कपिल सिब्बल यांनी सोडला काँग्रेसचा 'हात', समाजवादी पक्षाच्या 'सायकल'वरुन जाणार राज्यसभेत

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाच्या मदतीने राज्यभेत जाण्याचा निर्णय घेऊन त्यांनी तसा अर्जही भरला आहे.
अखिलेश यादव, शिवपाल यादव, आझम खान यांनी मला देशाचे प्रश्न राज्यसभेत मांडण्याची मोठी संधी दिली आहे असं ते म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
काँग्रेस जी-23 म्हणजे काय? त्यांचं बंड राहुल की सोनिया गांधींविरोधात?
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधल्या निवडणुकांमधल्या दारुण पराभवानंतर कॉंग्रेसमधला जी-23 हा गट पुन्हा चर्चेत आला आहे. या ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांच्या गटाची एक बैठक बुधवारी रात्री गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झाली. त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांची मतं पुन्हा पत्र लिहून कळवली आहेत आणि कॉंग्रेससाठी आवश्यक असणाऱ्या 'सर्वसमावेशक नेतृत्वा'ची गरज पुन्हा व्यक्त केली आहे.
असं समजतं आहे की या बैठकीअगोदर सोनिया गांधींनी गुलाम नबी आझाद यांच्याशी फोनवरुन चर्चाही केली होती. सोनिया गांधींनी त्याअगोदर पंजाबमधल्या कॉंग्रेसच्या खासदारांशीही चर्चा केली होती. पण या जी-23 दबावगटाचं महत्त्व आता गांधींनीही ओळखलेलं दिसतं आहे.
कॉंग्रेसला 2014 पासून विविध निवडणुकांमध्ये, म्हणजे नेमकेपणानं राहुल गांधींच्या नेतृत्वात लढलेल्या निवडणुकांमध्ये, सातत्यानं येत असलेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांचा 2020 मध्ये हा गट निर्माण झाला. हे कॉंग्रेसच्या बाजूला सारलेल्या ज्येष्ठ नेत्यांचं राहुल गांधींविरोधातलं बंड म्हणून पण पहिलं गेलं. पण या नेत्यांचं पक्षातलं वजन, त्यांचा अनुभव आणि कॉंग्रेसच्या अपयशातलं सातत्य हे पाहता त्यांचं मत नेतृत्वाला नजरेआड करता येत नाही.
आता हा जी-23 गट पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे हा दबावगट काय आहे, त्याचं म्हणणं काय, हे समजून घेणं आवश्यक ठरेल.
1. जी-23 आत्ता चर्चेत का आले आहेत?
हा गट आता पुन्हा चर्चेत आला आहे कारण उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमधल्या दारुण पराभवानंतर त्यांनी बुधवारी रात्री दिल्लीत पुन्हा एक बैठक घेतली.

फोटो स्रोत, Getty Images
कॉंग्रेसच्या काय चुका झाल्या हे शोधणं आणि उपाय सुचवणं हाच त्यांचा हेतू होता. वास्तविक ही बैठक कपिल सिब्बल यांच्या घरी होणार होती. सिब्बल यांचा दोन दिवसांपूर्वी 'द इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेली, कठोर टीका केलेली, मुलाखत सध्या चर्चेत आहे.त्यामुळे सिब्बल यांच्याऐवजी ती गुलाम नबी आझाद यांच्या घरी झाली. जसं या बैठकीअगोदर सोनियांनी आझाद यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची बातमी आहे, तसंच गुरुवारी त्यांची प्रत्यक्ष भेट होऊन चर्चा होण्याचीही माहिती आहे.
या दबावगटाच्या बैठकीनंतर एक छोटं पत्रही त्यांनी प्रसिद्धीला दिलं आहे. त्यावर 18 ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांची स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या पत्रकात म्हटल्याप्रमाणं त्यांनी या बैठकीत सातत्यानं येणाऱ्या अपयशाची चर्चा केली आणि सोबत कॉंग्रेसच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं पक्षातून बाहेर पडणं यावर चर्चा झाली.
