द कश्मीर फाइल्स: काश्मीरमध्ये ‘या’ 5 कट्टरतावादी संघटनांनी पसरवला होता हिंसाचार

काश्मीर, दहशतवाद

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

1990 च्या दशकात काश्मीरमधली घुसखोरी आणि कट्टरतावाद शिगेला पोहोचला होता. काश्मीर अशांत करणाऱ्या कट्टरतावाद्यांनी पुढे महाराष्ट्रातही आणि देशात इतर ठिकाणीही हल्ले घडवून आणले होते. पण कोण आहेत हे लोक? या संघटना जन्माला तरी कशा आल्या?

काश्मिरी पंडितांचं पलायन ही काश्मिरातली एक मोठी घटना होती. पण हे तेवढ्यावर थांबलं नाही. काश्मिरातल्या कट्टरतावाद्यांनी पुढची अनेक वर्षं भारत सरकारविरुद्ध आणि सुरक्षा यंत्रणांविरुद्ध सशस्त्र कारवाया सुरू ठेवल्या. बॉम्बहल्ले, अपहरणं, गोळीबार, हत्या असा या संघटनांचा हिंस्र इतिहास आहे.

काश्मीर अशांत करणाऱ्या 5 कट्टरतावादी संघटना कोणत्या होत्या?

1. लष्कर-ए-तोयबा

काश्मिरात सर्वाधिक हिंसक कारवाया करणारी लष्कर-ए-तोयबा ही कट्टरतावादी संघटना मुंबईतले 26/11 चे हल्ले आणि संसदेवर 2001 साली झालेल्या हल्ल्यांमागेही होती. 26/11 हल्ल्यांचा सूत्रधार असल्याचे भारताने दोन लोकांवर आरोप केले. हाफिझ सईद आणि झकी उर रहमान लखवी. या दोघांचा या संघटनेशी जवळचा संबंध आहे.

पाकिस्तानात जेव्हा 2002 साली लष्कर ए तोयबावर बंदी आली तेव्हा या संघटनेने जमात-उद-दवा हे नवीन रूप धारण केलं आणि लष्करशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं. पण हाफिझ सईदच पडद्यामागून या संघटनेची सूत्रं हलवतो असं मानलं जातं.

हाफिज सईद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हाफिज सईद

पाकिस्तानच्या पाठबळावर चालणाऱ्या या संघटनेने 1990 च्या दशकात उग्र रूप धारण केलं. काश्मीर आणि भारताच्या इतर शहरांमध्येही LeT ने कारवाया घडवून आणल्या. LeT वर भारताने UAPA कायद्याखाली निर्बंध लादले, अमेरिकेने 2001 मध्ये आपल्या Terror Exclusion List मध्ये LeT चा समावेश केला. तर संयुक्त राष्ट्रांनी 2005 मध्ये त्यांच्यावर प्रतिबंध लादले.

2. हिजबुल मुजाहिद्दीन

काश्मिरी तरुणांचा आपल्या काडरमध्ये मोठ्या प्रमाणात भरणा असलेली हिजबुल ही काश्मिरातली पहिली कट्टरतावादी संघटना मानली जाते. 1989 मध्ये या संघटनेची स्थापना झाली. पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ISI शी त्यांचे संबंध होतेच पण एक काळ असा होता जेव्हा या संघटनेचे सदस्य तालिबानकडून प्रशिक्षण घेत होते.

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सय्यद सलाहुद्दीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सय्यद सलाहुद्दीन

2001 हे या संघटनेच्या इतिहासातलं महत्त्वाचं वर्ष आहे. याच वर्षी हिजबुलचा काश्मीरमधील कमांडर माजिद दार याने भारतीय यंत्रणांविरुद्ध शस्त्रसंधी पुकारली आणि संघटनेत फूट पडली. 2003 साली दार मारला गेला.

आजही हिजबुल काश्मीर खोऱ्यात सक्रीय आहे. अगदी ताजी घटना सांगायची तर 14 मार्च 2022 ला काश्मीर पोलिसांचे महानिरीक्षक विजय कुमार यांनी म्हटलं, "हिजबुल मुजाहिद्दीनचं एक टेरर मॉड्यूल आम्ही मोडून काढलं आहे. सरपंच शबीर अहमद मीर यांच्या हत्येमागे आणि पंचायतीच्या इतर सदस्यांना लक्ष्य करण्यामागे हे दहशतवादी होते."

