ग्लेन मॅक्सवेल: भारतीय मुलीशी लग्न करणारे हे 9 विदेशी क्रिकेटपटू तुम्हाला माहिती आहेत का?

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल हासुद्धा यंदाच्या लग्नसराईत विवाहबंधनात अडकला आहे.

ग्लेनने त्याची प्रेयसी विनी रमण हिच्याशी 18 मार्च रोजी लग्नगाठ बांधली.

आपल्या विवाह समारंभाचा एक फोटो ग्लेन मॅक्सवेलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या फोटोमध्ये ग्लेन मॅक्सवेल दिमाखदार ब्लॅक सूटमध्ये दिसत असून विनीने आकर्षक असा व्हाईट गाऊन परिधान केला आहे.

विनी रमण ही मूळ भारतीय वंशाची आहे. ती सध्या मेलबर्नमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमण हे दोघे 2017 पासून रिलेशनशिपमध्ये होते. अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची एकत्र उपस्थिती असायची.

अखेर, जवळपास पाच वर्षांनी दोघांनी आपल्या नात्याला विवाहाचं नाव दिलं आहे.

1. ग्लेन मॅक्सवेल

ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमण यांचा हा विवाहसोहळा ऑस्ट्रेलियाची क्रिकेट पंढरी मानल्या जाणाऱ्या मेलबर्नमध्ये पार पडला.

त्यानंतर दोघेही भारतात 27 मार्च रोजी तमीळ पद्धतीनेही विवाहबद्ध होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

33 वर्षीय ग्लेन मॅक्सवेल सध्याच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील आघाडीचा खेळाडू मानला जातो. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही आपल्या फटकेबाजीने त्याने वेगळी ओळख प्राप्त केली आहे. IPL मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं प्रतिनिधित्व करतो.

सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ हा पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पण आपल्या लग्नसमारंभामुळे मॅक्सवेल पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही.

भारतीय मुलीशी लग्न करणारा ग्लेन मॅक्सवेल हा काय पहिलाच क्रिकेटपटू नाही. या आधीही इतर अनेक क्रिकेट खेळाडू भारताचे जावई बनले आहेत.

या यादीत कोणकोणते खेळाडू आहेत, त्याची माहिती आपण घेऊ -

2. शोएब मलिक

भारतीय मुलींशी विवाहबद्ध झालेल्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक चर्चित नावांपैकी एक म्हणजे शोएब मलिक. पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू असलेला शोएब मलिक 2010 मध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी विवाहबद्ध झाला होता.

पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारतीय टेनिस स्टार सानियाशी लग्न केल्यामुळे या दोघांना जोरदार ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं होतं.

3. मुथ्थय्या मुरलीधरन

भल्या-भल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणारा श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथ्थय्या मुरलीधरन एका भारतीय तरूणीसमोर क्लीन बोल्ड झाला आहे. मुथ्थय्याने 2005 मध्ये चेन्नईस्थित मधीमलार रमामूर्ती या तरूणीशी विवाहबद्ध झाला होता. मधीमलार ही चेन्नईतील मलार हॉस्पिटलचे संचालक नित्या आणि एस. रमामूर्ती यांची कन्या होय.

4. शॉन टेट

ग्लेन मॅक्सवेलप्रमाणेच ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका स्टार क्रिकेटपटूने भारतीय मुलीशी विवाह केलेला आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज शॉन टेट याने 2014 मध्ये मॉडेल माशूम सिंगा हिच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांचा विवाह निकटवर्तीय मित्रमंडळींच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडला होता.

5. हसन अली

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली यानेही भारतीय तरूणीशी विवाह केलेला आहे. मूळ भारतीय असलेल्या समिया आरजू हिच्याशी हसनचा विवाह दुबई येथे 2019 मध्ये पार पडला. त्यानंतर दोघांना एक कन्यारत्नही झालं.

6. झहीर अब्बास

पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू झहीर अब्बास यांनीसुद्धा भारतीय मुलीशी विवाह केला आहे. त्यांची भेट युकेमध्ये रिता लुथरा यांच्याशी झाली होती. त्यावेळी रिता या त्याठिकाणी इंटेरिअर डिझायनिंगचं शिक्षण घेत होत्या. दोघांनी 1988 मध्ये विवाह केला त्यानंतर ते आता कराचीमध्ये स्थायिक झाले आहेत.

7. ग्लेन टर्नर

न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू ग्लेन टर्नर हेसुद्धा भारतीय तरूणीशी विवाहबद्ध झाले आहेत. ग्लेन यांनी 1973 साली सुखिंदर कौर यांच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर सुखविंदर कौर या न्यूझीलंडमध्ये सुखी टर्नर नावाने प्रसिद्ध झाल्या. सुखी टर्नर यांनी पुढे न्यूझीलंडच्या राजकीय क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली.

8. माईक ब्रेअर्ली

क्रिकेट इतिहासातील महान कर्णधारांमध्ये इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू माईक ब्रेअर्ली यांचा समावेश होतो. माईक हेसुद्धा भारताचे जावई आहेत. 1970 मध्ये माईक यांनी माना साराभाई यांच्याशी विवाह रचला होता. गुजरातमधील सुप्रसिद्ध उद्योजक गौतम साराभाई यांच्या त्या कन्या होत. माना आणि माईक दांपत्य आता लंडनमध्ये स्थायिक असून त्यांना दोन अपत्यंही आहेत.

9. मोहसीन खान

याव्यतिरिक्त पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खान यांनी नव्वदच्या दशकात भारतीय चित्रपट अभिनेत्री रिना रॉय यांच्याशी विवाह करून खळबळ माजवली होती. दोघांचा विवाह समारंभ कराचीत पार पडला. पण काही कालावधीतच दोघांच्या संबंधात वितुष्ट आलं आणि त्यांचा घटस्फोट झाला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)