पुढे जाणाचा एकमेव मार्ग हा 'एकत्रित आणि सर्वसमावेशक नेतृत्व' आणि 'सर्व पातळ्यांवर निर्णयप्रक्रिया' आहे असं त्यांनी त्यात म्हटलं आहे. त्याबरोबरच '2024 मध्ये भाजपाला पर्याय देण्यासाठी कॉंग्रेसनं पुढाकार घेऊन समविचारी पक्षांची मोट बांधावी आणि त्यासाठी लगेच संवाद सुरु करावा' असंही या पत्रात म्हटलं आहे.
या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या नेत्यांनी असंही म्हटलं आहे या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचा कृती कार्यक्रमही ते लवकरच प्रसिद्ध करतील.
2. जी-23 हे नाव कुठून पडलं?
हे माध्यमांनी त्यांन दिलेलं नाव आहे. ते जी-20 किंवा तत्सम जो आंतराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रसमूह असतो त्यावरुन घेतलं गेलंय. पण त्याचा संबंध कॉंग्रेसचा 23 ज्येष्ठ नेत्यांशी आहे. ऑगस्ट 2020 मध्ये कॉंग्रेसचे 23 ज्येष्ठ नेते एकत्र आले. ते पक्षाच्या सद्यस्थितीबद्दल समाधानी नव्हते. कॉंग्रेस नेतृत्वात आणि पक्षसंघटनेत काय आणि कसा बदल करावा लागेल याबद्दल त्यांची मतं होती.
त्यांची ती मतं त्यांनी सोनिया गांधींना जाहीर पत्र लिहून कळवली. 23 नेते एकत्र आल्यानं त्यांना कायम जी-23 असं संबोधलं गेलं. पण या नेत्यांनी आपण गांधींशी प्रामाणिक आहोत असं म्हटलं आणि 'जी' म्हणजे गांधी असून आपण 'गांधी-23' आहोत असंही स्पष्ट केलं.
3. जी-23 मध्ये कोण नेते आहेत?
या गटात कॉंग्रेसचे सगळे मोठे नेते आहेत. अनेक वर्षं पक्षसंघटनेत आणि केंद्र-राज्य सरकारांमध्ये महत्त्वाची पदं भूषविलेले हे सगळे नेते आहेत. त्यातली मोठी नावं म्हणजे गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, शशी थरुर, मनिष तिवारी, आनंद शर्मा, पी जे कुरियन, रेणुका चौधरी, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, जितेन प्रसाद, भूपेंदर सिंग हुडा, राजिंदर कौर भट्टल, वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण, अजय सिंग, राज बब्बर, अरविंद सिंग लवली, कौल सिंग ठाकूर, योगानंद शास्त्री, संदीप दीक्षित, कुलदिप शर्मा, अखिलेश प्रसाद सिंग आणि विवेक तन्खा ही आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात या मूळ जी-23 मध्ये असलेली दोन नावं आता गळाली आहेत. जितेन प्रसाद आणि योगानंद शास्त्री यांनी आता पक्ष सोडला आहे. पण बुधवारी झालेल्या बैठकीत दोन नवी नावंही दाखल झाली आहेत. ती आहेत माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांची. पण या बैठकीनंतर जे पत्रक प्रसिद्धीला दिलं आहे त्यात 18 नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
4. जी-23 नेत्यांची मागणी काय आहे?
अनेक वर्षं पक्षसंघटनेत काम केलेल्या या नेत्यांची मागणी पक्षसंघटनेत मोठे आणि निर्णायक बदल करण्याची आहे. या दुसऱ्या बैठकीनंतर त्यांनी जाहीर केलेल्या पत्रकात 'सर्वसमावेशक' नेतृत्व कॉंग्रेसला मिळावं हे तर त्यांनी म्हटलंच आहे, पण 2024 मध्ये भाजपाला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसने समविचारी पक्षांशी तातडीनं बोलणी सुरु करुन मोट बांधायला सुरुवात करावी अशी त्यांची मागणी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या अगोदरही त्यांनी आपली मतं आणि मागण्या मांडल्या आहेत. जेव्हा पहिल्यांदा 2020 मध्ये हे नेते भेटले तेव्हा त्यांनी एक अंतर्गत पत्र सोनिया गांधींना लिहिलं होतं. कालांतरानं ते बाहेर माध्यमांमध्ये फुटलं. त्यात अनेक मागण्या आणि त्यावर तात्काळ कृती करावी असं म्हटलं होतं.
