रूपा दत्ता : ममता बॅनर्जींची टर उडवणाऱ्या अभिनेत्रीवर पर्स चोरीचा आरोप

रूपा

बंगाली चित्रपटांमधील अभिनेत्री रूपा दत्ता यांचं नाव दोन दिवसांपूर्वी चर्चेत आलं होतं, जेव्हा त्यांनी गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या 'फ्लॉप शो'साठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची खिल्ली उडवली होती.

त्यांनी ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये ती ममता बॅनर्जींच्या विधानाचं विडंबन करताना दिसली होती.

त्यानंतर दोनच दिवसांनी कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात महिलांच्या पर्स चोरल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलीये.

त्यांच्याकडून अशी एक डायरी जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केलाय, ज्यामध्ये प्रत्येक घटनेची नोंद आहे, त्यांनी किती पैसे कोठून आणि केव्हा चोरले आहेत. मात्र, रूपाने न्यायालयात आपण निर्दोष असल्याचा दावा केलाय.

पण या प्रकरणाने असाही प्रश्न उपस्थित केला आहे की, भाजपच्या अनेक व्यक्तींसोबत फोटो काढणारी ही अभिनेत्री 'क्लेप्टोमॅनिया'ची बळी आहे का?

पुस्तक प्रदर्शनातून रंगेहाथ अटक केल्यानंतर रूपाला सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. याप्रकरणी सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.

काय आहे प्रकरण ?

कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात त्यांना एक पर्स कचऱ्याच्या डब्यात फेकून देताना बघितलं आणि संशय आल्याने पोलिसांनी रूपाला ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली.

बुक

यावेळी त्यांच्याकडून काही पर्स आणि 70 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. यावर यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता रूपा यांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही. त्यानंतर त्यांना अटक करून विधाननगर पोलिस ठाण्यात आणण्यात आलं.

एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "रूपाने चोरीच्या अनेक घटनांची कबुली दिली आहे. त्यांनी कबूल केलंय की, त्या चोरीच्या उद्देशाने अनेकदा गर्दीच्या ठिकाणी आणि हाय-प्रोफाइल पार्ट्यांमध्ये जात होत्या. एव्हढंच नाही त्यांनी यासाठी एक डायरीसुद्धा केली होती, ज्यामध्ये या सर्व घटनांची आणि पैशाची नोंद करण्यात आली होती."

पण या प्रकरणामुळे लोकांना काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'सिमरन' चित्रपटातील कंगना राणावतच्या पात्राची आठवण झाली आहे. त्यात तिने क्लेप्टोमॅनियाच्या समस्येने त्रस्त अशा नटखट मुलीची भूमिका साकारली होती, जिला विनाकारण वस्तू चोरण्याची सवय असते.

ही एक मानसिक समस्या आहे का?

रूपा यांनाही या आजाराने ग्रासलं आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, असा कोणताही दावा रूपा किंवा त्यांच्या वकिलाने न्यायालयात केलेला नाही. तरीही हा प्रश्न उपस्थित होतोय.

अखेर ही समस्या काय आहे? तज्ज्ञ म्हणतात की, ही आवेग नियंत्रणाशी संबंधित एक गंभीर मानसिक समस्या आहे. यामुळे पीडित व्यक्ती आपल्या भावना आणि वर्तनावर नियंत्रण ठेवू शकत नाही.

रूपा

या समस्येने ग्रस्त व्यक्ती कोणत्याही गरजेसाठी पद्धतशीरपणे चोरी करत नाही किंवा या कामात इतरांची मदत घेत नाही. ती व्यक्ती लोकांना शारीरिक इजाही करत नाही. त्याला अशी चोरी करण्यात मजा येते.

डॉ. सुमंत हाजरा, मानसशास्त्रज्ञ याविषयी बोलतांना म्हणतात, "प्रदर्शनात किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी फिरून लोकांच्या पर्स किंवा पैसे चोरणे हे रूपासारख्या अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्वाशी जुळत नाही. तिला क्लेप्टोमॅनियाची समस्या देखील असू शकते. परंतु हा विषय खोलवर तपासणीचा आहे."

कोण आहे रूपा दत्त?

रूपा दत्ता बंगाली चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्या अनेक मालिका आणि टीव्ही शोमध्येही दिसल्या आहेत. त्यांनी जय माँ वैष्णो देवी या हिंदी मालिकेतही मुख्य भूमिका साकारली आहे.

मुंबईतील त्यांच्या अक्टिंग स्कूलचे उद्घाटन भाजप नेते सय्यद शाहनवाज हुसेन यांच्या हस्ते झाले होते. रूपाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर आणि इतर नेत्यांसोबतचे फोटो आहेत. स्वत: कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

रूपा दत्ता 2020 मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या, जेव्हा त्यांनी 'अनुराग कश्यप'वर अश्लील संदेश पाठवल्याचा आरोप केला होता.

त्यांनी आरोप केला होता की, अनुराग कश्यप त्यांना चुकीचे संदेश पाठवत आहे आणि अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी, पण नंतर कळालं की त्या ज्या अनुरागबद्दल बोलत आहे, ते सिनेदिग्दर्शक अनुराग कश्यप नसून दुसरं कोणीतरी आहे.

त्यानंतर गेल्या आठवड्यात गोवा विधानसभेत त्यांनी तृणमूल काँग्रेसला खाती न उघडण्याच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जींवर टीका केली होती आणि त्यांची खिल्ली उडवली होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)