You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'...तर शशी कपूर यांना आयुष्यभर डाकूचे रोल करावे लागले असते'
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतीय सिनेजगतात सर्वात देखणा अभिनेता म्हणून शशी कपूर यांची ख्याती होती.
याविषयीची एक आठवण शर्मिला टागोर सांगतात, "काश्मीर की कलीच्या सेटवर शशी कपूर त्यांचा भाऊ शम्मी कपूरला भेटायला आले होते. तेव्हा मी १८ वर्षांची होते. मी स्वतःशीच पुटपुटले, 'ओ माई गॉड दिस इज़ शशि कपूर' त्यांना पाहून मी थक्क झाले. मी कामावर लक्ष देऊ शकतं नव्हते. शेवटी दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी शशी कपूर यांना सेटवरून जायला सांगितलं."
एवढंच नव्हे तर प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिजीडा सुद्धा शशी कपूर यांच्या देखणेपणावर भाळली होती.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इस्माईल मर्चंट त्यांच्या 'पॅसेज टू इंडिया' या आत्मचरित्रात लिहितात, "शशी कपूरचा 'शेक्सपियरवाला' हा चित्रपट बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार होता. शशी कपूरही तिथं आले होते. एका संध्याकाळी ते, त्यांच्या चित्रपटाची नायिका मधुर जाफरी आणि जीना लोलोब्रिजीडा अपघाताने एकाच लिफ्टमध्ये चढले. आणि इस्माईल मर्चंटच्या म्हणण्यानुसार, शशीला पाहताच जीना त्याच्या प्रेमात पडली."
इस्माईल मर्चंट लिहितात, "दुसऱ्या दिवशी सकाळी जीनाने शशीला गुलाबांचा गुच्छ पाठवला. पण तिला वाटलं शशीचे नाव मधुर आहे त्यामुळे तो गुच्छ मधुर जाफरीकडे गेला. कोणी जीनाचं प्रेम नाकारावं अशी तिला सवयच नव्हती. म्हणून कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी तिने शशीला विचारले की तू माझ्या पाठवलेल्या फुलांचं उत्तर दिलं नाहीस. तेव्हा कळलं की जीनाचा गुच्छ शशीपर्यंत पोहोचलाचं नव्हता. या गैरसमजामुळे चांगली संधी हातातून गेल्याचं शशी कपूर खूप वाईट वाटलं होतं."
फारुख इंजिनियर यांच्यामुळे वाचला होता चेहरा
शशी कपूर आणि भारताचे प्रसिद्ध विकेटकीपर फारुख इंजिनियर मुंबईच्या डॉन बॉस्को या शाळेत एकाच इयत्तेत शिकत होते. एकदा शशी कपूर इंजिनियर यांच्या बाजूला गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांच्या बाईंनी शशी कपूर यांच्या दिशेने लाकडी डस्टर भिरकावला होता.
इंजिनियर सांगतात, "तो डस्टर शशी कपूर यांच्या डोळ्यालाच लागणार होता पण मी एक इंच अलीकडेच तो अलगद झेलला. शशी यांचा चेहरा खूपच सुंदर होता. मी त्याची चेष्टा करायचो की त्या दिवशी जर मी डस्टर झेलला नसता तर आज तुला फक्त डाकूचेच रोल मिळाले असते."
शशी कपूर यांची मेव्हनी फेलसिटी केंडल आपलं आत्मचरित्र 'व्हाइट कार्गो' मध्ये लिहितात, "शशी कपूर यांच्या इतका फ्लर्टी माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नव्हता. याबाबतीत त्यांनी कोणालाही सोडलं नव्हतं. अगदी लाकडी ओंडक्याला सुद्धा सोडलं नाही. अंगकाठीने सडपातळ, त्यांचे डोळे खूप मोठे होते. त्यांच्या मोठ्या केसांनी सगळ्यांनाच वेड लावलं होत. त्यांचे पांढरे शुभ्र दात आणि खळी पडलेलं हसू याची तर बातच काही और होती. त्यांना त्यांच्या यशाचा गर्वसुद्धा होता."
शशी कपूर यांना त्यांच्या देखणेपणामुळेच नुकसान सोसावं लागल्याचं शबाना आजमी यांना वाटत.
त्या सांगतात, "खरं तर असा विलक्षण आकर्षक माणूस पाहून लोक ते किती महान कलाकार होते हे विसरूनचं जातात."