3. हरकत-उल्-मुजाहिद्दीन

पाश्चात्य देशांनी ज्या घटनेचं वर्णन काश्मिरातली पहिली दहशतवादी कारवाई असं केलं होतं तिच्यामागे हात होता हरकत-उल्-अन्सार या संघटनेचा. 1995 साली हरकत उल अन्सार या संघटनेने पाच पाश्चात्य पर्यटकांचं अपहरण केलं, पाठोपाठ अमेरिकेने त्यांच्यावर बंदी घातली.

मसूद अझहर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मसूद अजहर याची कंदाहर विमान अपहरणानंतर सुटका केली गेली. सुटकेनंतर मसूदने नवीन संघटना उभी केली - जैश- ए -मोहम्मद.

या बंदीचा परिणाम असा झाला की त्यांनी आपलं नाव बदलून हरकत-उल्-मुजाहिद्दीन असं केलं. याचे सदस्य अफगाणिस्तानातल्या हक्कानी नेटवर्कच्या नेतृत्वात रशियन सैन्याशीही लढले होते. या संघटनेने भारतीय यंत्रणांविरोधात अनेक कारवाया केल्या.

त्यांच्या अनेक नेत्यांची धरपकड झाली ज्यात मसूद अझहर याचाही समावेश होता. हा तोच मसूद अजहर, ज्याची कंदाहर विमान अपहरणानंतर सुटका केली गेली. सुटकेनंतर मसूदने नवीन संघटना उभी केली - जैश-ए-मोहम्मद.

4. जैश-ए-मोहम्मद

13 डिसेंबर 2001, पाच सशस्त्र कट्टरतावादी एका पांढऱ्या अँबेसेडर गाडीतून संसद प्रांगणात शिरले. अर्धा तास चाललेला गोळीबार, ग्रेनेड हल्ले याच्यात 9 लोकांचा जीव गेला. हा हल्ला घडवून आणला होता जैश-ए- मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दोन संघटनांनी.

संसद हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संसदेवर झालेला हल्ला. 13 डिसेंबर 2001

एअर इंडियाचं अपहरण झालेलं IC 814 विमान आणि त्यात असलेल्या सगळ्या लोकांना सुरक्षितपणे सोडवण्यासाठी भारताने ज्या लोकांची सुटका केली त्यातल्या मसूद अझहरने जैशची स्थापना केली होती.

भारताने दहशतवाद प्रतिबंध कायदा ( Prevention of Terrorism Act ) म्हणजे पोटा कायद्याअंतर्गत जैशवर बंदी घातली आहे. अमेरिकेनेही 2001 मध्ये या संघटनेला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केलं होतं. तर पुलवामामध्ये CRPF च्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातही जैशचाच हात होता असं NIA नं म्हटलं आहे.

5. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF)

1988 साली भारताविरुद्ध सशस्त्र बंडाळ्या सुरू करणारी संघटना म्हणजे JKLF. सीमेपार पाकिस्तानमध्ये असलेल्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये JKLF आपल्या कट्टरतावाद्यांना शस्त्रास्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण द्यायची.

जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट

फोटो स्रोत, Getty Images

2019 मध्ये UAPA कायद्याअंतर्गत JKLF वर भारताने बंदी घातली. तेव्हाचे गृह सचिव राजीव गॉबा यांनी म्हटलं होतं, "1989 साली काश्मिरी पंडितांचं शिरकाण करण्याचा सूत्रधार यासिन मलिक होता, तोच त्यांच्या वंशसंहारासाठी जबाबदार आहे. 1988 पासून काश्मीर खोऱ्यात मलिक याच्या नेतृत्वातील JKLF फुटीरतावादी विचारसरणी, कारवाया आणि हिंसाचार पुढे नेण्यात आघाडीवर आहे."

पाकिस्तानच्या पाठिंब्यावर सुरू झालेली ही संघटना सशस्त्र उठाव आणि काश्मीरचं स्वातंत्र्य अशा दोन्ही मुद्द्यांवर जोर देत होती. 1988 पासून साडेतीन ते चार हजार काश्मिरी तरूण सीमेपार जाऊन प्रशिक्षण घेऊन आले असं काश्मीर सरकारचा अंदाज आहे. JKLF शी संबंधित लोकांनीच भारतीय अधिकारी रविंद्र म्हात्रे यांची लंडनमध्ये हत्या केली होती. यानंतर JKLF चा नेता मकबूल भट याला भारतात फाशी दिली गेली होती.

तुम्ही याव्यतिरिक्तही अनेक नावं ऐकली असतील. आणखीही अनेक सशस्त्र संघटना जम्मू-काश्मीरमध्ये आणि खासकरून काश्मीर खोऱ्यात सक्रीय आहेत. 1990 च्या दशकातला जोर आता दिसत नसला तरी या संघटना पूर्णपणे लयालाही गेल्या नाहीयत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)