सौरभ त्रिपाठी कोण आहेत? हा IPS अधिकारी गायब का झालाय?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेले IPS अधिकारी आणि मुंबईचे पोलीस उपायुक्त ऑपरेशन (DCP) सौरभ त्रिपाठी यांना राज्य सरकारने निलंबित केलं आहे. गृह विभागाने राज्य सरकारकडे पाठवलेला निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबईच्या सेशन्स कोर्टात अर्ज केला होता. तो बुधवारी कोर्टानं फेटाळला आहे. कोर्टाने सौरभ त्रिपाठी यांना अटकेपासून कोणताही दिलासा दिलेला नाही.

माझ्यावर दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचं त्रिपाठी यांनी या याचिकेत म्हटलं होतं. मुंबईतील अंगडीयांकडून खंडणी वसूल करण्याचा सौरभ त्रिपाठी यांच्यावर आरोप आहे.

हायकोर्टाचे वकील अनिकेत निकम हे सौरभ त्रिपाठी यांची बाजू सेशन्स कोर्टात मांडली.

सौरभ त्रिपाठी गायब

सौरभ त्रिपाठी 19 फेब्रुवारीपासून फरार आहेत. अचानक गायब झालेले सौरभ त्रिपाठी कुठे आहेत, याची महाराष्ट्र सरकारलाही माहिती नाही.

मुंबई क्राइम ब्रांचने उपायुक्त सौरभ त्रिपाठींवर खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची तलवार लटकतेय. अटकेपासून संरक्षणासाठी त्यांनी मुंबई सेशन्स कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केलीये. त्यांच्या याचिकेवर 24 मार्चला सुनावणी होणार आहे.

अंगडिया खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांच्या 5 टीम तयार करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलीय. यासंबंधी राजस्थान, उत्तर प्रदेशसह अनके ठिकाणी तपास सुरू करण्यात आलाय.

डीसीपी सौरभ त्रिपाठी हे या प्रकरणात 'वाँटेड आरोपी' आहेत.

बीबीसीने सौरभ त्रिपाठी यांना फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी उत्तर दिलं नाही. त्यांचे वकील अनिकेत निकम यांनी कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती दिलीये.

मुंबई पोलिसांनी केली निलंबनाची शिफारस

मुंबई पोलिसांनी सौरभ त्रिपाठी यांचा शोध घेण्यासाठी मुंबईतील त्यांच्या रहात्या घरी तपास केला. उत्तरप्रदेशातील कानपूर आणि लखनऊमध्येही मुंबई पोलिसांनी चौकशी केलीये. पण, त्रिपाठी कुठे आहेत याची माहिती अजूनही मिळालेली नाही.

खंडणी प्रकरणी सौरभ त्रिपाठींची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या निलंबनाची शिफारस गृहमंत्रालयाकडे केली. राज्य सरकारने याबाबत अजून काहीही ठोस निर्णय घेतलेला नाही.

सौरभ त्रिपाठी कोण आहेत?

सौरभ त्रिपाठी 2010 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी आहेत.

सद्यस्थितीत ते मुंबईत पोलीस उपायुक्त ऑपरेशन म्हणून कार्यरत आहेत.

सौरभ त्रिपाठी यांना ओळखणारे अधिकारी सांगतात, मुंबईच्या नायर रुग्णालयातून वैद्यकीय शिक्षण (MBBS) पूर्ण केल्यानंतर सौरभ त्रिपाठी IPS बनले.

अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, मुंबईत पोलीस उपायुक्त, राज्यपालांचे ADC, मुंबईत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी कर्तव्य बजावलं आहे.

वरिष्ठ IPS अधिकारी म्हणतात, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या चौकशीनंतर सौरभ त्रिपाठी चर्चेत आले. कोपर्डी प्रकरणाचा तपास करून त्यांनी आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केली होती.

त्यांच्यावर आरोप काय आहेत?

पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींविरोधात मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटने काही दिवसांपूर्वीच खंडणीचा गुन्हा दाखल केलाय.

