उद्धव ठाकरे: भाजपचं हिटलरच्या पावलांवर पाऊल

फोटो स्रोत, facebook
भाजपला पंचायत ते पार्लमेंट अशी सत्ता हवी आहे. ही हुकूमशाहीची नांदी आहे. हिटलरच्या पावलांवर पाऊल टाकणारा भाजप हा पक्ष आहे. गोबेल्सनीतीप्रमाणे अफवा पसरवण्याचं काम भाजपकडून सुरू आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपला दुसरा कुणीही सत्तास्थानी नको आहे. हिटलरप्रमाणे त्यांची कार्यपद्धती आहे. त्यांच्या चार फळ्या यासाठी कार्यरत आहेत. गोबेल्सनीतीप्रमाणे ते काम करतात. त्यांच्या या धोरणाला आपल्याला सुरुंग लावायचा आहे, असं ठाकरे यावेळी म्हणाले.
रविवारी (20 मार्च) शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी शिवसेना खासदार आणि पदाधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
मुस्लिमांविषयी भाजपने काही केलं तर ते देशप्रेम असतं, पण आम्ही काही केलं तर तो देशद्रोह ठरतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचा उल्लेख केला.
ते पुढे म्हणाले, "मुस्लिमांना विरोध करणारी व्यक्ती हिंदू असूच शकत नाही, असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी पूर्वी केलं होतं. त्यामुळे जर मला जनाब म्हणणार असाल तर तुमच्या सरसंघचालकांना काय बोलणार आहात? मोहन भागवतांच्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का?"
मेहबुबा मुफ्तीसोबत युती करणाऱ्या आणि अझहर मसूदला सोडणाऱ्या भाजपाला हिजबुल जनता पक्ष म्हणायचे का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

फोटो स्रोत, Getty/facebook
अशा प्रकारचे घाणेरडे आरोप आम्ही केले नाहीत. आमच्यावर ती वेळ येऊ देऊ नका. पाकिस्तानात गेल्यानंतर जिनांच्या थडग्यावर नतमस्तक कोण झालं होतं? हा काळा इतिहास पाहून आम्ही अजूनही त्यांना भारतीय जनता पक्षच म्हणतोय, पाजपा म्हणजे पाकिस्तान जनता पक्ष म्हणत नाही, असंही ठाकरे म्हणाले.
'मेलो तरी MIM शी युती नाही'
"MIM ही भाजपची B टीम आहे. अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तींसोबत भाजप सत्तेत सहभागी झाला होता. तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणे शक्य नाही. त्यामुळे MIM सोबत आघाडी करण्याचा प्रश्नच नाही, मेलो तरी MIM शी युती नाही," असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
MIM पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी नुकतीच महाविकास आघाडी सरकारला युतीची ऑफर दिली होती.
त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात MIM आणि महाविकास आघाडीच्या या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू झाली. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत युती केली होती, याचा भाजपला विसर पडला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्हाला 'जनाब सेना' मग तुम्हाला 'हिजबुल सेना' म्हणायचं का, असं ते म्हणाले.
शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. हिंदू धर्म आम्हीच स्थापन केला, असंही भाजप नेते उद्या म्हणू शकतील. त्यांचं हिंदुत्व हे राजकारणापुरतं आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
'भाजपसारखी पक्षबांधणी करायची आहे'
शिवसंपर्क मोहीम ही काय नवीन नाही. या माध्यमातून शिवसेनेचे विचार घराघरांत पोचवायचे आहेत. भाजप-शिवसेनेची युती भाजपने तोडली. भाजपकडे असलेल्या परंपरागत जागा आपण का लढवत नाही? आपल्याकडे जिंकणारे उमेदवार असणं आवश्यक आहे.

फोटो स्रोत, facebook
आता सर्व निवडणुका गांभीर्याने घ्यायच्या आहे पंचायत ते पार्लामेंट. भाजपची ही निती घातक आहे. त्याला काटशह गरजेचा आहे. त्यांनी केली तशीच पक्षबांधणी आपल्याला करायची आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं.
'द कश्मीर फाईल्स'बाबत उल्लेख
एक नविन फाईल आज तयार झाली आहे. पंडितांवर अत्याचार झाले तेव्हा व्ही. पी. सिंग यांना तेव्हा भाजपचे समर्थन होतं. पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना शिवसेनेने विरोध केला कारण ते जामा मशिदीत गेले होते. त्यावेळी भाजप एक शब्दही बोलला नाही. तेव्हा फक्त बाळासाहेंनी सगळ्यांना अंगावर घेतलं होतं, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
भारत-पाकिस्तान बस सेवा तेव्हा वाजपेयींनी सुरु केली इथं पासून न बोलावता पाकिस्तानात जाऊन केक खाणारे मोदी इथंपर्यंत आम्ही सगळे बघत आहोत.
मग तुमचा काय हिजबूल पक्ष म्हणायचे का? आम्ही असं काही म्हणणार नाही. भाजपचं हिंदुत्व कसं थोतांड आहे, त्यांनी भीतीचा निर्माण केलेला हा भ्रम घराघरात जाऊन दूर करायचा आहे, असंही ठाकरे म्हणाले.
'महाराष्ट्र पिंजून काढणार'
शिवसैनिक जे एकदा ठरवतो तो करुन दाखवतो. आता युवा सैनिकपण सज्ज झाला आहे.
शिवसेनेचा अंगार या भंगारांना दाखवून द्यायचा आहे. त्यासाठी लवकरच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. महाराष्ट्र काय आहे हे दिल्ली पर्यंत कळेल, असंही ठाकरे म्हणाले.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