श्याम बेनेगल यांनी जुनून आणि कलयुगमध्ये शशी कपूर यांना कास्ट केलं होतं. ते सांगतात, "शशी एक असाधारण अभिनेता होता. पण त्याला अमिताभ बच्चनसारखे चित्रपट मिळाले नाहीत. ज्यामुळे त्याला स्टार आणि अभिनेता असा दोन्ही दर्जा मिळवून दिला असता. त्याच्याकडे नेहमीच रोमँटिक स्टार म्हणूनचं पाहिले जायचे. लोकांच्या नजरा नेहमी त्याच्या चेहऱ्यावर असतं. त्यावेळी भारतीय सिनेसृष्टीत त्याच्या इतका सुंदर अभिनेता नव्हता. याचा परिणाम त्याचा अभिनय बॅकग्राऊंडला गेला आणि तो सुपरहिरो बनला नाही.
प्रसिद्ध दिग्दर्शक कुमार शाहनी ही म्हणाले होते की, "भारतीय दिग्दर्शकांना शशी कपूरचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. शशी कपूर यांच्याकडे अभिनेत्याला सर्वोच्च स्थानावर नेईल अशी 'किलर इन्स्टिंक्ट' ही नव्हती."
जेनिफर यांच्याशी लग्न
शशी कपूर यांनी 1953 ते 1960 याकाळात वडील पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत पृथ्वी थिएटरमध्ये काम केलं. यादरम्यान त्यांची भेट जेनिफर केंडलशी झाली. ती शशी यांच्याहून चार वर्षांनी मोठी होती. जेनिफरचे वडील जेफ्री यांना या दोघांचं नातं मान्य नव्हतं.
शशी कपूरची वहिनी आणि शम्मी कपूरची पत्नी गीता बाली यांनी शशी आणि जेनिफर यांचं लग्न होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
त्याकाळात जेनिफर हैदराबादमध्ये होत्या तर शशी कपूर मुंबईत. शशी कपूर यांचं तोंड पडलेलं पाहून शम्मी कपूर यांनी शशीला विचारलं, तुझा चेहरा असा का उतरलायं ? आठवण येतेय का ? हे बोलून त्यांनी शशी यांना खिशातून 100 रुपयांची नोट काढून दिली. तेव्हा हैद्राबादचं विमानाचं तिकीट 70 रुपयांमध्ये मिळायचं.
शशी कपूर लगेचच तिकीट काढून हैद्राबादकडे रवाना झाले. शम्मी कपूर आणि गीता बाली यांनी नेहमीच शशी कपूर यांना या प्रकरणात पाठिंबा दिला होता. जेनिफरला मुंबईत आणून आई वडिलांची भेट घालून द्यावी असं ही त्यांनी शशी कपूर यांना सुचवलं होत.
आपलं पुस्तक 'पृथ्वीवालाज' यात शशी कपूर लिहितात, "मी जेनिफरला माझ्या आई वडिलांकडे घेऊन न जाता शम्मी कपूर आणि गीता बाली यांच्याकडे घेऊन गेलो. ती आम्हाला तिची कार द्यायची. सोबतच काही पैसे द्यायची जेणेकरून आम्ही ड्राइव्हवर जाऊ, एकत्र खाण्यापिऊ. नंतर शम्मीने माझ्या सांगण्यावरूनचं आमच्या आईवडिलांना माझ्या आणि जेनिफरच्या नात्याविषयी सांगितलं. आणि त्यांनी मोठ्या कष्टाने आमचं नातं मान्य केलं."
ज्या दिवशी शशी कपूर यांचं लग्न होत त्याच दिवशी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर जयपूर मध्ये 'मुग़ल-ए-आजम' च्या क्लायमॅक्सचं शूटिंग करत होते.
चित्रपटाचे दिग्दर्शक के. आसिफ यांनी त्यांच्यासाठी चार्टर डकोटा विमानाची सोय केली होती. जस लग्न संपन्न झालं, अगदी त्याच क्षणाला, त्याच विमानाने पृथ्वीराज कपूर जयपूरला परतले. त्याकाळी नाईट लँडिंगची सुविधा नव्हती. पहाट होताच विमान जयपूरच्या विमानतळावर उतरले आणि पृथ्वीराज थेट शूटिंगसाठी निघून गेले.
जेनिफर आणि शशी कपूर सोबतचं करायचे करवाचौथचे व्रत
जेनिफर कपूर नास्तिक होत्या. मात्र सासूला खूश करण्यासाठी त्या सर्व प्रकारचे उपवास करायच्या. आपल्या मुलांवर भारतीय संस्कार व्हावेत यासाठी ही त्या प्रयत्नशील असायच्या.
