'पवार साहेब, तुम्ही अजून साडेतीन जिल्ह्यातच अडकलात' #पाचमोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. 'पवार साहेब, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात'
मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित असणाऱ्या महाविकास आघाडीच्या तरूण आमदारांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी 'घाबरून जाऊ नका, भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही', असा दावा करत भाजपला थेट आव्हान दिलं होत.
दरम्यान, पवारांच्या या आव्हानाला आता भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. 'आदरणीय पवार साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षांत दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा,' असं प्रतिआव्हान भाजपनं पवारांना दिलंय.
TV9 या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
2. नवाब मलिक यांच्या जबाबदाऱ्या काढून घेतल्या, पण मंत्रिपद कायम!
उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा कार्यभार हा इतर मंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
त्यामुळे नवाब मलिक हे आता बिनखात्याचे मंत्री राहिले असून त्यांच्या मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभारही महापालिकेच्या गटनेत्या राखी जाधव आणि नरेंद्र राणेंकडे सोपवण्यात आला आहे.
नवाब मलिक हे सध्या गोंदिया आणि परभणीचे पालकमंत्री आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदियाचा कार्यभार दिला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा प्रस्ताव देण्यात येणार आहे. तसंच मलिक यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.
ABP माझा या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
3. शरद यादवांचा LJD आता लालूप्रसाद यादवांच्या RJD मध्ये विलीन होणार
बिहारच्या राजकारणात सध्या फार मोठी उलथापालथ पाहायला मिळते आहे. यात आता लोकतांत्रिक जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी मोठी घोषणा केलीय.

फोटो स्रोत, AFP
शरद यादव यांच्या LJD पक्षाचे विलीनीकरण माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात (RJD) करणार असल्याची माहिती खुद्द शरद यादव यांनी दिलीय.
नितीश कुमार यांच्याशी असलेल्या राजकीय मतभेदामुळं शरद यादव यांनी JDU मधून बंडखोरी करून 2018 मध्ये लोकतांत्रिक जनता दल नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला होता.
लालूप्रसाद यादव यांनी 3 ऑगस्ट 2021 रोजी नवी दिल्लीत शरद यादव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शरद यादव यांनी लालूंशी राजकीय विषयांवर खुलेपणानं भाष्य केलं होतं. शरद यादव यांनी 20 मार्च रोजी अधिकृतपणे त्यांचा पक्ष राजदमध्ये विलीनीकरण करणार असल्याचं सांगितलं आहे. यानिमित्तानं त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक कार्यक्रम होणार असल्याचंही यादव म्हणाले.
सकाळ या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
4. चित्रपटात खोटी कहाणी, 'द कश्मीर फाइल्स' Tax Free करणार नाही'
90 च्या दशकात काश्मीरमधील हजारो पंडितांच्या हत्याकांडावर आधारित 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट भाजपशासित हरियाणा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेशसह काही राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आलाय. बंगाल आणि राजस्थानमध्येही हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, 'द कश्मीर फाइल्स'च्या वादात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उडी घेतलीय. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की, "कोणीही सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहण्याची गरज नाही. द्वेष आणि हिंसाचार पसरवण्यासाठी असे चित्रपट जाणीवपूर्वक बनवले गेले आहेत. ही खोटी कथा आहे, त्यात कोणतंही तथ्य नाही.
असे चित्रपट पैसे देऊन बनवले जातात, त्यामुळे अशा चित्रपटांना टॅक्स फ्री देण्यात काहीच अर्थ नाही. तसंच हा चित्रपट पाहून कोणीही बंगालमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, असंही त्या म्हणाल्या.
तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा कोणताही विचार नसल्याचं समजतंय.
सकाळ या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
5. भाजपाला हरवण्यासाठी काँग्रेस AAP आणि TMC चा ज्युनियर पार्टनर बनायला तयार - पी. चिदंबरम
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसने तृणमूल आणि आपशी जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत.

फोटो स्रोत, @taran_adarsh
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, "काँग्रेस तृणमूल आणि आम आदमी पार्टी यांसारख्या पक्षांसोबत ज्युनियर पार्टनर बनून निवडणूक लढायला तयार आहे."
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी आवश्यक असल्यास काँग्रेस ऍडजस्टमेंट करायला तयार असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, "प्रत्येक पक्षाला ऍडजस्टमेंट करावी लागेल. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनाही ही गोष्ट लागू पडते. हा लढा राज्या-राज्यात होणार आहे. बंगालमध्ये आपल्याला तृणमूलच्या नेतृत्वासोबत लढावं लागणार आहे. पंजाबमध्ये 'आप'च्या नेतृत्वाखाली लढावं लागले. भाजपशी राज्या-राज्यात लढलो तर त्यांचा पराभव करणे शक्य आहे."
नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या पराभवासाठी एकट्या गांधी कुटुंबाला जबाबदार धरता येणार नाही, असंही ते म्हणाले.
NDTV या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








