उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेची सूत्रं रश्मी ठाकरेंकडे आहेत का?

रश्मी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

रश्मी उद्धव ठाकरे. शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादक असलेल्या रश्मी यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून जमीन खरेदी केली होती असं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेता रवींद्र वायकर यांनी हा व्यवहार झाल्याचं सांगितलं आहे.

रश्मी ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू असल्याचं म्हटलं जातं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं सांभाळल्यापासून रश्मी ठाकरे या शिवसेनेच्या राजकारणात सक्रीय झाल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला आढावा.

2009 चा प्रसंग... कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडीचं सरकार होतं. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये 90:10 कोटाचा निर्णय घेतला होता. काही कारणांमुळे तो निर्णय वादग्रस्त ठरत होता. त्यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष होते.

मी आणि एक महिला पत्रकार उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी शिवसेना भवनला पोहोचलो. आम्हाला ते भेटतील असा निरोप आला. पण 3-4 तासांच्या प्रतीक्षेनंतर उद्धव ठाकरे परस्पर निघून गेल्याचं कळलं. शिवसेना भवनमध्ये उपस्थित असलेल्या नेत्यांसमोर आम्ही तीव्र नाराजी व्यक्त केली आणि तिथून निघालो. दुपार उलटून गेली होती.

आम्ही दुसर्‍या बातमीच्या कामाला लागलो. संध्याकाळी माझी सहकारी महिला पत्रकाराला मातोश्रीच्या लँडलाईनवरून फोन आला. "रश्मी वहिनींनी तुम्हाला भेटायला बोलवलं आहे".

हा निरोप ऐकून आमच्या नाराजी व्यक्त करण्याचा फायदा झाल्याचा आनंद आम्हाला झाला. रात्री 8 वाजल्याच्या सुमारास आम्ही मातोश्रीवर पोहचलो. रश्मी ठाकरेंना भेटण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. कॉटनचा ड्रेस, गळ्यात हिर्‍यांचं मंगळसूत्र आणि चेहर्‍यावर स्मित हास्य असणाऱ्या रश्मी ठाकरे मातोश्रीच्या हॉलमध्ये बसून विषय काय आहे? हे समजून घेत होत्या.

शिवसेनेची प्रतिक्रिया का महत्वाची आहे? हे अधूनमधून विचारत होत्या. त्या विषयातलं गांभीर्य, राजकीय फायदा त्या समजून घेत होत्या. अधूनमधून एखाद्या गृहिणीप्रमाणे चहा घेण्याचं, काहीतरी खाण्याचा आग्रह करत होत्या. अर्ध्या तासांत पूर्ण विषय समजल्यावर "मी उद्धवजींना सांगते," इतकंच त्या म्हणाल्या.

दुसर्‍या दिवशी सकाळी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर भेटायला बोलवल्याचा निरोप आला. मी आणि माझी सहकारी उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो. विषय समजून घेऊन त्यांनी पत्रकार परिषद बोलावली आणि शिवसेनेची भूमिका जाहीर केली. त्यावेळी पहिल्यांदा रश्मी ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिकांमधला सक्रीय सहभाग जवळून अनुभवला.

रश्मी पाटणकर ते "रश्मी उद्धव ठाकरे" ..!

रश्मी ठाकरे या मूळच्या डोंबिवलीच्या.... उद्योजक माधवराव पाटणकर यांची त्या कन्या..! रश्मी ठाकरे यांनी मुलुंडच्या वझे केळकर कॉलेजमधून बी.कॉमचं शिक्षण पूर्ण केलं.

त्यानंतर रश्मी ठाकरे यांनी काही काळ नोकरी केली. त्यादरम्यान राज ठाकरे यांची सख्खी बहीण जयवंती ठाकरे यांच्याशी रश्मी यांची मैत्री झाली.

जयवंती आणि उद्धव ठाकरे यांचं बहीण-भावाचं घट्ट नातं असल्याचं अनेकजण सांगतात. त्या दरम्यान जयवंती यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची ओळख करून दिली. 1989 साली उध्दव आणि रश्मी यांचं लग्न झालं आणि रश्मी पाटणकर या रश्मी उद्धव ठाकरे झाल्या.

पडद्यामागचं राजकारण?

रमेश किणी हत्या प्रकरणात राज ठाकरे यांची CBI चौकशी झाली. या चौकशीतून ते निर्दोष सुटले. पण राजकीयदृष्ट्या ते मागे पडले. शिवसेनेची या प्रकरणामुळे कोंडी झाली. त्यानंतर 1997 च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे राजकारणात सक्रीय होताना दिसू लागले. याआधी ते फक्त फोटोग्राफी करत होते.

2002 च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जबाबदारी दिली. 2003 साली उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले.