'द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा, कपूर्स' या आपल्या पुस्तकात मधु जैन लिहितात, "जेनिफर आपल्या सासूप्रमाणेच करवाचौथचे व्रत करायची. विशेष म्हणजे, पृथ्वीराज कपूर आणि शशी कपूर हे दोघेही या दिवशी करवाचौथचे व्रत करायचे. सासू ह्यात असेपर्यंत जेनिफरने आपलं व्रत करायचं काही सोडलं नव्हतं."
जेनिफरने इस्माईल मर्चंटला मदत केली होती.
शशी कपूर यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक इस्माईल मर्चंटसोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. बॉम्बे टॉकीजच्या शूटिंगदरम्यान मर्चंटना पैशांची अडचण भासली. त्यावेळी बऱ्याच अभिनेत्यांना पैसे द्यायचे होते. पण ते पैसे देण्यासाठी मर्चंट यांच्याकडेच पैसे नव्हते.
इस्माईल आपल्या आत्मचरित्रात आर्थिक अडचणीतून कसे बाहेर पडलो याविषयी लिहितात की, "माझ्याकडे शशी कपूर यांना ही द्यायला पैसे उरले नव्हते. पण त्यांची पत्नी जेनिफर हिच्या मनात माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता. तिने मला काही पैसे उसने दिले. आणि नंतर मी शशी कपूर यांच्याच पैशांनी त्यांचं कर्ज फेडलं. नंतर जेव्हा मला पैसे मिळाले तेव्हा मी ते पैसे जेनिफरला परत केले. पण आम्ही दोघांनीही शशी कपूरला या प्रकाराची कल्पना येऊ दिली नाही.
अशीच एक घटना शशी कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्या सोबत ही घडली होती. आधीच्याचं चित्रपटाचे पाच हजार रुपये न दिल्याने पृथ्वीराज कपूर यांनी एका निर्मात्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. तो निर्माता शांतपणे पृथ्वीराज कपूर यांच्या पत्नीकडे गेला आणि तिच्याकडून पाच हजार रुपये उसने घेतले. त्या संध्याकाळी पृथ्वीराज कपूर आनंदाने घरी परतले आणि पत्नीच्या हातावर ते पाच हजार रुपये ठेवले.
आणि राज कपूरने शशी कपूर यांचं नाव 'टॅक्सी' ठेवलं
1977 मध्ये जेव्हा राज कपूर 'सत्यम शिवम सुंदरम' हा चित्रपट बनवत होते, तेव्हा भारतीय सिनेसृष्टीतील बड्या बड्या कलाकारांना राज कपूर यांच्या या चित्रपटात नायकाची भूमिका हवी होती. पण ही भूमिका शशी कपूर यांनी करावी अशी राज कपूर यांची इच्छा होती.
शशी कपूर त्यावेळी इतर चित्रपटांच्या कामात व्यस्त होते. पण तरी ही त्यांनी त्यांचे सचिव शक्तीलाल वैद यांना डायरी घेऊन राज कपूर यांच्याकडे पाठवलं. आणि त्यांना हव्या तितक्या तारखा देण्यास सांगितलं.
शशी कपूर यांनी दीपा गेहलोत यांना दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की, "शक्ती माझ्याकडे रडत रडत आले. राज साहेबांनी इतर निर्मात्यांना दिलेल्या तारखा सुद्धा घेतल्याचं त्यांनी सांगितलं. राज कपूर यांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मला कित्येक दिवस २४ तास काम करावं लागायचं."
त्या काळात मी दिवसातून चार ते पाच शिफ्ट करायचो आणि गाडीतचं झोपायचो. जेव्हा राज कपूरला हे कळलं तेव्हा त्यांनी माझे नाव 'टॅक्सी' ठेवलं. तू स्टार नाहीस, टॅक्सीवाला आहेस असे तो म्हणायचा. कोणीतरी तुझं मीटर डाऊन केलं की तू जाण्यासाठी तयार."
पण इतके व्यस्त असूनही शशी कपूर कधीही सेटवर उशिरा पोहोचले नाहीत.
दिवार चित्रपटातला 'मेरे पास माँ है' चा डायलॉग
शशी कपूर यांचं नाव मोठं झालं कारण त्यांनी अमिताभ बच्चनसोबत दिवार हा चित्रपट केला म्हणून.
राजीव विजयकर, बॉलिवूड हंगामामध्ये लिहितात, "जावेद अख्तर यांनी मला सांगितलं होतं. शशी हे अमिताभ यांच्यापेक्षा वयाने मोठे होते. पण त्यांनी 'दीवार' या चित्रपटात अमिताभच्या धाकट्या भावाची भूमिका करावी अशी आमची इच्छा होती. यासाठी निर्माता गुलशन राय यांना पटवून देण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागली."