त्यातल्या महत्वाच्या मागण्या होत्या संपूर्ण संघटनात्मक बदल, अधिकारांचं विकेंद्रीकरण, राज्य कॉंग्रेस कमिट्यांना अधिक बळ आणि अधिकार, अध्यक्षांसहित सर्व संघटनात्मक पदांसाठी, ब्लॉकपासून ते कॉंग्रेस वर्किंग कमिटीपर्यंत, तात्काळ निवडणुका आणि कॉंग्रेसच्या केंद्रीय संसदीय मंडळाची तात्काळ स्थापना.
पक्षाच्या नेतृत्वाबद्दल सातत्यानं असलेली संदिग्धता कार्यकर्त्यांच्या मानसिक बळावर प्रतिकूल परिणाम कर आणि तो महत्त्वाचा निर्णय निवडणुकीनं लगेच व्हावा हीसुद्धा त्यांची मागणी आहे. ती मागणी अद्यापही तशीच आहे. राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्यापही ते पद रिक्त आहे आणि सोनिया गांधी हंगामी अध्यक्षा आहेत.
5. जी-23 हे राहुल गांधींविरोधात बंड आहे का?
या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या प्रयत्नाकडे कायम असंच बघितलं गेलं आहे. राहुल गांधींनी पक्षाची सूत्रं हाती घेतल्यानंतर नवी फळी पुढे आली आणि राजीव-सोनिया गांधीच्या काळातली ही ज्येष्ठ आणि प्रस्थापित नेत्यांची फळी मागे सारली गेली. त्यामुळे त्यांनी नाराज होऊन हा गट स्थापन केला असं म्हटलं गेलं. हा गट सोनियांना मानणारा, पण राहुल यांना न मानणारा असं त्याचं कायम वर्णन केलं गेलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रामध्ये राहुल यांचं नाव घेतलं नाही, पण त्यांना उद्देशून असावे असे मुद्दे मात्र लिहिले. त्यांनी कॉंग्रेसला अधिक 'जमिनीवर दिसणारं', 'सातत्यानं कार्यरत' आणि 'पूर्णवेळ काम करणारं प्रभावी' नेतृत्व हवं असल्याचं त्यांच्या पत्रात म्हटलं होतं. राहुल गांधींनी 'युथ कॉंग्रेस' आणि 'एन एस यू आय' मध्ये घेतलेल्या निवडणुकांमुळे पैसे आणि घराणी मागे असलेल्यांचंच राज्य स्तरावर वर्चस्व निर्माण झालं, असं त्यांनी म्हटलं.
हा गट सातत्यानं 'सर्वमावेशक आणि एकत्रित नेतृत्वा'बद्दल बोलत असतो, त्यामुळे राहुल यांचा अध्यक्षपदावर परतण्याचा मार्ग अवघड होतो असं म्हटलं जातं.
6. जी-23 नेत्यांबद्दल गांधींनी काय म्हटलं आहे?
तीनही गांधींनी जी-23 या नेत्यांच्या दबवगटाबद्दल टोकाच्या आणि जाहीर प्रतिक्रिया दिल्या नाहीत. पण आता दोन वर्षांच्या अंतरात आणि नुकत्याच अजून निवडणुका हारल्यानंतर त्यांनी या गटाशी बोलणं सुरु केलं आहे. अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या की पहिल्यांदा या गटानं पत्र लिहिल्यानंतर कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी उद्वेगानं बोलले होते. पण कॉंग्रेसनं असं घडलं नसल्याचं म्हटलं होतं.