रश्मी ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

उद्धव ठाकरे यांना राजकारणात रस नव्हता त्यांना रश्मी ठाकरे यांच्या आग्रहाखातर राजकारणात यावं लागलं अशी चर्चा दबक्या आवाजात कायम असते.

खरी असल्याचं काही पत्रकार आणि शिवसेनेतल्या जुन्या नेत्याचं म्हणणं आहे. पत्रकार धवल कुलकर्णी यांना हे म्हणणं मान्य नाही. ते सांगतात "असं म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करण्यासारखं आहे. उद्धव ठाकरे यांनी राजकारणात स्वतःचं नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे हा दावा खोटा ठरतो."

2003 सालानंतर उद्धव ठाकरे राजकीय दौऱ्यावर जाताना रश्मी ठाकरे त्यांच्यासोबत दिसू लागल्या. 2008-09 पर्यंत रश्मी ठाकरे या राजकीय गोष्टींमध्ये सक्रीय झालेल्या दिसल्या.

2010 ची कल्याण डोंबिवलीची महापालिका निवडणूक असो किंवा 2012 ची मुंबई महापालिका निवडणूक... या निवडणुकीत रश्मी ठाकरे प्रचारात उतरलेल्या दिसल्या. उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यासाठी त्या निवडणुकीच्या प्रचारात दिसल्या तरी त्यांनी राजकीय नेत्या म्हणून सक्रियपणे कधीच सहभाग घेणं पसंत केलं नाही.

रश्मी ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे सांगतात, "2009 ते 2012 पर्यंत मी पुण्याची संपर्क प्रमुख होते. त्यावेळी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात महिलांची मागणी होती की रश्मी ठाकरे यांचा रोड-शो झाला पाहिजे. पण रश्मी ठाकरेंनी रोड-शो करण्यास नकार दिला. त्या जिथे गरज असते तिथे पाठिंब्यासाठी कायम असतात. पण सगळे राजकारणानिमित्त बाहेर असल्यामुळे आधी घराची जबाबदारी सांभाळणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य मानतात."

शिवसेना पक्षात अनेक निर्णय रश्मी ठाकरे घेतात असं बोललं जातं हे कितपत खरं आहे? या प्रश्नावर निलम गोऱ्हे सांगतात, "राजकीय कुटुंबात विविध विषयांवर चर्चा ही होत असते. त्यावर त्या त्यांचं मत मांडत असतील पण अंतिम निर्णय पक्षप्रमुखांचा असतो.

काहींना त्यांचं मत निर्णायक आहे असं वाटत असेल पण मला असा अनुभव कधीच आला नाही. याउलट पूर्वी मोबाईल फोन नव्हते तेव्हा मातोश्रीवर फोन केला आणि साहेब दौऱ्यावर असले आणि एखादी अडचण रश्मी वहिनींना सांगितली तर ती सोडवली जायची. पण त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हती."

रश्मी ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

याउलट एका नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले,"सर्व निर्णयांमध्ये हस्तक्षेप हा रश्मी ठाकरे यांचा असतो. शिवसेनेत आणि आता सत्तेत पद मिळवण्यासाठी रश्मी ठाकरे यांना भेटल्याशिवाय काम होत नाही. याआधीही त्यांचा राजकारणात सक्रीय सहभाग होता आणि आता तो वाढला आहे. फक्त हे राजकारण पडद्यामागून केलं जातं".

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होणार नाही असं बोललं जात होतं. अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते अशा वेळी ही युती कशी झाली? या दिलजमाईचा स्क्रिप्टराईटर कोण?

हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीत विचारला गेला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले," मातोश्रीवर गेल्यावर रश्मी वहिनींनी आम्हाला वडा आणि साबुदाणा खिचडी खाऊ घातली. त्यानंतर चर्चेला वाव उरलाचं नाही," हा विनोद असला तरी त्यामागे अनेक राजकीय अर्थ असल्याचं विश्लेषक सांगतात.

जेष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात, "रश्मी ठाकरे या दबावाचं राजकारण करतात याबाबतीत मी सहमत नाही. पण त्यांनी अगदीच फक्त किचन सांभाळलं आहे हे ही खरं नाही."

अनेक पदांवर विराजमान...!

रश्मी ठाकरे या गेली अनेक वर्षे महिला बचत गटाचं काम पाहतात. महिलांच्या प्रश्नांवर बैठका घेतात. त्यांचे मुद्दे जाणून घेतात. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामनाचं संपादक पद रश्मी ठाकरे यांना देण्यात आलं. पण हे पद दिल्यापासून त्यांनी लिखाणातून कोणतीही भूमिका मांडली नाही. त्यामुळे हे पद नामधारी असल्याचं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. याव्यतिरिक्त अनेक छोट्या मोठ्या संघटनांची पदं ही रश्मी ठाकरे यांच्याकडे आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)