नंतर 'दीवार'चे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी मधु जैन यांना सांगितले की, "माझ्या चित्रपटातील शशीच्या भूमिकेची गरज ही अंडरप्ले करावी अशी होती. शशीने 'मेरे पास माँ है' चा डायलॉग जर एखाद्या स्टारसारखा बोलण्याचा प्रयत्न केला असता तर तो त्या भूमिकेला न्याय देऊ शकला नसता."
समांतर चित्रपट बनवण्याची प्रेरणा
शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर सांगतो की, त्याच्या वडिलांनी आयुष्यात एकदाही सांगितलं नाही की, त्यांना स्टार व्हायचं आहे. चित्रपटांप्रति असलेल्या आकर्षणामुळेचं त्यांना कलात्मक समांतर चित्रपट बनवण्याची प्रेरणा मिळाली.
रस्किन बाँडच्या 'फ्लाइट ऑफ द पिजन' या कथेवर आधारित जुनून हा या पठडीतला पहिला चित्रपट होता. या चित्रपटात, शशी कपूर यांनी विवाहित पठाण जावेद खानची भूमिका केली. हा तरुण एका अँग्लो-इंडियन मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिचं अपहरण करतो.
शशी कपूर यांच चरित्र 'शशी कपूर द हाउज होल्डर, द स्टार'मध्ये असीम छाबडा लिहितात, "जुनूनच्या शूटिंगदरम्यान शशी कपूर सर्वात आधी सेटवर पोहोचायचे. ते आपल्या सर्व सहकलाकारांशी आदराने वागायचे. चित्रपटाचं शूटिंग दोन महिने चाललं. दरम्यान शूटिंगसाठी
आलेल्या युनिटमधील प्रत्येकासाठी त्यांनी लखनौमधील क्लार्क्स अवध हॉटेलमध्ये रूम बुक केल्या होत्या. जुनूनने 1979 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि 1980 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक आणि डायलॉगसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळवला होता."
कलयुग, 36 चौरंगी लेन, विजेता आणि उत्सव यासारख्या त्यांच्या इतर सर्व चित्रपटांनी कलेचा उत्कृष्ट नमुना सादर केला. मात्र या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.
70 ते 80 च्या दशकात बनवलेल्या बहुतेक समांतर चित्रपटांसाठी फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने निधी दिला होता.
शशी कपूर कदाचित असे एकटेच चित्रपट निर्माते होते जे उधारीवर पैसे घेऊन समांतर चित्रपट तयार करत होते.
शेवटच्या दिवसांत आजारपण आलं!
1984 मध्ये जेनिफर कपूर यांच्या निधनानंतर शशी कपूर यांची जगण्याची इच्छा तशी संपूनच गेली होती. यानंतर त्यांचं वजन वाढू लागलं.
काही वर्षानंतर तर ते सुमो पहलवानासारखे दिसायला लागले. त्यांनी घराबाहेर पडायचं सोडून दिलं. वाढलेल्या वजनामुळे त्यांच्या गुडघ्यांवर ताण येऊ लागला.
त्याकाळात जेव्हा त्यांच्या वहिनी निला देवी यांनी शशी कपूर यांना फोन केला होता तेव्हा शशी कपूर म्हंटले, 'आता कोणासाठी जगायचं आहे?'
त्यांचे जुने मित्र, दिग्दर्शक जेम्स आयव्हरी सांगतात, 'लठ्ठपणा शशी कपूरसाठी शोक जाहीर करण्याचा एक मार्ग होता.'
शशी कपूर यांच्या शेवटच्या दिवसात त्यांना स्मृतिभ्रंशाचा त्रास सुरू झाला होता. एकदा सिमी गरेवालने त्यांना एका कार्यक्रमात व्हील चेअरवर बसलेल पाहिलं. तेव्हा त्या शशी कपूर यांच्याकडे गेल्या. शशी यांची मुलगी संजना त्यांच्या सोबतचं होती. तिने सिमीला सांगितलं की, त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. आणि त्यांना हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला आहे, जर त्यांनी तुम्हाला ओळखलं नाही तर वाईट वाटून घेऊ नका.
हे ऐकून ही सिमी त्यांच्याजवळ गेल्या. त्या खाली वाकल्या, त्यांनी एकवार शशी यांच्या थकलेल्या चेहऱ्याकडे नजर टाकली. शशी कपूर यांनी सिमीकडे पाहिलं आणि म्हणाले, 'हॅलो सिमी'. सिमीच्या डोळ्यांत पाणी तरळलं, काही न बोलता त्यांनी शशी यांनी मिठी मारली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)