पण आता या निवडणुकीनंतर सोनिया आणि राहुल यांनी संवाद सुरु केला आहे, असं दिसतं आहे. जी-23 नेत्यांच्या बैठकीअगोदर सोनिया यांनी गुलाम नबी आझादांशी फोनवर बोलणं केलं. त्यानंतर गुरुवारी या गटातले भूपिंदर सिंग हुडा हे राहुल गांधींना भेटले आणि त्यांच्या मागण्यांविषयी चर्चा केली. राहुल यांच्याशी बोलल्यानंतर हुडा हे गुलाम नबी आझादांनाही भेटले.
7. जी-23 दबावगटामुळे काँग्रेसमध्ये बदल झाला का?
याबद्दल प्रश्न आहे. कॉंग्रेस पक्ष संघटनेत अद्यापही या गटानं मागणी केल्याप्रमाणे संघटनात्मक बदल झाले नाहीत. कॉंग्रेसनं अजूनही नव्या नेतृत्वाचा प्रश्न निवडणुकीच्या माध्यमातून सोडवला नाही. सोनियांकडेच सूत्रं आहेत. राहुल यांनी राजीनामा दिला असला तरी तेच नेतृत्व करतात आणि निर्णय घेतात असं दिसतं आहे. प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या निमित्तानं अधिक कार्यरत झाल्या. त्यामुळे कॉंग्रेसची सूत्रं अद्यापही गांधींच्याच हातात आहेत. कॉंग्रेसच्या निवडणुकीतल्या प्रभावावरही फरक पडला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात या गटामुळं कॉंग्रेस विभागली गेल्याचं चित्र मात्र बाहेर तयार झालं. तरुण विरुद्ध ज्येष्ठ असा एक संघर्ष नव्यानं कॉंग्रेसमध्ये सुरु झाला.
8. जी-23 नेत्यांकडे काँग्रेसचे इतर नेते कसे बघतात?
जे सध्याच्या कॉंग्रेस नेतृत्वाच्या जवळ आहेत ते या जी-23 गटाकडे बाहेरचे आणि बंडखोर म्हणून पाहतात. जे निवडणूक जिंकत नाहीत, ज्यांना आता जनाधार नाही, ज्यांनी अगोदर सगळी पदं उपभोगली ते आता नेतृत्वाबद्दल असं बोलतात अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सध्याच्या कॉंग्रेस नेत्यांनी दिल्या आहेत.
या जी-23 गटातले प्रमुख नेते असलेले कपिल सिब्बल यांची दोन दिवसांपूर्वी टीका करणारी मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर त्यांना 'स्वार्थी' म्हणण्यात आलं. कॉंग्रेसचे सध्या सरचिटणीस असणारे तारिक अन्वर म्हणाले, "ज्यांनी नेतृत्वामुळे एवढी सत्तास्थानं उपभोगली तेच आता या नेतृत्वाला आव्हान देत आहेत. त्यांना सत्तेत राहण्याची सवय आहे म्हणून आता ते संघर्ष करु शकत नाहीत."
"राहुल यांनी राजीनामा दिल्यावर सोनियाजी अंतरिम अध्यक्षा आहेत. कोरोनाच्या काळात खूप वेळ गेल्यानं निवडणुका पुढे गेल्या. त्यामुळे आता हे प्रश्न विचारणं व्यर्थ आहे," असं छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले. अश्विनी कुमार, रणजित सूरजेवाला यांनीही या गटाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्या.
कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सिब्बल यांच्या घराबाहेर आक्रमक आंदोलनं केली. पी. चिदंबरम यांनी म्हटलं की कॉंग्रेसच्या अंतर्गत व्यासपीठांवर संवाद होऊ शकत नाही हे दुर्दैवी आहे.
एक नक्की की कॉंग्रेसमध्ये जी-23 या दबावगटानंतर मोठी घुसळण सुरु झाली आहे आणि दोन विरुद्ध गटही पडले आहेत. कॉंग्रेसच्या इतिहासाशी हे फार विसंगत नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की त्यामुळे या पक्षाच्या भविष्यात काय लिहून ठेवलं आहे?
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