बीबीसीशी बोलताना DCP सौरभ त्रिपाठींविरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. खंडणी उकळण्याचा आरोप IPS अधिकाऱ्यावर असल्याने वरिष्ठ अधिकारी याबाबत मौन बाळगून आहेत.

सौरभ त्रिपाठींवर मुंबईतील अंगडीयांकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याचा आरोप आहे. अंगडीयांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पोलीस उपायुक्त त्रिपाठी यांनी त्यांच्याकडून काम सुरू ठेवण्यासाठी 10 लाख रूपये मागितल्याचा आरोप केलाय.

अंगडियांकडून खंडणीचं हे प्रकरणं काय आहे?

मुंबईतील अंगडीयांकडून जबरदस्तीने खंडणी उकळण्याचं हे प्रकरण सर्वांत पहिले उघडकीस आलं डिसेंबर महिन्यात.

अंगडीयांच्या संघटनेने मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एल. टी. मार्ग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाची तक्रार केली होती. पोलीस अधिकारी बॅगमधून पैसे घेऊन जाणाऱ्या अंगडीयांना पोलीस चौकीत बोलावून पैसे उकळत असल्याची तक्रार अंगडीयांनी केली.

प्रकरणाचं गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांना चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशीत पोलीस अधिकाऱ्यांनी अंगडीयांना आयकर विभागाचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचं स्पष्ट झालं. पोलीस अधिकाऱ्यांविरोधात चौकशीत पुरावे आढळून आले.

त्यानंतर 19 फेब्रुवारीला मुंबईच्या एल. टी. मार्ग पोलिस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांविरोधात खंडणी उकळण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण यात पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचं नाव नव्हतं.

5 लाखांची रोकड नेण्यासाठी 50 हजार रूपये आणि 10 लाखांची रोकड नेण्यासाठी 1 ते 2 लाख रूपये मागितल्याचा आरोप करण्यात आला होता.

अंगडीया कॅरिअरचं काम करतात. प्रामुख्याने रोकड, सोनं-चांदी आणि हिरे अंगडीया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात. तपास यंत्रणांच्या रडारवर न येता ते कॅरिअरचं काम करतात.

सौरभ त्रिपाठी यांचं नाव केव्हा पुढे आलं?

अंगडीयांकडून पैसे उकळण्याप्रकरणी क्राइम ब्रांचने पोलीस निरीक्षक ओम वांगाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांना अटक केली.

खंडणीच्या गुन्ह्याचा तपास मुंबई क्राइम ब्रांचला देण्यात आला. क्राइम ब्रांचच्या तपासात अंगडीया खंडणी प्रकरणी सौरभ त्रिपाठी यांचं नाव पुढे आलं. तपासानंतर दोन दिवसांपूर्वीच क्राइम ब्रांचने पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

अटक झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करताना कोर्टात दाखल रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी तत्कालीन पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचं नाव आरोपी म्हणून घेतलंय.

सौरभ त्रिपाठी केव्हापासून गायब आहेत?

एल. टी. मार्ग पोलीस स्टेशन मुंबईच्या झोन-2 मध्ये येतं. DCP सौरभ त्रिपाठी झोन-2 चे पोलीस उपायुक्त होते.

अंगडीया खंडणी प्रकरणी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सौरभ त्रिपाठी यांची तात्काळ बदली करण्यात आली. त्यांची पोस्टिंग ऑपरेशन शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली.

मुंबई पोलिसांचे वरिष्ट अधिकारी सांगतात, सौरभ त्रिपाठी यांनी नवीन पदाचा चार्ज घेतला नाही. बदली झालेल्या दिवसापासूनच ते अचानक गायब झालेत. ड्युटीवर आलेले नाहीत. एवढंच नाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे सर्व व्हॉट्सअप ग्रुपही त्यांनी सोडून दिलेत.

19 फेब्रुवारीला अचानक गायब झालेले सौरभ त्रिपाठी कुठे आहेत याची मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला काहीच माहिती नाहीये.

गेले 28 दिवस पोलीस उपायुक्त दर्जाचा हा अधिकारी ड्यूटीवर आलेला नाही. बीबीसीने सौरभ त्रिपाठी यांना फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा फोन बंद येतोय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)