महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात,रावसाहेब दानवेंचा दावा #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Facebook
विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात,रावसाहेब दानवेंचा दावा
महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मविआमधले 25 आमदार बहिष्कार टाकणार होते. पण त्यांची कशीबशी समजूत काढण्यात आली आहे. निवडणूक आली की हे नाराज असलेले एकेक आमदार भाजप मध्ये येतील, आता त्यांची नावं सांगितल्यास अनेकांची आमदारकी धोक्यात येईल, असं दानवे म्हणाले.
यावेळी दानवेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. ते म्हणतात, "राज्यातील मतदारांनी भाजप-शिवसेनेला कौल दिला असताना शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच त्यांच्यातला भगवा रंग संपुष्टात आला. आता त्यांनी हिरव्याचं पांघरुण घेतलं आहे. त्यामुळे आता ते हिरव्याचं समर्थन करतात. भगव्याचं समर्थन करत नाही."
Zee न्यूज या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
2. देश फक्त 4 लोक चालवत आहेत. 2 विकतायत तर 2 व्यक्ती खरेदी करतायत - अरुंधती राय
या देशाला सध्या 4 लोक चालवत आहेत, यातील सत्तेत असलेले दोघे विकत आहेत तर दोघे हे सगळे खरेदी करत आहेत. असे म्हणत प्रसिद्ध लेखिका अरुंधती राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली.
पंजाब युनिव्हर्सिटीच्या सनी ओबेरॉय ऑडिटोरियममध्ये आयोजित एका कार्यक्रमात राय बोलत होत्या. त्यांनी देशातील प्रमुख मीडियासह काही संस्थांचा दुरुपयोग होत असल्याचीही खंत व्यक्त केली. यावेळी अरुंधती राय यांनी नाव न घेता नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह देशातील उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
यावेळी त्या म्हणाल्या, "जात, धर्म, पंथ, भाषा आणि प्रदेश यांपासून पुढे विचार करत आपण एकता जपली पाहिजे, देशातील शेतकरी आंदोलने मोठ्या प्रमाणात होत आहेत. परंतु याचे कोणाला काहीही पडलेले नाही. धार्मिकतेच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचे काम काही संस्था करत आहेत."
सध्या देशात जातीय तेढ निर्माण करून दंगली घडवण्यात येत आहेत. जात, धर्म, पंथ, भाषा आणि प्रदेश यांपासून पुढे विचार करत आपण एकता जपली पाहिजे, पण सध्या देशात हे होताना दिसत नाही. असे म्हणत धार्मिक संस्था आणि संघटनांवर ही राय यांनी टीका केली
दरम्यान, अरुंधती राय यांच्या युनिव्हर्सिटीतील कार्यक्रमाला येण्याचा विद्यार्थीनींच्या एका गटाने विरोध केला. राय यांनी केलेल्या विधानाचा निषेध करत या विद्यार्थीनींनी घोषणा ही दिल्या.
पुढारी या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
3. मोदी युगानंतर भाजपमध्येही फूट पडेल - विरप्पा मोईली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरप्पा मोईली यांनी जी-23च्या नेत्यांना एकसंघ राहण्याचं आवाहन केलं आहे.
सध्या भाजप ज्या स्थितीत आहे. त्याच स्थितीत ते कायम राहणार नाहीत. मोदी युगानंतर भाजपमध्ये फूट पडणारच आहे. त्यामुळे एकजूट राहा, असं आवाहन विरप्पा मोईली यांनी केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आपण सत्तेत नाहीत म्हणून काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी घाबरून जावू नये. भाजप आणि इतर पक्ष येतील आणि जातील. काँग्रेस आहे त्याच ठिकाणी आहे. आपण आशा सोडता कामा नये, असं सांगतानाच आपण दलितांसाठी संघर्ष केला पाहिजे, असं ही ते यावेळी म्हणाले.
सोनिया गांधी यांना पक्षांतर्गत सुधारणा हव्या आहेत. मात्र त्यांच्या आजूबाजूचे लोक ते होऊ देत नाही. जी-23चे नेते पक्ष नेतृत्वावर टीका करत आहेत. त्यामुळे पक्ष अजून कमकुवत होत आहे, अशी खंतही विरप्पा मोईली यांनी बोलून दाखवली.
TV9 या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
4. मोदींच्या उपस्थितीत योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
उत्तर प्रदेशमध्ये योगींची जादू पुन्हा चालली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपने मोठा विजय मिळवल्यानंतर योगी आदित्यनाथ आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक जिल्ह्यात एलईडी स्क्रीन लावून सोहळा थेट दाखवण्याची योजना करण्यात येत आहे.
10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ केव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार याची चर्चा सुरु झाली होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 25 मार्च रोजी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
25 मार्च रोजी दुपारी 4 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याशिवाय अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 200 व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
ABP माझा या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
5. शिवसेना खासदार संजय राऊतांसह कार्यकाळ संपणाऱ्या राज्यसभा खासदारांची यादी जाहीर. कुणाला डच्चू, कुणाला पुन्हा संधी?
विधान परिषद आणि राज्यसभेतील काही सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यात मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळे यातल्या कुणाला पुन्हा संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार याकडेही सर्वाचं लक्ष लागलं आहे.
कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील एकूण 6 खासदारांचा समावेश आहे. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप खासदार पियुष गोयल, काँग्रेस खासदार पी. चिदंबरम, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, भाजपचे विकास महात्मे आणि विनय सहस्त्रबुद्धे यांची नावं आहेत.
त्यामुळे ही यादी आता चर्चेत आहे. या सर्व सदस्यांचा कार्यकाळ हा 4 जुलै रोजी संपणार असल्याची तारीख यादीत देण्यात आली आहे.
TV9 या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








