजरला भेटलो. कोमो स्टॉक एंड प्रॉपर्टीज (LPP) बाबत आम्ही त्यांनाही विचारलं.

नाव न सांगण्याच्या अटीवर ते म्हणाले, "1202 हा फ्लॅट नंदकिशोर चतुर्वेदी यांचा आहे. पण कोरोनापासूनच घर बंद आहे. घरात कोणीच रहात नाही. ते कुठे आहेत याची माहिती नाही."

या घरात कधीच कंपनी नव्हती अशी माहिती त्यांनी पुढे दिली.

नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याशी संपर्क करण्याचा आम्हीदेखील प्रयत्न करतोय. पण त्यांचा काहीच पत्ता नाहीये, असं त्यांनी पुढे सांगितलं.

या कंपनीचा आदित्य ठाकरेंशी काय संबंध?

आदित्य ठाकरे 2014 मध्ये कोमो स्टॉक एंड प्रॉपर्टीज (LPP) कंपनीत पहिल्यांदा संचालक झाले. कॉरपोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, आदित्य ठाकरेंनी 2019 मध्ये ही कंपनी सोडली.

पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 2020 मध्ये नंदकिशोर चतुर्वेदी या कंपनीचे संचालक झाले.

राज्याचा एक मंत्री या कंपनीचा संचालक होता. त्याच कंपनीचे संचालक आता नंदकिशोर चतुर्वेदी आहेत, याची चौकशी गरजेची आहे, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी केलीये.

पण भाजपच्या आरोपाबाबत आदित्य ठाकरेंनी अजूनही काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या इतर कंपन्यांचं काय झालं?

कॉरपोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, नंदकिशोर चतुर्वेदी सध्या10 कंपन्यांचे संचालक आहेत. यातील सहा कंपन्या त्यांनी 2017 मध्ये एकाच दिवशी 30 मार्चला स्थापन केल्या होत्या.

या कंपन्या काय करतात, कुठे आहेत, नंदकिशोर चतुर्वेदी त्या ठिकाणी आहेत का? हे शोधण्यासाठी आम्ही इतर कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

या कंपन्यातील एक प्राईम टेक्स ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी लोअर परळ भागातील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये आहे. मार्च 2010 मध्ये ही कंपनी सुरू करण्यात आल्याचं कॉरपोरेट मंत्रालयाची वेबसाईट तपासल्यानंतर दिसून येतंय.

कमला मिल्स कंपाऊंडमधल्या ट्रेड वर्ल्ड या इमारतीच्या तेराव्या मजल्यावर प्राईम टेक्स ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडचं कार्यालय आहे. या मजल्यावर संपूर्ण अंधार होता. समोर एक दरवाजा होता पण काहीच दिसत नव्हतं. मोबाईलच्या लाईटमध्ये आम्हाला दरवाज्यावर चिकटवण्यात आलेली एक नोटीस दिसून आली.

ही नोटीस होती ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाची. यावर लिहीण्यात आलंय, "या जागेवर ईडी मुंबईच्या झोन-1 ने सर्च केला आहे. 25 मे 2021 मध्ये हा सर्च करण्यात आला आहे. या ऑफिसच्या एन्ट्री गेटच्या दोन चाव्या ईडीच्या ताब्यात आहेत."

दोन पंच साक्षीदारांच्या समोर हा पंचनामा केल्यानंतर त्याची कॉपी दरवाज्यावर लावण्यात आली असल्याचं दिसून आलं.

तर वत्सला ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीदेखील याच पत्त्यावर रजिस्टर असल्याचं आढळून आलं.

मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर नंदकिशोर चतुर्वेदी हे नाव पुढे आलं होतं.

चतुर्वेदी हवाला ऑपरेटर असल्याचा दावा ईडीने केलाय. त्यानंतर भाजपने नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नावावरून आदित्य ठाकरेंवर आरोप सुरू केले आहेत.

आदित्य ठाकरे साल 2019 मध्ये आशर प्रोजेक्ट डीएम (LPP) या कंपनीतून बाहेर पडले. पण त्यानंतर एका वर्षाने म्हणजे 2020 मध्ये श्रीधर पाटणकर या कंपनीत संचालक बनल्याचं कॉरपोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीवरून समोर येतंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)